नाविन्यपूर्ण ‘डी नोवो एसएसबी’ निवड चाचणी
भारतीय सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध परिक्षांमधील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे- एसएसबी ( Service Selection Board). भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध व्यक्तीगुणविशेषांची चाचपणी या एसएसबी परीक्षेच्या टप्प्यातून होत असते. भारतात आजघडीला उपलब्ध असणाऱ्या सर्व परीक्षांमधली सर्वांत खडतर आणि तब्बल पाच दिवसांपर्यंत चालणारी एकमेव मुलाखत चाचणी म्हणजे एसएसबी! १९४८ पासून ते आजतागायत या एसएसबी परीक्षेचं स्वरूप हे ढोबळमानानं एकसारखचं आहे आणि लवकरच या परीक्षा पद्धतीमध्ये काही मुलभूत बदल करण्याविषयी विचार होत आहे. नेमकी ही ‘डी नोवो एसएसबी निवड पद्धती’ कशाप्रकारे असू शकते आणि विद्यार्थी या परिक्षापद्धतीला कशा प्रकारे सामोरे जाऊ शकतात, या बाबींचा उहापोह आपण आजच्या या लेखातून करणार आहोत.
सैन्यदलात अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांमधील ‘मनसा, कर्मणा आणि वाचा’ यांच्याशी संबंधित पंधरा गुणविशेषांची चाचणी घेण्यासाठी तब्बल पाच दिवसांची एसएसबी चाचणी घेण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून DRDO अंतर्गत DIPR या संस्थेद्वारा या एसएसबी परिक्षापद्धतीमध्ये काही मुलभूत बदल करण्यासोबतच, या परीक्षेचा कालावधी पाच दिवसांच्या जागी तीन दिवस करता येईल काय? यांच्याशी संबंधित चाचण्या घेतल्या जात आहेत. ‘डी नोवो एसएसबी निवड पद्धती’ अनुसार एसएसबी चाचणीचा पहिला टप्पा (गाळणी चाचणी) हा उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने त्याच्या शहराजवळील अधिकृत ऑनलाईन केंद्रावरून देता येईल. एसएसबी चाचणीच्या या पहिल्या टप्प्यातून यशस्वी झालेल्या उमेदवारांना मात्र सैन्यदलाने निर्धारित केलेल्या एसएसबी परीक्षा केंद्रांवर यावे लागेल आणि दोन दिवसांचा एसएसबी परिक्षांचा दुसरा टप्पा तेथे पार पाडावा लागेल. एसएसबी चाचणीच्या या दुसऱ्या टप्प्यात -मुलाखत, मानसशास्त्रीय चाचण्या आणि जीटीओ टेस्ट- यांच्या माध्यमातून उमेदवारांचे व्यक्तिविशेष तपासण्याचा प्रयत्न केला जातो. जुन्या परिक्षापद्धतीमधील TAT चाचणीच्या जागी आता Situation Apperception Test (SAT) असेल आणि त्यामध्ये एकूण नऊ चित्रांवर आधारित काल्पनिक कथा दिलेल्या वेळेमध्ये उमेदवारांना लिहावी लागेल. आधीच्या WAT आणि SRT चाचण्यांमध्ये देखील आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत.
नवीन परीक्षापद्धतीनुसार जीटीओ चाचणीमध्ये, दिलेल्या विषयांवर लगेच बोलण्याशी संबंधित Lecturette चाचणी गाळली गेली असून, बाकी चाचण्यांच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात येणार आहेत. जीटीओ चाचणीमध्ये दोन वेगवेगळ्या विषयांवरील ‘ग्रुप डिस्कशन’ यांचा समावेश असून त्यानंतर दिलेल्या ‘टास्क’शी संबंधित Combined Situation Planning चाचणी असणार आहे. उमेदवारांचा शारीरिक कणखरपणा आणि त्यांची समूहासोबत काम करण्याची शैली तपासण्यासाठी विविध चाचण्यांचा समावेश केला जाणार आहे. जुन्या परिक्षापद्धतीमधील ‘कमांड टास्क’शी साधर्म्य असणारी ‘Leadership Situation’ चाचणीचा समावेश नवीन एसएसबी परीक्षा पद्धतीमध्ये असणार आहे. एकूण तीन दिवस चालणाऱ्या या परीक्षापद्धतीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या उमेदवाराची मुलाखत चाचणी असू शकेल. तिसरा आणि शेवटचा दिवस हा ‘Conference stage’ साठी राखीव असून, या दिवशी उमेदवाराने संपूर्ण एसएसबी चाचणीच्या दरम्यान केलेल्या प्रयत्नांचे मूल्यमापन केले जाईल आणि त्याच्या आधारावरच त्या उमेदवाराची निवड ठरविली जाणार आहे. गुणवत्ता चाचणीमध्ये कुठेही फेरफार न करता, ही एसएसबी चाचणी केवळ तीन दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न या ‘डी नोवो एसएसबी निवड पद्धती’ मध्ये असणार आहे.
दरवर्षी संपूर्ण भारतातून लाखो उमेदवार सैन्यदलात अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून वेगवेगळ्या एसएसबी प्रशिक्षण केंद्रात येतात आणि त्यातील अर्ध्यांहून जास्त गाळणी चाचणी टप्प्यातच अयशस्वी ठरतात. अशा लाखो उमेदवारांना ही परिक्षापद्धती कमी खर्चिक, सोयिस्कर ठरावी आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, यांसाठी ‘डी नोवो एसएसबी निवड पद्धती’मध्ये गाळणी चाचणी ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. पाच दिवसांच्या दिर्घ प्रक्रियेऐवजी तीन दिवसांचा एसएसबी परीक्षेचा दुसरा टप्पा उमेदवार तसेच एसएसबी परीक्षा केंद्रासाठी देखील सोयिस्कर ठरणार आहे. एकूण पंधरा व्यक्तिगुणविशेषांची एसएसबी चाचणीमधून चाचपणी करण्याऐवजी नऊ महत्वाच्या व्यक्तिगुणविशेषांची चाचपणी कली जाणार आहे. एसएसबी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणारी निवड ही मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारावर केली जात असल्यामुळे,त्यामध्ये होणारा बदल हादेखील शास्त्रीय पद्धतीने आणि योग्य त्या पूर्वचाचण्यांच्या आधारावरच केला जावा असं अपेक्षित आहे. आजघडीला जरी ‘डी नोवो एसएसबी निवड पद्धती’ सैन्यदलामार्फत स्वीकारली गेली नसली तरी येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीचा स्वीकार केला जाण्याची शक्यता आहे. भविष्यातील सर्व शक्यता लक्षात घेऊन सैन्यदलात अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक उमेदवारानं या नवीन निवड पद्धतीचा अभ्यास करावा आणि स्वतःला त्यासाठी सक्षम बनविण्यासाठी आतापासूनच तयारीला लागावं, जेणेकरून यश आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हुलकावणी देणार नाही.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)