अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आरटीओ निरीक्षक बनण्याची संधी
आजचा अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी रोजगार संधींच्याबाबत दुहेरी कात्रीत अडकलेला दिसतोय. एकीकडे दिवसेंदिवस वाढत जाणारी खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या आणि दुसरीकडे औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात आर्थिक मंदीच्या फटक्यामुळे रोडावणारी रोजगारांची संख्या- अशा दुहेरी कात्रीत आजचा अभियांत्रिकी विद्यार्थी अडकलेला आहे. या संकटातून जर त्याला सुटका करून घ्यायची असेल तर उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधींचे सोने करणे हा एकुलता एक उपाय त्याच्यासमोर आहे. नुकतीच एमपीएससी मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण १८८ पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. अभियांत्रिकी पदविका तसेच पद्वीधारकांसाठी आपले पदवी अथवा पदविका शिक्षण पूर्ण होताच लगेच सरकारी नोकरीत प्रवेश करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. आजच्या या लेखातून आपण सहायक मोटार वाहन निरीक्षक २०१७ परीक्षेची माहिती व त्याची तयारी या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करनार आहोत.
एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक २०१७ परीक्षेतून एकूण १८८ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचे असून प्राथमिक व मुख्य परीक्षेच्या टप्प्यांना विद्यार्थ्याना यासाठी सामोरे जावे लागणार आहे. एकूण १०० गुणांची वस्तुनिष्ट बहुपर्यायी पूर्व परीक्षा ३० एप्रिल २०१७ रोजी प्रस्तावित आहे. पूर्व परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०६ ऑगस्ट २०१७ रोजी मुख्य परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. १८ ते ३८ वर्षे वयोगटातील सर्व पात्र अभियांत्रिकी पदवी अथवा पदविका धारक या परीक्षेसाठी दिनांक १९ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने एमपीएससी आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.
या परीक्षांसाठी मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, प्रोडक्शन इंजिनीअरिंग अथवा इंडस्ट्रीअल इंजिनीअरिंग शाखेतील पदवीधर अथवा अंतिम वर्षातील विद्यार्थी पात्र आहेत. त्याचबरोबर डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नोलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन मशिन टूल्स मेंटेनन्स, डिप्लोमा इन फेब्रीकेशन टेक्नोलॉजी, डिप्लोमा इन फेब्रीकेशन टेक्नोलॉजी इरेक्शन इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन प्लांट इंजिनीअरिंग किंवा डिप्लोमा इन मेटलर्जी या शाखेतील पदविकाधारक देखील या परीक्षांसाठी पात्र आहेत.या पदांसाठी आवश्यक असणारी एक वर्ष अनुभवाची अट ही परीक्षार्थीद्वारे परीक्षविधीन कालावधीमध्ये देखील पूर्ण करता येत असल्यामुळे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना देखील या परीक्षा देता येतील. या परीक्षांसाठी महिला,खेळाडू तसेच माजी सैनिकांसाठी काही जागा स्वतंत्रपणे आरक्षित आहेत. शारीरिक अर्हतेमध्ये पुरुषांसाठी १६३ सेमी तर महिलांसाठी १५५ सेमी उंची ही किमान अट ठेवली गेलेली आहे.
सहायक मोटार वाहन निरीक्षक २०१७ पूर्व परीक्षा ही एकूण १०० गुणांची परीक्षा असून, परीक्षार्थीना १०० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांना एका तासात सामोरे जावे लागणार आहे. सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी आणि यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचलित अभियांत्रिकी विषयांच्या मुलभूत संकल्पना व अद्ययावत तंत्रज्ञान, या घटकांवर आधारित प्रश्न या पूर्व परीक्षेत विचारले जातील. आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, अर्थव्यवस्था,राज्यघटना व ग्रामप्रशासन,मुलभूत विज्ञान आणि चालू घडामोडी या घटकांशी संबंधित प्रश्न पूर्व परीक्षेत विचारले जातील. पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी घटकांचा स्तर हा माध्यमिक शाळांच्या स्तराचा असून, यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचलित अभियांत्रिकी संबंधित घटकांचा स्तर हा पदविका परीक्षेच्या स्तराचा असेल.
पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना मुख्य परीक्षेचा टप्पा पार पाडावा लागेल. यासाठी १५० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची ९० मिनिटांची मुख्य परीक्षा असेल. मेकॅनिकल इंजिनीअरिंग व ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग शाखेसंबंधित १२० प्रश्नांचा ‘सेक्शन अ’ हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अनिर्वार्य असून ‘सेक्शन ब’ अथवा ‘सेक्शन क’ मधील ३० प्रश्नांचा कुठलाही एकच सेक्शन विद्यार्थी सोडवू शकतील. मुख्य परीक्षेचा स्तर हा अभियांत्रिकी विषयाच्या पदविका परीक्षेच्या स्तराचा असेल.
पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेता चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि सर्व विषयांची मुलभूत संकल्पनांची तयारी या त्रिसूत्रीवर हा टप्पा परीक्षार्थीना लीलया पार पाडता येईल. गेल्या काही वर्षातील एमपीएससी मार्फत घेतल्या गेलेल्या पीएसआय,एसटीआय,सहायक,वन सेवा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे आपण जर विश्लेषण केले आणि त्या आधारे आपली परीक्षेची तयारीची दिशा ठरविली तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकाल. या परीक्षेसाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे केवळ एका तासात १०० प्रश्न सोडविण्याची कला आत्मसात करणे. यासाठी बुद्धीमत्ता चाचणी संबंधित प्रश्नांचा नियमितपणे सराव करणे आणि कमीत कमी वेळात ते प्रश्न अचूकपणे सोडविण्याची युक्ती शोधून काढणे, हे कौशल्य आपणांस आत्मसात करावे लागेल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याचा भरपूर सराव व चालू घडामोडींवर विशेष लक्ष ठेवणे आपल्याला या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहे.
सहायक मोटार वाहन निरीक्षक २०१७ पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षापद्धती लक्षात घेता येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये या परीक्षेची परिपूर्ण तयारी करणे हे सहज शक्य आहे. इंजिनीअरिंग पदवी धारण केल्यानंतर बेरोजगार फिरण्याएवजी एखादी सरकारी नोकरी आपल्या हाताशी असणे, आपल्या भावी करीअरसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल. पाच वर्षांहून अधिक काळानंतर एमपीएससी मार्फत आरटीओ वाहन निरीक्षक बनण्याची ही परीक्षा आयोजित केली जात असल्यामुळे अभियांत्रिकी पदवी व पदविका धारकांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. तेव्हा लवकरात लवकर या परीक्षांचा फॉर्म भरून योग्य दिशेने तयारीला लागणे, ही आपण यशस्वी होण्यासाठी प्रथम पायरी ठरू शकेल. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि यशस्वी होण्यासाठी जोमाने तयारीला लागा.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)