अभियांत्रिकी विदयार्थ्यांसाठी अधिकारी पदाच्या संधी
एक काळ असा होता की, अभियांत्रिकी विषयातील पदवी मिळाली म्हणजे गलेलठ्ठ पगाराची सरकारी अथवा खाजगी क्षेत्रातील नोकरी मिळणारच मिळणार असे सरळसोपे गणित होते. काळ झपाट्याने बदलत गेला आणि आज त्याच्या एकदम विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सुकाळ आणि दिवसेंदिवस खाजगी क्षेत्रातील कमी होणाऱ्या नोकऱ्या या दुहेरी कात्रीत आजचा अभियांत्रिकी पदवीधर सापडलेला दिसतोय. ‘यत्र तत्र सर्वत्र’ या उक्तीप्रमाणे अभियांत्रिकी पदवीधरांचे प्रमाण एवढे जास्त झालेले आहे की, कुठल्याही क्षेत्रात निम्न स्तरावर देखील नोकरीच्या अभावी अभियांत्रिकी पदवीधर आपणास काम करताना दिसत आहे. अभियांत्रिकी पदवीधरांसमोर मग दुसरा काहीच पर्याय नाही का? नक्कीच पर्याय आहे. ‘अभियांत्रिकी पदवीधर’ हा एक असा वर्ग आहे की, ज्यांच्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्र सोडून देखील विविध क्षेत्रातील खुल्या स्पर्धात्मक परीक्षांमधून अफाट संधी उपलब्ध आहेत. आजच्या या लेखात आपण अभियांत्रिकी पदवीधरांसाठी उपलब्ध असलेल्या याच संधींचा थोडक्यात परामर्श घेणार आहोत.
अभियांत्रिकी पदवीधर हा आपल्या पदवीच्या अंतिम वर्षात ‘Campus Interview’ मधून निवड होऊन एखाद्या चांगल्या कंपनीत अधिकारी पदावर निवड होण्याचे स्वप्न पाहत असतो. दिवसेंदिवस वाढत जाणारी अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या आणि मोठमोठ्या कंपन्यांचे नोकरकपात धोरण याचा फटका बऱ्याच अभियांत्रिकी पदवीधारकांना गेल्या कित्येक वर्षांपासून बसत आहे. त्याचमुळे Campus Interviews च्या माध्यमातून चांगली नोकरी मिळण्याचे स्वप्न धूसर होत चालले आहे.
अभियांत्रिकी विषयांमध्ये विशेष रुची असणारे व अभियांत्रिकी पदवीच्या चारही वर्षांमध्ये चांगले गुण मिळविणारे विद्यार्थी GATE परीक्षांची तयारी एक-दोन वर्षांसाठी करतात आणि वेगवेगळ्या उच्च शिक्षणाच्या संधी तसेच विविध सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांमध्ये (PSU) इंजिनीअर पदाच्या नोकऱ्या काबिज करतात. अभियांत्रिकी क्षेत्रातच करीअर करण्याची इच्छा बाळगून असणारे विद्यार्थी UPSC अथवा MPSC Technical परीक्षांची तयारी करतात आणि त्या माध्यमातून विविध अभियांत्रिकी तंत्रज्ञांची पदे (Assistant Engineer, Deputy Engineer) मिळवितात. त्याहून मोठी स्वप्ने असणारे विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च सरकारी पदे मिळविण्यासाठी IES (Indian Engineering Services) परीक्षांचा मार्ग चोखाळतात. स्वतःच्या मेहनतीवर व तयारीवर संपूर्ण विश्वास असणारे विद्यार्थी याही पलीकडे जाऊन खुल्या स्पर्धेसाठी स्वतःला तयार करतात आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून सरकारी क्षेत्रातील सर्वोच्च अधिकारी पदाची पदे काबीज करतात. आपल्या शासन व्यवस्थेत आजदेखील अभियांत्रिकी क्षेत्रातील तंत्रज्ञ असोत की वैद्यकीय शास्त्रातले उच्चविद्याविभूषित डॉक्टर असोत, सरकारी क्षेत्रातील सर्वच अधिकाऱ्यांना IAS अथवा सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालीच काम करावे लागते.
हे जर आजच्या शासन व्यवस्थेचे सत्य असेल तर मग इंजिनीअर पदवीधराला या परीक्षा देण्यापासून कोणी रोखले आहे का? UPSC परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्याला IAS,IPS,IFS,IRS यांसारखी मोक्याची पदे काबीज करता येतात. राज्यस्तरीय MPSC परीक्षांच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी, DySP, तहसिलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांसारख्या शासन व्यवस्थेतील पदांवर त्यांची निवड होवू शकते. शासन व्यवस्थेतील सनदी सेवा परीक्षांच्या माध्यमातून निवड होणारी ही पदे चांगला पैसा, सामाजिक मानमरातब, प्रतिष्ठा या गोष्टी तर देतातच देतात, पण त्याहून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजासाठी आणि समाजातील ‘नाही रे’ अशा वंचित वर्गांसाठी शासन व्यवस्थेच्या माध्यमातून काहीतरी करण्याची संधी प्राप्त करून देतात. अभियांत्रिकी पदवीधरांसाठी उपलब्ध असणारी आणखीन एक महत्वाची संधी म्हणजे भारतीय सैन्यदलात सेवा करण्याची संधी! CDS अथवा SSB परीक्षांच्या माध्यमातून सैन्यदलात University Entry Scheme मधून अभियांत्रिकी पद्वीधारकांसाठी विशेष संधी उपलब्ध आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी किंवा पदवी प्राप्त केल्यानंतर आपणास या परीक्षांना सामोरे जाता येते.
भारतीय वन सेवा (Indian Forest Services) परीक्षा या UPSC द्वारे दर वर्षी घेतल्या जातात आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील भारतीय वन सेवेतील राजपत्रित अधिकारी पदावर निवड होण्याची संधी अभियांत्रिकी पदवीधरांसाठी उपलब्ध असते. या सेवांच्या माध्यमातून खरोखरच पर्यावरण संवर्धन व निसर्गाचे जतन करण्याची संधी प्राप्त होते. गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी पदवीधारकांचा बॅंकिंग परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा टक्का देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आरबीआय ग्रेड ‘बी’ परीक्षा असोत किंवा वेगवेगळ्या बँकांची Probationary Officers ची पदे असोत, बँकिंग क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी पदवीधराना संधी आहेत. SSC (Service Selection Commission) च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठी देखील अभियांत्रिकी पदवीधर मोठ्या प्रमाणावर सामोरे जात आहेत आणि यशस्वी होत आहेत.
स्पर्धात्मक परीक्षांची एक खासियत म्हणजे वरकरणी जरी या परीक्षा वेगवेगळ्या वाटत असल्या तरी या परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या आणि प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की, काही विशिष्ट घटकांवरच या परीक्षांचा जास्त जोर असतो. Campus Interviews असोत वा UPSC, MPSC परीक्षा अथवा बँकिंग आणि भारतीय वन सेवा परीक्षा- यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी एक मुलभूत दृष्टीकोन आपणास तयार करावा लागेल. Aptitude test, English Comprehension, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य अध्ययन विषयातील संकल्पनांची मुलभूत समज, चालू घडामोडींचा अभ्यास आणि स्वतःला Group Discussion आणि मुलाखत चाचणीमध्ये व्यक्त करण्याचे कौशल्य- या सहा बाबींवर प्रत्येक विद्यार्थ्याला मेहनत घ्यावी लागते. आणि या सर्व गोष्टी आपण आपल्या पदवी वर्षांदरम्यानच तयार करू शकता. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच उर्जा आणि सुप्त गुण असतात, गरज असते ती त्यांना योग्य दिशा देण्याची! आपल्याला माहितच असेल की, जगप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगले, धडाकेबाज माजी आरबीआय गवर्नर रघुराम राजन, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे अतिरिक्त महासंचालक श्री लक्ष्मिनारायणन- यांसारखे शेकडो यशस्वी व्यक्तिमत्व अभियांत्रिकी पदवीधर आहेत. तेव्हा अभियांत्रिकी पदवीधारकांना गरज आहे ती स्वतःचे SWOT analysis (Strength, Weakness, Opportunities, threats analysis) करण्याची आणि त्यानुसार कारकिर्दीची दिशा ठरवण्याची!
वरील विवेचनावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलीच असेल की, केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातच करीअर करायचे असा संकुचित विचार करून स्वतःच्या अभिव्यक्तीला जखडून ठेवण्याएवजी खुल्या स्पर्धेला सामोरे जाण्याची हिम्मत अभियांत्रिकी पदवीधारकांनी ठेवली तर आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य ते प्राप्त करू शकतात. जबरदस्त अधिकार असणाऱ्या आणि समाजासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याची संधी निर्माण करून देणाऱ्या UPSC परीक्षांच्या माध्यमातून आपण नक्कीच आपल्या करीअरला एक निर्णायक दिशा देऊ शकता. गरज आहे ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची, डोळे उघडे ठेवून संधी शोधण्याची, स्वतःला संपूर्णपणे स्पर्धेत झोकून देण्याची आणि यशस्वी होऊन दिमाखात अधिकारी पदावर स्थानापन्न होण्याची…
विचारा प्रश्न तुमच्या मनातला?
‘विचारा प्रश्न तुमच्या मनातला’ या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन व येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.) या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न ई–मेल मार्फत पाठवा .
ई–मेल – drsatishdhage@gmail.com
प्रश्न– सर, UPSC २०१७ परीक्षांसाठी किती जागा असतील?
– नितीन, औरंगाबाद.
उत्तर– नितीन, UPSC सनदी सेवा परीक्षांची अधिसूचना फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रकाशित होईल. ती अधिसूचना प्रकाशित झाल्यानंतरच आपल्याला एकूण जागा त्याचबरोबर त्याचे सेवावार वर्गीकरण समजू शकेल. परंतु अधिसूचनेची वाट न पाहता १७ जून २०१७ रोजी होणाऱ्या UPSC प्राथमिक परीक्षेसाठी जोमाने तयारी आतपासूनच कुठलाही वेळ न दवडता करायला हवी. UPSC २०१७ परीक्षेविषयी व त्या परीक्षेच्या तयारीविषयी विस्तृत माहिती व मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)