‘ग्रुप डिस्कशन’ ची तयारी
अलीकडील काळात ‘Group Discussion’ हा विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अविभाज्य घटक बनला आहे. एमबीए प्रवेश परीक्षा असो, चांगल्या कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी ‘कॅम्पस इंटरव्यू’ ची तयारी असो वा संरक्षणदलात अधिकारी बनण्यासाठी SSB परीक्षा असोत- अशा विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रत्येक उमेदवाराला ‘ग्रुप डिस्कशन’ चा महत्वपूर्ण टप्पा पार पाडावाच लागतो. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, विशेष करून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये अपार गुणवत्ता असून देखील केवळ संवाद्शैलीचा अभाव आणि समूहामध्ये स्वतःला व्यक्त करण्याचे कौशल्य कमी पडत असल्यामुळे, बऱ्याच वेळी शेवटच्या टप्प्यात अपयशाला सामोरे जावे लागते. ‘ग्रुप डिस्कशन’ चा टप्पा हा योग्य तयारीने आणि आत्मविश्वासाने सहजगत्या पार पाडता येतो. आजच्या या लेखात आपण ‘ग्रुप डिस्कशन’ च्या टप्प्यात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा परामर्श घेणार आहोत.
‘ग्रुप डिस्कशन’ म्हणजे समूह चर्चा. कुठल्याही परीक्षार्थीसाठी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी केवळ गुणवत्ता असून भागत नाही तर त्याला समूहामध्ये वेगवेगळ्या स्तरांच्या लोकांसोबत काम करून दिलेले कार्य उत्कृष्टरीत्या पार पाडण्याचे कसबही जमायला हवे. ‘ग्रुप डिस्कशन’ च्या माध्यमातून परीक्षार्थीची समूहात काम करण्याची हीच शैली तपासली जाते. ‘ग्रुप डिस्कशन’ मध्ये सुरुवातीला एक विषय दिला जातो आणि त्यानंतर काही मिनिटांचा कालावधी उमेदवारांना त्या विषयावर विचार करण्यासाठी दिला जातो. साधारणतः ‘ग्रुप डिस्कशन’ साठी सात ते पंधरा उमेदवाराचा एका समूहात समावेश केलेला असतो. ‘ग्रुप डिस्कशन’ साठी दिला गेलेला विषय हा साधारणतः चालू घडामोडींशी संबंधित एखादी घटना वा एखादा वादग्रस्त मुद्दा वा एखादी सामाजिक समस्या, यांप्रकारे दिला जातो. समूहातील सदस्यांना या विषयावर दिलेल्या वेळेत सांगोपांग चर्चा करून एखादया निष्कर्षाप्रत वा समस्येच्या निराकरणाप्रत येणे अपेक्षित असते. या संपूर्ण प्रक्रियेत उमेदवाराचा सहभाग कशा प्रकारे आहे आणि निष्कर्षाप्रत येण्यासाठी त्याचा किती मोलाचा सहभाग राहिलेला आहे, याचा विचार या प्रक्रियेत केला जातो.
‘ग्रुप डिस्कशन’ मध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वातील काही घटकांवर आपल्याला विशेष करून मेहनत घ्यावी लागते. ‘ग्रुप डिस्कशन’ मध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी सर्वात पहिले व्यक्तीवैशिष्ठ्य म्हणजे नेतृत्वगुण. ‘ग्रुप डिस्कशन’ च्या विषयाची चर्चा सुरु करण्याचा संकेत मिळताच उमेदवाराने ती चर्चा सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सुरुवातीलाच समूहातील ईतर सदस्यांना आदराने संबोधित, दिलेल्या विषयासंबंधीची प्रस्तावना साध्या आणि सरळ पद्धतीने ईतर सदस्यांसमोर मांडावी व दिलेल्या वेळमर्यादेत आपल्याला या विषयाच्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णयाप्रत येता येईल, याविषयी कल्पना द्यावी. अशा पद्धतीने समूहामध्ये आपण सरशी मारली तर आपोआपच या समूहाचा म्होरक्या म्हणून आपण पुढे येऊ शकाल. उमेदवाराने प्राप्त केलेल्या या आघाडीच्या सोबतीलाच, समूहाची चर्चा विषयाशी अनुरूपच राहील यांसाठी आपण विशेष लक्ष द्यावे तसेच जास्तीत जास्त उमेदवारांना या चर्चेत कसे सहभागी करून घेता येईल, याविषयी प्रयत्नरत राहावे.
एखाद्या उमेदवाराला या बाबी समूह्चर्चेदरम्यान करता आल्या, तर साहजिकच तो या समूहाचा नेता म्हणून आपला प्रभाव निर्माण करू शकेल. ‘ग्रुप डिस्कशन’ मध्ये यशस्वी होण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, उमेदवाराने चर्चेमध्ये मांडलेल्या मुद्द्यांचा मुद्देसुद्पणा. आपण चर्चेत मांडलेले मुद्दे हे दिलेल्या विषयाशी सुसंगत असेच असावेत आणि या मुद्द्यांच्या आधारे आपण विषयात दिलेल्या समस्येच्या निराकरणाच्या समीप पोहोचण्यासाठी त्यांचा फायदा व्हावा. विषयाशी संबंधित सरकारी आकडे वा ‘केस स्टडिज’ यांचा थोडक्यात आपल्याला आपला मुद्दा पटवून देण्यासाठी चर्चेदरम्यान उपयोग करता येऊ शकेल. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, समूह चर्चेदरम्यान केवळ काही निवडक सदस्यांनीच सर्व मुद्द्यांची चर्चा करण्याऐवजी ईतर सदस्यांना देखील चर्चेत सहभागी होण्याची संधी द्यावी आणि त्यांना त्यांचे मत प्रदर्शित करण्यासाठी चालना द्यावी.
एखाद्या सदस्याच्या अशा प्रकारच्या व्यक्तीविशेषामुळे, त्याच्यातील समूहातील ईतर सदस्यांना सामावून घेण्याची आणि सर्वसमावेशक निर्णयाप्रत येण्याची शैली उठून दिसते. सर्वच्या सर्व मुद्दे ‘ग्रुप डिस्कशन’ मध्ये मीच सांगणार, असा अट्टाहास न धरता आपण इतरांनाही संधी दिली तर आपल्याला अधिक गुण मिळण्यासाठी याचा फायदा होईल. ‘ग्रुप डिस्कशन’ मध्ये यशस्वी होण्यासाठी चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे, समूह चर्चेदरम्यान असणारी आपली देहबोली. संपूर्ण चर्चेदरम्यान आपली देहबोली आणि एकूणच आपला दृष्टिकोन हा सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण असावा लागतो. आपल्याला न पटणारे अथवा आपल्या विरोधात जाणारे मुद्दे जरी दुसऱ्या एखाद्या सदस्याने मांडले तरी, तरी आपण शांतपणे ते मुद्दे आपल्याला संधी मिळाल्यानंतर खोडून काढावेत. ईतर सदस्य बोलत असताना त्यांच्या मुद्द्यांना मानेनेच होकार द्यावा आणि चेहऱ्यावर चर्चेदरम्यान स्मित हास्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाचा आपल्याला चर्चेदरम्यान नक्कीच फायदा होईल.
सर्वात शेवटचे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, संपूर्ण चर्चेदरम्यान आपल्या व्यक्तिमत्वाची समूहावर पडलेली छाप, हीच गोष्ट आपली निवड होणार की नाही हे ठरवणार आहे. आपल्यातील नेतृत्वगुण, सकारात्मक दृष्टीकोन, इतरांना सामावून घेण्याची शैली, माहितीची मुद्देसूद मांडणी आणि चर्चेला अंतिम निष्कर्षाप्रत नेण्यासाठी आपला सहभाग – या सर्व बाबींचा ‘ग्रुप डिस्कशन’ दरम्यान आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडण्यासाठी मदत होणार आहे.
‘ग्रुप डिस्कशन’ मध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ गुणवत्ता असून चालत नाही, तर सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला स्वतःचे महत्व समूहाला पटवून देण्याचे कौशल्य प्राप्त करावे लागेल. केवळ तांत्रिक माहिती वा अभ्यास साहित्यांचे पाठांतर करण्याऐवजी, उमेदवाराने आपले व्यक्तिमत्व, इंग्रजी भाषेमध्ये स्वतःला व्यक्त करण्याचे कौशल्य आणि देहबोली सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर आपल्यात आत्मविश्वास असेल आणि सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आपण कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेतील ‘ग्रुप डिस्कशन’ चा टप्पा यशस्वीरित्या पार पाडू शकाल.
विचारा प्रश्न तुमच्या मनातला?
‘विचारा प्रश्न तुमच्या मनातला’ या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन व येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.) या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न ई–मेल मार्फत पाठवा .
ई–मेल – drsatishdhage@gmail.com
प्रश्न– सर, स्ट्रेस इंटरव्यू म्हणजे नेमके काय ?
– नितीन, औरंगाबाद.
उत्तर– नितीन, सर्वसाधारणतः यूपीएससी अथवा एमपीएससी परीक्षांच्या मुलाखतीचे मुलाखत मंडळ आणि त्यातील सदस्य हे उमेदवाराला त्याच्या comfort zone मध्ये ठेवून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात. मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखत मंडळ उमेदवाराच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज घेत असतात. काही वेळा मुलाखत मंडळ हेतुपुरस्सरपणे, उमेदवार कठीण परिस्थितीमध्ये कशा प्रकारे वागतो हे जाणून घेण्यासाठी उमेदवाराला अडचणीत टाकणारे आणि रागीट नजरेने विविध प्रश्नाचा भडीमार उमेदवारावर करतात. उमेदवाराने स्वतःचे नियंत्रण ढळू न देता शांत चित्ताने या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तर तो उमेदवार या स्ट्रेस इंटरव्यू मध्ये यशस्वी झाला, असे मानता येईल. विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीविषयी विस्तृत माहिती व मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)