व्यवहारतोल आणि चालू खात्यावरील तूट
यूपीएससी व एमपीएससी परीक्षांमधील अर्थव्यवस्थेवरील घटकांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच त्यासंबंधी विविध संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात. व्यवहारतोल,व्यापारतोल तसेच चालू खात्यावरील तूट या संकल्पना एकमेकांशी निगडीत आहेत, तसेच त्यांची पूर्ण समज आल्याशिवाय आपल्याला त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत. आजच्या या लेखात आपण याच संकल्पनांची माहिती घेणार आहोत.
व्यवहारतोल म्हणजे नेमके काय? आपल्याला माहित आहे की, आजघडीला प्रत्येक देश हा जगातील अन्य सर्व देशांशी विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर व नियमितपणे करत असतो. एका देशाने इतर सर्व देशांशी एका आर्थिक वर्षात केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचा व्यवस्थितपणे मांडलेला लेखाजोखा म्हणजे व्यवहारतोल. हा आर्थिक व्यवहार वेगवेगळ्या देशांशी असणाऱ्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असल्यामुळे त्यामध्ये एककांची समानता हवी, म्हणूनच ह्या सर्व व्यवहारांची मांडणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मार्फत निर्देशित BMP-6 या पद्धतीनुसार केली जाते व ती एकसमानता साधण्यासाठी व्यवहारतोल ताळेबंद अमेरिकन डॉलर या एककातच सर्व देश मांडतात. व्यवहारतोलामध्ये मुख्यतः चालू खाते व भांडवली खाते यांचा समावेश होतो.
चालू खात्यामध्ये दृश्य व अदृश्य खाते अशी पुनर्विभागणी करता येते. आपणास नावावरूनच लक्षात येईल की, दृश्य व्यापार म्हणजे वस्तू व्यापार, ज्या व्यापारातील घटक डोळ्यांना दिसू शकतात, त्यांची भौतिक देवाण-घेवाण करता येते. उदा. कापड, यांत्रिकी वस्तू, गाड्या, सोने,ई. दृश्य व्यापारातील या आयात व निर्यातीच्या पद्धतशीर नोंदणीलाच व्यापारतोल (Balance of Trade) असे म्हणतात. जर एखाद्या देशाचे निर्यातमूल्य हे आयातमूल्यापेक्षा जास्त असेल तर त्या देशाचा व्यापारतोल अनुकूल असतो आणि जर आयातमूल्य निर्यातमुल्यापेक्षा अधिक असेल तर व्यापारतोल प्रतिकूल आहे असे म्हणतात. चालू खात्याचा दुसरा भाग म्हणजे अदृश्य खाते, ज्यामध्ये सेवाव्यापार, उत्पन्न व ट्रान्सफर पेमेंट यांचा समावेश होतो. अदृश्य व्यापाराच्या घटकांना लक्षात ठेवण्यासाठी SIT (Services, Income, Transfer payments) या नेमोनीकचा आपण वापर करू शकाल.
सेवाक्षेत्रात होणारे व्यवहार; विविध कंपन्यांद्वारे दिले जाणारे लाभांश वा नफा वा व्याज आणि विदेशातून आपल्या देशात पाठविले जाणारे पैसे, देणगी, भेटवस्तू – यांचा समावेश अदृश्य खात्यामध्ये होतो. यांतील विदेशातून आपल्या देशात पाठविल्या जाणाऱ्या पैशांचे (Private remittance) एकूण मूल्य हे जगात सर्वात जास्त भारत देशात आहे. हे साहजिकच आहे की, केरळ राज्यातून विदेशात नर्स म्हणून काम करणाऱ्यांची संख्या, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विदेशात काम करणाऱ्यांची संख्या व त्या माध्यमातून भारतात पैसा पाठविणाऱ्या लोकांची संख्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा आकडा भारताच्या संदर्भात मोठा आहे.चालू खात्यामध्ये असणाऱ्या या विविध घटकांचा विचार करून , एका वर्षात होणाऱ्या या सर्व व्यवहारांचे निव्वळ मूल्य आपण काढले आणि हे निव्वळ मूल्य जर ऋण किमतीत असेल तर त्याला आपण ‘ चालू खात्यातील तूट’ (Current Account Deficit i.e. CAD) असे म्हणतो.
भारत देशाच्या संदर्भात हे मूल्य मुख्यतः आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होणारी खनिज तेलाची आयात व मोठ्या प्रमाणातील सोन्याची होणारी आयात यांच्याशी संबंधित आहे. आर्थिक वर्ष २०१६ मधील दुसऱ्या तिमाहीअखेर ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर, म्हणजेच जीडीपीच्या ०.१% इतका भारत देशासंदर्भात CAD राहिलेलें आहे, जो मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीच्या १.२% पेक्षा कमी आहे. व्यवहारतोलामधील भांडवली खात्यामध्ये गुंतवणूक,विविध कर्जे तसेच बँक भांडवलाचा समावेश होतो. या घटकांना लक्षात ठेवण्यासाठी LIB (Loans,Investment,Bank Capital) या नेमोनिकचा आपल्याला फायदा होईल. येथे दिलेल्या तक्त्यावरून आपणास व्यवहारतोलातील विविध घटकांची माहिती मिळू शकते.
भारत देशाच्या संदर्भात साधारणतः भांडवली खात्यावर अधिक्य व चालू खात्यावरील तूट असे चित्र पहावयास मिळते. व्यवहारतोलाच्या या गोळाबेरजेमागे लक्षात ठेवण्याजोगी बाब म्हणजे कोणत्याही देशाचा व्यवहारतोल हा नेहमी संतुलीतच असतो. जेव्हा आपण व्यवहारतोल अनुकूल वा प्रतिकूल आहे असे म्हणतो तेव्हा आपण त्यातील चालू खात्यावरील निव्वळ आकड्याविषयी भाष्य करत असतो. व्यवहारतोलातील भांडवली खात्यातील (परकीय गुंतवणूक,कर्जे) किंवा परकीय चलनसाठ्यातील पैशांचा उपयोग करून आपण चालू खात्यातील तूट भरून काढत असतो जेणेकरून आपला व्यवहारतोल हा नेहमी संतुलित राहील. १९९१ मध्ये भारत देशाला चालू खात्यातील तुटीचे संकट निर्माण झाले होते कारण उपलब्ध असणारा सर्व निधी तसेच परकीय चलन साठा वापरून देखील चालू खात्यावरील तूट काही भरून निघत नव्हती आणि म्हणूनच आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटीचा स्वीकार करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर्जे घेतली आणि आपले व्यवहारतोलाचे संकट संपुष्टात आणले.
दुहेरी तूट ही आणखीन एक याच्याशीच संबंधित संकल्पना असून दुहेरी तूट(twin deficit) म्हणजे चालू खात्यावरील तुटीसोबतच वित्तीय तुटीचे दुहेरी संकट होय. व्यवहारतोलावरील या सर्व चर्चेतून आपल्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल की, प्रतिकूल व्यवहारतोलाचा सामना करावयाचा असेल तर भारतासारख्या देशाला आपली खनिज तेलाची व सोन्याची आयात विदेशातून कमी करण्याकडे भर द्यावा लागेल व त्याबरोबरच प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक वा अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विदेशी चलनाचा साठा वाढविण्याकडे भर द्यावा लागेल. यांसाठी विदेशी गुंतवणूक धोरणात बदल, Ease of Doing Business धोरण, आर्थिक सुधारणा, कामगार धोरण सुधारणा – यांसारख्या आर्थिक सुधारणांचा समावेश करावा लागेल.
विचारा प्रश्न तुमच्या मनातला?
‘विचारा प्रश्न तुमच्या मनातला’ या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन व येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.) या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न ई–मेल मार्फत पाठवा .
ई–मेल – drsatishdhage@gmail.com
प्रश्न– सर, माझे B.A. पदवी शिक्षण पूर्ण झाले असून मला सैन्य अधिकारी होण्याची इच्छा आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल? -स्वप्निल पाटील, नांदेड.
उत्तर– स्वप्निल, आपले वय २५ वर्षांपेक्षा कमी असेल आणि आणि आपण पदवीच्या अंतिम वर्षात वा पदवीधारक असाल तर आपण Combined Defence Services (CDS) परीक्षेसाठी पात्र आहात.CDS परीक्षांच्या लेखी व SSB परीक्षांच्या टप्प्यातून निवड झाल्यानंतर आपली सैन्यात लेफ्टनंट या अधिकारी पदावर निवड होवू शकते. नुकतीच CDS परीक्षेची अधिसूचना यूपीएससीद्वारा जाहीर झाली आहे व online अर्ज करण्याची अंतिम तारीख ०२ डिसेंबर २०१६ आहे. आपण www.upsconline.nic.in संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती घेवू शकता अथवा एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद येथे भेट देवू शकता.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)