स्पर्धात्मक परीक्षांसाठी पूरक अभ्यास साहित्य – भाग २

 In Dainik Gavkari

विद्यार्थी मित्रांनो, ‘विविध वर्तमानपत्रांचे वाचन आणि त्याचा स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोग’ या विषयाची आपण मागील लेखात माहिती घेतली. आजच्या या लेखात आपण भारत सरकारद्वारा प्रकाशित विविध अहवाल, नियतकालिके आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी लागणाऱ्या ईतर पूरक अभ्यास साहित्याचा परामर्श घेणार आहोत.

आजचे युग हे माहितीचे युग आहे आणि माहितीच्या या जंजाळात स्पर्धात्मक परीक्षांच्या परीक्षार्थीने निरक्षीरविवेकबुद्धीने योग्य माहितीची निवड करणे आणि त्याचा आपल्या अभ्यासासाठी योग्य प्रकारे उपयोग करणे महत्त्वाचे ठरते. यासाठीच केंद्र व राज्य सरकारद्वारे प्रकाशित काही अहवालांचा आणि नियतकालिकांचा स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो.

यूपीएससी परीक्षेमधील भारतीय अर्थव्यवस्था घटकावर आधारित सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न हे भारत सरकारद्वारा प्रकाशित वार्षिक आर्थिक सर्वेक्षण अहवालावर आधारित असतात. केंद्रीय अर्थ मंत्रालयाद्वारा प्रत्येक अर्थसंकल्पाच्या आधी भारतीय अर्थव्यवस्थेचा गेल्या एक वर्षातील आर्थिक स्थितीचा लेखाजोखा देणारा हा अहवाल, प्रत्येक परीक्षार्थीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्राथमिक तसेच मुख्य परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या बऱ्याच प्रश्नांचे मूळ आपणांस या आर्थिक सर्वेक्षणात सापडेल. या अहवालामधील प्रत्येक घटकामध्ये दिल्या गेलेल्या चौकटीमधील माहिती व त्या माहितीच्या स्त्रोताकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे कारण त्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न व विश्लेषणात्मक प्रश्न परीक्षेत मोठ्या प्रमाणावर विचारले जातात. एमपीएससी राज्य सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

संदर्भ साहित्यामधील वा उपलब्ध पुस्तकांमधील जुन्या माहितीचा वा आकडेवारीचा आपल्या उत्तरांमध्ये समावेश करण्याएवजी, सरकारद्वारा प्रकाशित आर्थिक सर्वेक्षणातील माहितीचा आपणास आपल्या उत्तरांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. आर्थिक सर्वेक्षणाच्या सोबतीला राष्ट्रीय कृषी अहवाल व राष्ट्रीय औद्योगिक अहवालातील निवडक माहितीचा यूपीएससी मुख्य परीक्षेतील भूगोल व अर्थव्यवस्थेवरील प्रश्नांच्या उत्तरांची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थीसाठी अद्ययावत आर्थिक सर्वेक्षणाच्या जोडीला उपयोगी अशी महत्त्वाची मासिके म्हणजे भारत सरकारद्वारे प्रकाशित ‘योजना’ आणि ‘कुरुक्षेत्र’ मासिके! ‘योजना’ या मासिकामध्ये विकासाशी संबंधित विविध क्षेत्रातील विकासात्मक सरकारी योजनांची विश्लेषणात्मक माहिती आपणांस मिळते.

या मासिकाची खासियत म्हणजे प्रत्येक महिन्यात एका विशिष्ट विषयाला अनुसरून त्या विषयाच्या विविध अंगांशी निगडीत वेगवेगळ्या प्रकारचे लेख साध्यासोप्या भाषेत आपणांस एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. गेल्या तीन वर्षातील ‘योजना’ मासिकांचा अभ्यास केल्यास दूरसंचार,पायाभूत सुविधा,ग्रामीण विकास,शहरी विकास, आरोग्य – यांसारख्या वेगवेगळ्या विषयावरील विविध घटकांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी आपणांस प्राप्त होऊ शकते. त्याचप्रकारे कृषी घटक,जलसंधारण,आपत्ती व्यवस्थापन,सौरऊर्जा,ई. घटकांची माहिती आपल्याला ‘कुरुक्षेत्र’ मासिकामधून मिळू शकते. भूगोल वैकल्पिक विषयाची मुख्य परीक्षेसाठी तयारी करतांना या मासिकाचा विशेष करून उपयोग होऊ शकतो. एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘योजना’ मासिक हे मराठी व हिंदी भाषेत सुद्धा उपलब्ध आहे.

त्यांनी या मासिकाच्या सोबतीला महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित ‘लोकराज्य’ मासिक देखील जरूर वाचावे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विकासात्मक कार्यक्रमांचा लेखाजोखा आपणास या मासिकाच्या स्वरुपात मिळू शकतो. सरकारद्वारे प्रकाशित केल्या जाणाऱ्या या मासिकांची किंमत अतिशय वाजवी असून आपल्याला इंटरनेटवर ही मासिके निशुल्क उपलब्ध होऊ शकतात. यूपीएससी मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम हा अतिशय विस्तृत असून त्यासाठी  चालू घडामोडींचा व अद्ययावत माहितीचा आपल्याला आपल्या अभ्यासात समावेश करणे आवश्यक ठरते. Administrative Reforms Commission (ARC) द्वारे प्रकाशित अहवालांचा आपल्याला सुप्रशासन,दहशतवाद,आंतरिक सुरक्षा,आपत्ती व्यवस्थापन,ई. घटकांची तयारी करण्यासाठी खूप फायदा होतो.

स्पर्धात्मक परीक्षांसाठी पूरक अभ्यास साहित्य – भाग २

यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन  पेपर -४ विषयाच्या तयारीचा मुख्य पाया हा ARC चा अहवाल क्रमांक चार यामधून चांगल्या प्रकारे होतो. सरकारी अहवाल व मासिकांच्या जोडीला आपणास आणखीन काही मासिकांचा विश्लेषणात्मक उत्तरे लिहिण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या यादीमध्ये ‘Frontline’ या मासिकाचा व ‘The Economic and Political Weekly’ या साप्ताहिकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. यूपीएससी मुख्य परीक्षेतील प्रश्नांच्या उत्तरांना अपेक्षित असणारी गुणवत्ता या मासिकांच्या वाचनातून व विश्लेषणातून प्राप्त होऊ शकते. ‘The Economic and Political Weekly’ या मासिकाच्या वाचनातून आपली २५० गुणांच्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील निबंध विषयाची तयारी होण्यास देखील मदत होते. ‘लोकप्रशासन’ तसेच ‘राज्यशास्त्र’ या वैकल्पिक विषयाची यूपीएससी परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी IIPA द्वारा प्रकाशित होणाऱ्या तिमाही नियतकालिकांचा फायदा होऊ शकतो. ‘लोकप्रशासन’ या विषयातील तसेच सुप्रशासनाशी संबंधित अद्ययावत संकल्पनांची माहिती आपणांस या नियतकालिकांद्वारे मिळते.

आजच्या इंटरनेट युगात विविध संकेतस्थळावर उपलब्ध माहितीचा उपयोग स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी उत्कृष्टरित्या होऊ शकतो.संकेतस्थळांच्या या यादीमध्ये विविध सरकारी विभागांच्या जोडीला आवर्जून उल्लेख करावा असे संकेतस्थळ म्हणजे www.prsindia.org. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपणास विविध प्रकारचे कायदे, संसदेच्या विचाराधीन असणारी विविध कायदा प्रारूपे यांची इत्थंभूत माहिती उपलब्ध होते. इंटरनेटच्या जोडीला काही दृकश्राव्य माध्यमांचा देखील आपणांस फायदा होऊ शकतो. आकाशवाणी, लोकसभा, राज्यसभा- यांच्यासारख्या सरकारी माध्यमांतून स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी पडतील अशा दर्जेदार कार्यक्रमाची निर्मिती होते. ‘सरोकार’, ‘देशांतर’, ‘संविधान’,ई. कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला दर्जेदार माहिती मिळते तसेच त्यांचा विश्लेषणात्मक उत्तरांची तयारी करण्यासाठी व मुलाखतीमधील चालू घडामोडींवरील प्रश्नांची तयारी करण्यासाठी फायदा होतो.

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशासाठी ढोरमेहनतीची गरज नसते तर गरज असते ती नियोजनबद्ध व विश्लेषणात्मक तयारीची! या तयारीसाठी पुस्तकांसोबतच ईतर पूरक साहित्याचा देखील उपयोग आपल्याला योग्यप्रकारे करता आला तर आपल्याला यश हमखास प्राप्त होते. तेव्हा यशप्राप्तीसाठी गरज आहे ती ध्येयावरून लक्ष्य विचलीत न होऊ देता अविरत प्रयत्न चालू ठेवण्याची…

विचारा प्रश्न तुमच्या मनातला?

विचारा प्रश्न तुमच्या मनातला या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.) या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न मेल मार्फत पाठवा .

मेलdrsatishdhage@gmail.com

प्रश्न सर, माझे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे. MPSC राज्यसेवा २०१७ परीक्षा कधी असेल?      – रोहिणी चौधरी,औरंगाबाद

उत्तर रोहिणी, स्वप्न पाहणे ही यशाची पहिली पायरी असते. आपले उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचा टाईमटेबल MPSC द्वारा नुकताच जाहीर झाला आहे. वर्ष २०१७ मध्ये MPSC द्वारा होणाऱ्या सर्व परीक्षांच्या तारखा आयोगाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. राज्यसेवा परीक्षांची प्राथमिक परीक्षा २ एप्रिल २०१७, मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१७ व मुलाखत डिसेंबर २०१७ मध्ये अपेक्षित आहे.तेव्हा जराही वेळ न दवडता तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तयारीला लागा. आणखीन विस्तृत माहिती व मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)

मुलाखतीची पूर्वतयारीभारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया