स्पर्धात्मक परीक्षेत यशासाठी इंग्रजीची भिती घालवा
आजघडीला प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेसाठी इंग्रजी विषयाचे मुलभूत ज्ञान हे अत्यावश्यक आहे. यूपीएससी,एमपीएससी,सैन्यदलातील अधिकारी पदे, बँकिंग परीक्षा- यांसारख्या विविध परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी इंग्रजीचे मुलभूत ज्ञान आणि त्या भाषेत स्वतःला व्यक्त करण्याचे कौशल्य आपणांस आत्मसात करावे लागते. आपले दुर्दैव असे की, इंग्रजीचे नाव काढताच महाराष्ट्रातला मराठी माध्यमातला विद्यार्थी , विशेष करून मराठवाडयातील ग्रामीण भागातील विद्यार्थी घाबरून जातो आणि परिणामी वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षांपासून दूर लोटला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजीविषयीचा हाच न्यूनगंड त्यांना अधिकारी बनण्याच्या त्यांच्या स्वप्नापासून त्यांना दूर ठेवतो. खऱ्या अर्थाने गुणवत्ता असूनही केवळ इंग्रजी विषयाचा बाऊ केल्यामुळे ग्रामीण भागातला विद्यार्थी आज या क्षेत्रांत मागे पडतोय. आजच्या या लेखातून आपण इंग्रजीची हीच भिती दूर घालवून, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
इंग्रजी भाषा ही जशी आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून कार्यालयीन कामकाजासाठी सर्वमान्य आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये देखील सरकारी कामकाजासाठी वापरली जाणारी भाषा म्हणून इंग्रजी भाषेला मान्यता आहे. आजघडीला इंग्रजीमध्ये बोलणे, लिहिणे, स्वतःला व्यक्त करणे – हे एक प्रकारे बुद्धिमत्तेचे आणि गुणवत्तेचे लक्षण मानले जाते. विविध विषयांतील जागतिक दर्जाचा ज्ञानाचा खजिना आजघडीला इंग्रजी माध्यमातील पुस्तकांमधून मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.त्याचप्रमाणे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये देखील आपणास इंग्रजी माध्यमातील विविध संदर्भ साहित्याचा वेळोवेळी उपयोग होतो. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये हमखास इंग्रजी विषयाच्या आकलनासंबंधीचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात विचारले जातात. इंग्रजीमधील गद्य उतारे असोत, व्याकरणासंबंधी प्रश्न असोत वा ‘word assciation test’ असो – यांसारख्या विविध प्रश्नांच्या माध्यमातून या परीक्षांतील परीक्षार्थीचे इंग्रजी विषयाचे मुलभूत ज्ञान तपासण्याचा प्रयत्न केला जातो.
इंग्रजी विषयाचे आजच्या या स्पर्धायुगातले महत्व लक्षात घेवूनच, आपणांस आजघडीला शिक्षणाच्या या बाजारात झटपट इंग्रजी बोलण्याची हमी देणाऱ्या असंख्य लुभावण्या जाहिरातींनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येईल. पण खरोखरच अशी पद्धत वापरून आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेत इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळविता येईल का? काही तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळविण्याच्या जाहिराती या केवळ फसव्याच नाहीत, तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही कमी करणाऱ्या आणि शिक्षणव्यवस्थेवर दूरगामी प्रतिकूल परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळेच आजचा आपला मराठी विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत इंग्रजी विषयावर आधारित प्रश्नांना बगल देताना आढळतो. स्पर्धात्मक परीक्षेतल्या इंग्रजीवर आधारित प्रश्नांमधून जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करण्याचे सोडून, इंग्रजी विषयातील अर्हता मिळविण्यासाठी लागणाऱ्या कमीत कमी गुण मिळविण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला दिसतो.
खरोखरच इंग्रजी भाषा एवढी कठीण आहे का? इंग्रजी विषयातून आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवून उच्च अधिकारी पद मिळविण्याचे आपले स्वप्न साकारता येणार नाही का? आत्मविश्वासाने आणि टप्प्याटप्प्याने जर आपण इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळविण्यासाठी प्रयत्न केला तर हे नक्कीच शक्य आहे आणि त्यासाठी गरज आहे ती योजनाबद्ध पद्धतीने, जिद्दीने आणि नियमितपणे ‘ मिशन इंग्रजी सक्सेस’ ची कस धरण्याची!
‘ मिशन इंग्रजी सक्सेस’ पद्धत ही स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या मराठी माध्यमातल्या आणि मुख्यतः ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असणाऱ्या विविध कामांमधूनच आपणास इंगजी विषयावर प्रभुत्व मिळविण्याचा मार्ग शोधता येईल. जसे की ,विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी हा नियमितपणे वर्तमानपत्र वाचन करत असतो. आपण विशेष लक्ष देवून दररोज मराठी वृत्तपत्रासोबतच ‘ द हिंदू’ अथवा ‘ इंडियन इक्सप्रेस’ सारखे इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याची सवय जडवली तर आपणांस त्याचा नक्कीच दूरगामी सकारात्मक फायदा झालेला दिसेल. याचा फायदा असा की, मराठी वृत्तपत्रातून वाचलेल्या बातम्यांचा मतितार्थ आपणास कळलेला असतोच, जो की आपण तीच बातमी इंग्रजी वृत्तपत्रातून वाचल्यानंतर इंग्रजीतून समजण्यास होईल. वृत्तपत्र वाचण्याच्या पद्धतीमध्ये आणखीन एक नाविन्यपूर्ण गोष्टीचा तुम्ही अंतर्भाव करू शकाल. ‘द हिंदू’ सारख्या इंग्रजी वृत्तपत्रामधील संपादकीय अथवा नामवंत लेखकांद्वारे लिहिल्या गेलेल्या लेखांमधून आपल्याला अवघड वाटणाऱ्या शब्दांची यादी डीक्शनरीच्या मदतीने एका डायरीमध्ये त्याच्या अर्थासहित लिहिण्याची सुरुवात तुम्ही करा. स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या या प्रवासात अशा प्रकारची पद्धत अवलंबिल्यामुळे काही काळानंतर तुमचे तुम्हालाच जाणवेल की, आधी तुमच्या ओळखीचे नसणारे बरेचसे इंग्रजी शब्द आता मात्र तुम्हाला परिचयाचे झालेले आहेत आणि त्यामुळे तुमच्या इंग्रजी विषयातल्या शब्द्संग्रहामध्ये केवळ काही महिन्यांतच प्रचंड वाढ झालेली आहे.
या गोष्टींचा नकळतपणे फायदा तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांमधील इंग्रजी उताऱ्यावर आधारित प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होईल. त्याचबरोबर सीडीएस,एसएसबी-यांसारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अशा नवीन माहित झालेल्या एका इंग्रजी शब्दापासून कमीत कमी पाच नवीन वाक्ये तयार करण्याचा सराव करावा, जेणेकरून तुम्हाला ‘word association test’ मध्ये याचा फायदा होईल आणि सोबतच इंग्रजीची मनातील भितीही कमी होईल. तिसरी गोष्ट म्हणजे आपण मुद्दामहून स्वतःशीच इंग्रजीमध्ये बोलण्याचा व विचार करण्याचा प्रयत्न करावा. दररोज रात्री झोपताना स्वतःच्या मनातच अशा प्रकारे ‘ self talk ’ करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नवनवीन वाक्ये बनविण्यासाठी आणि इंग्रजीमध्ये स्वतःला व्यक्त करण्यासाठी याची मोलाची मदत होईल.
याचा पुढचा टप्पा म्हणजे, ज्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे असा तुमचा हितचिंतक अथवा जिवाभावाचा मित्र किंवा भाऊ-बहीण ,यांच्याशी तुम्ही केवळ आणि केवळ इंग्रजीमध्येच बोलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला शब्द सापडणार नाहीत, तुमचा मित्र तुमच्यावर इंग्रजीच्या अज्ञानावर हसेल; परंतु काही महिन्यानंतर तुम्हाला स्वतःतच बदल जाणवायला लागेल. सुरुवातीला तुटकी फुटकी इंग्रजी बोलणारे तुम्ही, काही महिन्यांतच आत्मविश्वासपूर्वक इंग्रजीमध्ये स्वतःला व्यक्त करू शकाल. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, जेवढा आपला इंग्रजी शब्दांचा शब्द्संग्रह वाढेल, तेवढी आपली इंग्रजी विषयाची भितीदेखील कालांतराने कमी होईल. या प्रयत्नांच्या जोडीला रेन आणि मार्टिन लिखित इंग्रजीच्या व्याकरणाचे पुस्तक आपले इंग्रजीचे व्याकरण सुधारण्यासाठी मोलाचे ठरेल. ‘ मिशन इंग्रजी सक्सेस’ या प्रक्रियेतून आपल्याला इंग्रजी विषयामधला तज्ञ होण्याचा किंवा त्यात पीएचडी मिळविण्याचा नसून विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या इंग्रजी उताऱ्यावरील प्रश्न, व्याकरणाशी आधारित प्रश्न, इंग्रजी विषयातील निबंध अथवा पत्रलेखन, ‘word association test’ – यांसारख्या घटकांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा आहे. या प्रक्रियेमधून गेल्यानंतर ग्रामीण भागातील मराठी परीक्षार्थीलाही मुलाखतीमध्ये इंग्रजी भाषेत प्रश्न विचारला गेला तर किमान त्या प्रश्नाचे उत्तर इंग्रजी भाषेतच देण्याचा आत्मविश्वास त्याला प्राप्त होईल.
अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मराठी भाषेची कुठल्याही भाषेशी स्पर्धा होवू शकत नाही, पण जीवनामध्ये आणि विशेषतः स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जर यश मिळवयाचे असेल तर इंगजी विषयाची भिती आपल्याला मनातून घालवावीच लागेल. वर नमूद केल्याप्रमाणे आपण जर योजनाबद्ध पद्धतीने, जिद्दीने आणि खरोखरच स्वतःच्या प्रयत्नांनी शक्य असणाऱ्या पद्धतींचा अवलंब करून इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या ‘ मिशन इंग्रजी सक्सेस ’ मध्ये आपणांस हमखास यश मिळेल.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या पदावर कार्यरत आहेत. संपर्क: drsatishdhage@gmail.com; मोबाईल– 8698340084 )