मुलाखतीची पूर्वतयारी – भाग २

 In Dainik Gavkari

विद्यार्थीमित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता माहित असल्यामुळेच आपण मागील लेखापासून मुलाखतीच्या टप्प्याची तयारी करण्यासाठी ‘मुलाखतीची पूर्वतयारी’ या लेखमालेचा पहिला भाग आपल्यापर्यंत मागच्या आठवड्यात पोहोचविला. एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि या लेखाच्या सुरुवातीलाच सर्व यशस्वी उमेदवारांचे आपण हार्दिक अभिनंदन करू या ! तुमच्या अधिकारी बनण्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आता फक्त एक अडथळा पार करायचा बाकी आहे आणि तो म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी! आजच्या या लेखात आपण व्यक्तिमत्व चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या देह्बोलीविषयी माहिती घेणार आहोत.

यूपीएससी अथवा एमपीएससी सनदी सेवा परीक्षांच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी उमेदवाराने मुख्यतः चार बाबींवर विशेष भर देण्याची गरज असते. स्वतःविषयीची माहिती (personal biodata),पदाविषयीची माहिती (post details), चालू घडामोडींची इत्थंभूत माहिती (current affairs) आणि योग्य देहबोली व अभिव्यक्ती  (body language & aetiquettes) या चार गोष्टींवर आपणास विशेष मेहनत घ्यावी लागते. मागील लेखात आपण स्वतःविषयीची माहिती आणि पदाविषयीची माहिती या उपघटकांची मुलाखतीसाठी तयारी कशी करावी याची माहिती घेतली आहे. विख्यात व्यवस्थापन तज्ञ पीटर ड्रकर यांच्या मते संवाद कौशल्यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ आपण काय बोलतो ते शब्द नव्हेत तर ते कशा प्रकारे मांडण्यात आले ती मांडणी होय. स्पर्धात्मक परीक्षांच्या व्यक्तिमत्व चाचणीमध्ये सुध्दा तुमच्या ज्ञानाच्या जोडीस संवाद कौशल्य व त्याची योग्य मांडणी अतिशय महत्वाची ठरते.

मुलाखत मंडळात एक सदस्य हा मानसतज्ञ असतो आणि त्याचे काम हे शांतपणे तुमच्या देहबोलीला आणि व्यक्तिमत्वाला तपासणे आणि अभिप्राय देणे हे असते. तुमच्या मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला कळेल की, मुलाखत मंडळातील ज्या सदस्याने एकही प्रश्न विचारला नाही,परंतु जो शांतपणे आपले निरीक्षण करत होता तो व्यक्ती म्हणजे मानसतज्ञ.नकळतपणे तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग हा तुमच्या व्यक्तिमत्वाला व्यक्त  करीत असतो आणि म्हणूनच त्यावर विशेष मेहनत घेण्याची गरज असते. योग्यप्रकारे अभिव्यक्ती प्रदर्शन हे तुम्हाला मुलाखत टप्प्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.

मुलाखतीविषयी सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये बरेच गैरसमज असतात. कुठला पेहराव करावा, मुलाखतीच्या सुरुवातीला आणि शेवटी मुलाखत मंडळाला काय बोलावे, इंग्रजीमध्ये बोलावे की मराठीत बोलावे, उत्तरांची समयसीमा कितपत असावी, मुलाखतीला जाताना टाय आणि कोट घातलेच पाहिजे का? यांसारखे असंख्य प्रश्न उमेदवाराच्या मनात असतात. सर्व उमेदवारांनी लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे, व्यक्तिमत्व चाचणीमध्ये आपण आपल्या मुलभूत आणि नैसर्गिक व्यक्तिमत्वाच्या दायऱ्यात राहून त्यामध्ये वेळोवेळी भर घालण्याचा प्रयत्न करावा. लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व चाचणी ही व्यक्तीसापेक्ष असून त्यामध्ये कुठल्याच गोष्टीचे साचेबद्ध उत्तर किंवा साचेबद्ध मुलाखत पद्धती नसते.

एखाद्या यशस्वी उमेदवाराने काही विशिष्ट पेहेराव केला अथवा काही विशिष्ट पद्धतीने उत्तरे दिली म्हणजे तोच एकुलता एक योग्य मार्ग आहे असे होत नाही. मुलाखततंत्र हे  व्यक्तिपरत्वे बदलू शकते आणि म्हणूनच तुम्ही मुलाखातीदरम्यान एका सीमित दायऱ्यामध्ये नैसर्गिकपणे स्वतःला व्यक्त करणे हे कधीही सर्वोत्तम! मुलाखतीला जाताना आपला पेहेराव हा व्यक्तिमत्वाला साजेसा तसेच आपण ज्या पदासाठीच्या मुलाखतीला जात आहात त्याला अनुरूप असा असावा. म्हणूनच एका सरकारी सनदी सेवा अधिकाऱ्याला साजेसा असा पेहेराव आपण करावा. कोट आणि टाय घातलाच पाहिजे, असे कुठलेही बंधन नाही. योग्य शिष्टाचाराचा भाग म्हणून सुरुवातीलाच मुलाखत मंडळाला, विशेष करून मुलाखत मंडळातील स्त्री सदस्य व मुलाखत मंडळाचे अध्यक्ष्य यांना अभिवादन करावे.

मुलाखतीची पूर्वतयारी – भाग २

देहबोली विशेषज्ञ जेनेट लेन यांच्या मते तुमची अभिव्यक्ती हाच तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात सुंदर असा पेहेराव आहे आणि म्हणूनच आपल्या देहबोलीतून प्रसन्नता, आत्मविश्वास आणि नम्रता ह्या गोष्टी स्पष्टपणे दिसून आल्या पाहिजेत. आत्मविश्वासाचा अभाव दर्शविणाऱ्या गोष्टी (मुलाखत मंडळाशी Eye to eye contact न ठेवणे; नखे कुरतडणे ; पाय अथवा हाताची अनावश्यक हालचाल करत राहणे,ई.) टाळाव्यात. ताठ मान ठेवणे आणि खांदे एका सरळ रेषेत ठेवून पाठीचा कणा ताठ ठेवून बसणे, हे योग्य देहबोली व्यक्त करण्यासाठी आवश्यक आहे. आपण मुलाखत इंग्रजीमध्येच दिली पाहिजे,असा कुठलाही अट्टाहास नसतो. आपण स्वतःला ज्या भाषेत योग्य रीतीने व्यक्त करू शकतो ती भाषा आपण मुलाखतीसाठी निवडावी. मुलाखतीचा अर्ज भरताना आपल्याला भाषेची निवड करावी लागते. आपण मराठीत जरी मुलाखत देत असाल आणि मुलाखतकर्त्याने मुद्दामहून इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला तर आपण इंग्रजीमध्येच उत्तराची सुरुवात करण्याचा प्रयत्न करावा आणि नंतर मुलाखत मंडळाची मराठीतून उत्तर देण्यासाठी परवानगी घेवून मराठीत उत्तर द्यावे. आपण आपल्या उत्तरांमध्ये नेमकेपणा, साधेपणा आणि स्पष्टवक्तेपणा ठेवण्याचा प्रयत्न करावा.

प्रश्नांच्या उत्तरातील नाविन्य आणि originality, मुलाखत मंडळाला नक्कीच भावते. मुलाखातीदरम्यान मुलाखत मंडळातील सदस्यांशी एखाद्या विषयावर वितंडवाद आणि आपला हेकेखोरपणा टाळावा. संपूर्ण मुलाखतीदरम्यान संयम, आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवण्याचा उमेदवाराने प्रयत्न करावा.

मुलाखतीदरम्यान केवळ तुमचे शब्दच बोलत नसतात तर तुमची संपूर्ण देहयष्टी स्वतःला व्यक्त करत असते. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव,तुमचे डोळे,तुमचे खांदे,तुमचे हात,तुमचे पाय- हे शरीराचे विविध भाग तुमच्या शब्दांना जोड देत असतात. तुमची originality आणि व्यक्तिमत्वाचा खरेपणा या सर्व बाबींच्या एकत्रित विश्लेषणातून मुलाखत मंडळाला समजत असतो. त्यासाठी आत्मविश्वास, mock interviews आणि भरपूर सराव या बाबींवर आपल्याला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासपूर्वक मुलाखतीला सामोरे जा, यश शंभर टक्के तुमचेच आहे…

विचारा प्रश्न तुमच्या मनातला?

विचारा प्रश्न तुमच्या मनातला या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.) या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न मेल मार्फत पाठवा .

मेलdrsatishdhage@gmail.com

प्रश्न सर,एमपीएससी राज्यसेवा २०१६ परीक्षेची मुलाखत चाचणी केव्हा असेल ?      – प्रीती गायकवाड,बार्शी.

उत्तर प्रीती, नुकताच राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला आहे. आयोगाने  व्यक्तिमत्व चाचणी टप्प्याची तारीख जरी अधिकृतरीत्या जाहीर केलेली नसली, तरीही साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेवटी व मार्च महिन्यामध्ये व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा अपेक्षित आहे.दरम्यानच्या काळात आयोग मुख्य परीक्षा यशस्वी उमेदवारांची प्रमाणपत्रे, त्यांची वैद्यकीय चाचणी, ई. बाबींचे सोपस्कार पूर्ण करते. तेव्हा कुठलीही वाट न पाहता यशस्वी उमेदवारांनी मुलाखत तयारीला लागावे आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांनी येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या तयारीला जोमाने लागले पाहिजे. मुलाखातीविषयी विस्तृत माहिती व मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)

gstस्पर्धात्मक परीक्षांच्या नजरेतून निश्चलनीकरण धोरण