भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकाची स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी
भारतीय राज्यघटनेचा अभ्यास हा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षांचा एक अविभाज्य घटक आहे. भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्थेचे ज्ञान हे सर्व परीक्षार्थीना जसे आवश्यक आहे, तसेच सर्व जबाबदार आणि सूज्ञ भारतीय नागरिकांना देखील या विषयाचे ज्ञान असणे तितकेच गरजेचे आहे. आपल्याला या विषयाच्या अभ्यासातून एका सुशिक्षित भारतीय नागरिकाला आवश्यक असणारे कायद्याचे मुलभूत ज्ञान आणि आपले मुलभूत हक्क व जबाबदाऱ्याची जाणीव निर्माण होणे अपेक्षित आहे. आजच्या या लेखातून आपण भारतीय राज्यघटनेची यूपीएससी व एमपीएससी परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींचा उहापोह करणार आहोत.
भारतीय राज्यघटनेतील अभ्यासघटक – स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा तसेच व्यक्तिमत्व चाचणीसारख्या प्रत्येक टप्प्यात भारतीय राज्यघटनेचे ज्ञान परीक्षार्थीला असणे आवश्यक आहे. पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आणि गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर नजर टाकली असता आपल्या लक्षात येईल की, साधारणतः वीस ते पंचवीस टक्के प्रश्न हे भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था या घटकाशी निगडीत असतात. या घटकाशी निगडीत अभ्यासक्रमाचा परामर्श घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की, भारतीय राज्यघटना, भारतीय राज्यव्यवस्था,पंचायती राज व्यवस्था, सरकारी धोरणे,विविध हक्क,ई. महत्त्वाच्या बाबींचा आपणास अभ्यास करावा लागेल. नागरिकांचे मुलभूत हक्क,राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे, मुलभूत कर्तव्ये, सांसदीय कार्यपद्धती,विधिमंडळ, न्यायव्यवस्था,केंद्र-राज्य संबंध,जम्मू आणि काश्मीर संबंधित कलम ३७०, राज्यघटनेत वेळोवेळी केल्या गेलेल्या घटनादुरुस्त्या,मानवी हक्क – यांसारख्या घटकांवर आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागेल.
राज्यघटनेतील तरतुदींची मुलभूत समज ही विद्यार्थ्यांना आत्मसात करण्याशिवाय, या ज्ञानाचा दैनंदिन जीवनातील चालू घडामोडींशी समन्वय साधण्याचे कसब स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होण्यासाठी कामाला येते. जलीकट्टू प्रकरण आणि सांस्कृतिक व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असो, अरुणाचल प्रदेश आणि राज्यपाल महोदयांच्या अधिकाराचा विषय असो अथवा तामिळनाडू मधील राजकीय परिस्थिती आणि एस.आर. बोम्मई न्यायालयीन निकाल असो – यांसारख्या चालू घडामोडींबाबत राज्यघटनेच्या ज्ञानाच्या चष्म्यातून आपणास हा विषय अभ्यासावा लागतो. यूपीएससी आणि एमपीएससी मुख्य परीक्षांचा पेपर दोन हा भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे. एमपीएससी मुख्य परीक्षा पेपर दोन मध्ये भारतीय राज्यघटनेतील कलमांशिवाय,भारतीय राज्यव्यवस्था,राज्य सरकार व राज्यव्यवस्था,जिल्हा प्रशासन,पंचायती राजव्यवस्था,राजकीय पक्ष आणि दबाव गट,माध्यमे,निवडणूक पद्धती, विविध कायदे,ई. महत्वाच्या बाबींचा देखील यांत अंतर्भाव होतो.
परीक्षेतील एकूण गुणांचा विचार करता पूर्व परीक्षेतील एकूण गुणांच्या साधारणतः वीस ते पंचवीस टक्के गुण आणि मुख्य परीक्षेतील संपूर्ण पेपर दोन ( एमपीएससी १५० गुण आणि यूपीएससी २५० गुण) यांचा संबंध हा भारतीय राज्यघटना या घटकाशी आहे. याखेरीज व्यक्तिमत्व चाचणीतील बऱ्याचशा प्रश्नांचा संबंध हा भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्थेच्या ज्ञानाशी निगडीत आहे.त्याचबरोबर यूपीएससी परीक्षेतील २५० गुणांच्या निबंधाच्या प्रश्नपत्रिकेत देखील भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्थेशी संबंधित विषयांचा समावेश असतो. लोकप्रशासन व राज्यशास्त्र यांसारख्या वैकल्पिक विषयांची यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय राज्यघटनेचे ज्ञान त्या विषयाच्या पेपर दोन मध्ये फायदयाचे ठरते. म्हणूनच या घटकाचे स्थान स्पर्धात्मक परीक्षांच्या पूर्व,मुख्य आणि मुलाखत चाचणीच्या प्रत्येक टप्प्यात अतिशय महत्वपूर्ण आहे.
अभ्याससाहित्य- स्पर्धात्मक परिक्षांच्या अभ्यासक्रमाचे आणि गेल्या पाच वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर परीक्षर्थीना सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे अभ्यास साहित्याचा ! भाराभर क्लासेसच्या नोटस जमा करण्याऐवजी मूळ संदर्भ साहित्याचा अभ्यासासाठी उपयोग करणे कधीही फायद्याचे ठरते. NCERT अभ्यासक्रमाची इयत्ता आठवी ते बारावीची राज्यघटनेशी संबंधित पुस्तकांच्या अभ्यासाचा राज्यघटनेतील मुलभूत संकल्पना समजण्यासाठी आपल्याला निश्चितच फायदा होईल. गेल्या काही वर्षांतील यूपीएससी तसेच एमपीएससी प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पाहता राज्यघटनेच्या मूळ प्रती एकदा तरी वाचणे आवश्यक आहे आणि त्यासोबतीला एम.लक्ष्मीकांत या लेखकाद्वारे लिहिलेले भारतीय राज्यघटनेचे पुस्तक आपल्याला भारतीय राज्यघटनेशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी खूप फायद्याची ठरतील.
अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकांच्या वाचनाशिवाय राज्यघटना आणि राज्यव्यवस्थेशी संबंधित ईतर साहित्याच्या वाचनाचा देखील आपणास मुलाखत चाचणीवेळी फायदा होऊ शकेल. ‘We The People’ हे नानी पालखीवाला लिखित पुस्तक असेल किंवा ‘The Judiciary’,’ The Parliament’ यांसारखे एनबीटी प्रकाशनाद्वारे प्रकाशित पुस्तके देखील आपल्याला अवांतर वाचनासाठी उपयुक्त ठरतील. यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एम.पी.जैन द्वारा लिखित भारतीय राज्यघटनेचे पुस्तक अभ्यासावे किंवा सोबतीला डी. डी. बसू लिखित भारतीय राज्यघटनेच्या पुस्तकाची देखील मदत घ्यावी. आजच्या इंटरनेट युगात www.prsindia.org या संकेतस्थळावर विविध कायदे,त्यांचे प्रारूप व घटनादुरुस्ती संबंधित कायद्याची प्रारूपे एकाच ठिकाणी आपणास अभ्यासावयास मिळू शकतील.
विद्यार्थी मित्रानो, भारतीय राज्यघटनेची तयारी करतांना आपण समजून उमजून या घटकाचा अभ्यास केल्यास आपल्याला कुठलेही टेन्शन वाटणार नाही. चालू घडामोडींशी संबंधित विश्लेषण करत गेल्यास आपल्याला भारतीय राज्यघटनेची आणि राज्यव्यवस्थेशी संबंधित घटकाची विशेष गोडी निर्माण होते. या विषयाचे ज्ञान हे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तर आवश्यक आहेच आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे एक सनदी नागरी सेवेचा अधिकारी म्हणून वेळोवेळी आपल्याला या ज्ञानाचा फायदा होईलच होईल. सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, जोपर्यंत आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा आपल्या हक्कांप्रती आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी निगडीत कर्तव्यांप्रती जागरूक होत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्राचे राष्ट्रनिर्माण आणि भारत देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार होऊ शकणार नाही. यांसाठी आवश्यक आहे ती मुलभूत जाणीव- आपल्या राष्ट्राप्रती, राज्यघटनेप्रती आणि आपल्या कर्तव्यांप्रती !
विचारा प्रश्न तुमच्या मनातला?
‘विचारा प्रश्न तुमच्या मनातला’ या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन व येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न ई–मेल मार्फत पाठवा .
ई–मेल – drsatishdhage @ gmail.com
प्रश्न– सर, अभियांत्रिकी अंतिम वर्षातील विद्यार्थीदेखील सहायक आरटीओ निरीक्षक पदासाठी पात्र ठरतात का ?एक वर्षाच्या अनुभवाचा रकाना कासा भरावा? भैरव,हिंगोली.
उत्तर– भैरव, अभियांत्रिकी अंतिम वर्षातील विद्यार्थीदेखील सहायक आरटीओ निरीक्षक पदासाठी अर्ज करू शकतात. किमान एक वर्ष अनुभवाची पात्रता आपणास आपल्या प्रोबेशन कालावधीमध्ये सुध्दा पूर्ण करता येऊ शकते. या विषयाशी संबंधित माहितीपूर्ण लेख ‘दैनिक गावकरी’ वृत्तपत्रामध्ये दिनांक १४ फेब्रुवारी २०१७ च्या अंकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीविषयी आपल्या मनात असलेल्या शंकानिरसनासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे देखील भेट देऊ शकता.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)