आंतरिक सुरक्षा घटकाची तयारी
भारत देशाच्या आंतरिक सुरक्षेची चर्चा करतांना नक्षलवादापासून ते दह्शतवादापर्यंत आणि पूर्वोत्तर राज्यांमधील अलिप्ततावादी चळवळीपासून ते सायबर गुन्हेगारीपर्यंत विविध अंगाने चर्चा करावी लागते. विविधतेने नटलेल्या व सर्व जातिधर्माना सामावून घेणाऱ्या भारतासारख्या लोकशाही व सहिष्णू राज्यव्यवस्थेत विविध प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. याच अनुषंगाने यूपीएससी, एमपीएससी, सैन्यदलातील अधिकारी पदे, विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांमधील ग्रुप डिस्कशन चाचणी – यांच्या तयारीसाठी आवश्यक लागणारी ‘आंतरिक सुरक्षा घटकाची’ तयारी कशी करावी याचा आढावा आजच्या या लेखामधून आपण घेणार आहोत.
स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मुख्यत्वे करून यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आंतरिक सुरक्षा या घटकांतर्गत सहा उपघटकांचा समावेश होतो. विकासाचा अभाव व नक्षलवाद यांचा परस्परसंबंध, पूर्वोत्तर राज्यांतील अलिप्ततावादी चळवळी व हिंसाचार , आंतरराष्ट्रीय दहशतवाद,सायबर दहशतवाद,संघटीत गुन्हेगारी व काळा पैसा- हे सहा उपघटक होत. या अभ्यासक्रमाचे विश्लेषण केल्यास आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की, आंतरिक सुरक्षेला धोका पोहोचविणाऱ्या या सर्व घटकांना केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून विचार न करता, त्याच्या जोडीला विकासाची व वेळोवेळी चर्चेचीही जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच या सर्व घटकांचा समावेश आंतरिक सुरक्षेशी संबंधित वेगवेगळे प्रश्न म्हणून अभ्यासक्रमात केला गेला आहे. सरकारी सेवेत काम करतांना सरकारी ध्येयधोरणांची देशासमोरील विविध जटील प्रश्न सोडविण्यासाठी अंमलबजावणी करणे, हे सनदी अधिकाऱ्याचे कर्तव्य असते.
नक्षलवाद व विकासाचा संबंध अभ्यासताना हाच सरकारी दृष्टीकोन आपल्याला अंगीकारावा लागतो. नक्षलवादाचा प्रश्न अभ्यासताना आपणास १९६७ मधील पश्चिम बंगालमधील दार्जीलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी गावातील जमीनदार व शेतकरी वर्गातील भूसुधारणासाठी होणाऱ्या लढ्यापासून ते आजघडीला माओवादी हिंसक डाव्या पक्षांच्या सशस्त्र क्रांतीच्या ‘लाल सलाम’ पर्यंत ‘नक्षलवाद’ या प्रश्नाची एतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. आपल्या अभ्यासात गेल्या पाच दशकात नक्षलवादाचा प्रश्न भारत देशातील दहा राज्यांतील अडीचशे हून अधिक जिल्ह्यांमध्ये फोफावल्याची विविध कारणे अभ्यासावी लागतील. नक्षलवादाची चळवळ फोफावण्याच्या कारणांचा अभ्यास करतांना नक्षलग्रस्त आदिवासी बहुल प्रदेशातील प्रशासकीय पोकळी, विकासाचा अभाव, जल,जंगल आणि जमिनीशी निगडीत आदिवासी लोकांचे प्रश्न व शासकीय अनास्था या सर्व बाबींची सांगड आपणास नक्षलवादाच्या प्रश्नाशी घालावी लागेल. नेमक्या विकासाच्या याच अभावाचा गैरफायदा नक्षलवादी संघटना स्थानिक लोकक्षोभाला हिंसक वळण देण्यासाठी आणि स्थानिक आदिवासींना हिंसात्मक उठाव करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी करून घेतात.
नक्षलवादाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी देण्यात येणाऱ्या उपायांमध्ये केवळ कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी सुधारणा सुचविण्याएवजी विकासात्मक दृष्टीकोन व सर्वसमावेशक विकास धोरण यांवर आपल्याला विशेष भर दयावा लागेल. नक्षलवादाचा प्रश्न अभ्यासताना आपला दृष्टीकोन हा भावनात्मक न ठेवता, एका सनदी अधिकाऱ्याच्या नजरेतून आणि भारतीय राज्यघटच्या तरतुनेदीनुसार प्रश्न सोडविण्याचा सोडविण्याचा असावा. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पोलीस व निमलक्षरी दलांमार्फत केले जाणारे उपाय, नक्षलग्रस्त भागाचा सामाजिक आणि आर्थिक विकास,वनसंपत्ती व त्यासंबंधीचे अधिकार तसेच विकेंद्रीकरणाचे आदिवासी लोकांपर्यंत पोहोचविले जाणारे फायदे आणि नक्षलवादाच्या विचारसरणीला खोडून काढणारे सरकारी विचारपरिवर्तन धोरण- या गोष्टींचा समावेश असावा.
पूर्वोत्तर राज्यांमधील अलिप्ततावादी चळवळ हा आंतरिक सुरक्षा घटकातील अभ्यासावा लागणारा आणखी एक घटक आहे. शेकडो जातीजमाती व त्यांचा स्वतंत्र राज्य अथवा राष्ट्रासाठी चालणारा आटापिटा, यांचा आपल्याला या घटकात अभ्यास करावा लागतो. प्रत्येक पूर्वोत्तर राज्यांतील सामाजिक,आर्थिक,राजकीय परिस्थिती तसेच तेथीलल जातीय समीकरणे यांची पार्श्वभूमी आपल्याला या घटकाचा अभ्यास करतांना ठेवावी लागते. अभ्यासामध्ये आपला विशेष भर Armed Forces Special Power Act, १९५८ व त्याचे फायदे आणि तोटे याच्याशी संबंधित असावा. त्याचबरोबर ‘मिझो करार’ आणि नुकताच नरेंद्र मोदी सरकारने NSCN(IM) संघटनेशी केलेला ‘नागा करार’ याचाही आपणास अभ्यास करणे आवश्यक आहे.
दहशतवाद या उपघटकाचा अभ्यास करतांना दहशतवादाच्या व्याख्येपासून,त्याचे प्रकार, कारणे, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, कार्यपद्धती, विविध दहशतवादविरोधी कायदे,भारतातील दहशतविरोधी कार्य करणाऱ्या संस्था,ई. बाबींचा आपणास अभ्यासात समावेश करावा लागेल. २६/११ मुंबई हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा व्यवस्थेत आणि सरकारी धोरणात झालेले बदल याचा आपणास बारकाईने अभ्यास करणे अपेक्षित आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात दहशतवाद आणि सायबर जगत यांचे विषारी मिश्रण आणि त्यांचे दुष्परिणाम याचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश आहे. सोशल मीडिया व दहशतवादाचा प्रसार, सायबर दहशतवाद, त्याची कार्यपद्धती, सायबर दह्शातवादाविरुद्ध भारतात कार्यरत असणाऱ्या संस्था,ई. बाबींचा आपल्याला अभ्यास करणे अपेक्षित आहे. संघटित गुन्हेगारी,समांतर अर्थव्यवस्था व त्याच्याविरुद्ध उपाययोजना यांचाही आपणास परामर्श घेणे आवश्यक आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे भारतातील विविध सुरक्षा संस्था व त्यांची कार्ये यांचादेखील अभ्यासक्रमात समावेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सैन्यदल आणि विविध निमलक्षरी दले यांची कार्यपद्धती व जवानांचे खालावणारे राहणीमान याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन निमलक्षरी दले व सैन्यदले यांचा आपणास तुलनात्मक अभ्यास करणे देखील आवश्यक आहे.
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्वाचा आहे. येणाऱ्या रविवारी होणारी विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा, गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली राज्य सेवा मुलाखत चाचणी आणि यूपीएससी मुख्य परीक्षांच्या निकालाची वाट पाहणारे परीक्षार्थी- अशी विद्यार्थ्यांची आजघडीला स्थिती आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सर्व परीक्षार्थीना हार्दिक शुभेच्छा…
विचारा प्रश्न तुमच्या मनातला?
‘विचारा प्रश्न तुमच्या मनातला’ या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन व येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.) या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न ई–मेल मार्फत पाठवा .
ई–मेल – drsatishdhage@gmail.com
प्रश्न– सर, मी अभियांत्रिकी तृतीय वर्षात Electrronics ब्रांच मध्ये शिकत आहे. मी भारतीय वन सेवा परीक्षा (Indian Forest Services) देण्यासाठी पात्र आहे का?
– संकेत , औरंगाबाद.
उत्तर–संकेत, UPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या भारतीय वन सेवा परीक्षेसाठी (Indian Forest Services) आपली अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यानंतर आपण पात्र होऊ शकाल. आपण अभियांत्रिकी शिक्षण घेत असल्यामुळे भारतीय वन सेवा परीक्षेसाठी (Indian Forest Services) पात्रता धारण करता. येणाऱ्या काही लेखामध्ये आपण नक्कीच भारतीय वन सेवा परीक्षा (Indian Forest Services) तयारीविषयी मार्गदर्शनपर लेख प्रकाशित करू, ज्याचा फायदा आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल. भारतीय वन सेवा परीक्षा (Indian Forest Services) व त्या परीक्षेच्या तयारीविषयी विस्तृत माहिती व मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)