इंजिनिअर्ससाठी सैन्यदलातील अनोख्या संधी

 In ZEE MARATHI DISHA

नवी दिशा स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीची…

 

एक काळ असा होता की, अभियांत्रिकी विषयातील पदवी मिळाली म्हणजे गलेलठ्ठ पगाराची सरकारी अथवा खाजगी क्षेत्रातील नोकरी मिळणारच मिळणार असं साधंसोपं गणित होतं. काळ झपाट्यानं बदलत गेला आणि आज त्याच्या एकदम विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सुकाळ आणि दिवसेंदिवस खाजगी क्षेत्रातील कमी होणाऱ्या नोकऱ्या या दुहेरी कात्रीत आजचा अभियांत्रिकी पदवीधर सापडलेला दिसतोय. ‘यत्र तत्र सर्वत्र’ या उक्तीप्रमाणे अभियांत्रिकी पदवीधरांचं प्रमाण एवढं जास्त झालेलं आहे की, कुठल्याही क्षेत्रात निम्न स्तरावर देखील नोकरीच्या अभावी अभियांत्रिकी पदवीधर आपणास काम करताना दिसत आहेत. अभियांत्रिकी पदवीधरांसमोर मग दुसरा काहीच पर्याय नाही का? नक्कीच पर्याय आहे. ‘अभियांत्रिकी पदवीधर’ हा एक असा वर्ग आहे की, ज्यांच्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्र सोडून देखील विविध क्षेत्रातील खुल्या स्पर्धात्मक परीक्षांमधून अफाट संधी उपलब्ध आहेत. भारतीय सैन्यदलात एक इंजिनिअर म्हणून किंवा सैन्यदलाच्या थलसेना, हवाईदल, नौदल अथवा डीआरडीओ संस्थेमध्ये एक अधिकारी म्हणून करीअर घडविण्याच्या अफाट संधी आजच्या या तरुण इंजिनिअर्स मंडळींकडे उपलब्ध आहेत.

आपल्या जीवनात काहीतरी हटके करण्याची जिद्द असणाऱ्या भारतीय तरुण-तरुणींसाठी सैन्यदलाच्या माध्यमातून अधिकारी पदाच्या अफाट संधी उपलब्ध आहेत.

एक इंजिनिअर म्हणून आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्याला सैन्यदलासाठी तर देताच देता येईल, पण त्याचबरोबर आपल्यांपैकी काही जणांना साधारण गटातील नॉन-टेक्निकल इंजिनिअरिंग करीअरच्यादेखील विविध संधी उपलब्ध होऊ शकतील. तरुण इंजिनिअर्स पदवी धारकांसाठी परमनंट कमिशन किंवा SSC कमिशनच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलात स्थायी अथवा अल्पकालीन काळासाठी सेवा देता येऊ शकते. Technical Entry Scheme (TES) माध्यमातून बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याला सैन्यदलात सरकारी खर्चातून अभियांत्रिकी पदवी धारण करता येऊ शकते आणि त्यानंतर त्या तरुणाचे सैन्यदलातील अधिकारी म्हणून करीअर सुरु होते. University Entry Scheme (UES) परीक्षेच्या माध्यमातून प्री – फायनल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांसाठी त्याच्या सहाव्या सत्रापर्यंतच्या गुणांच्या आधारावर केवळ SSB टप्प्यावर आधारित प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते. TGC (Technical Graduate Course) परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त विद्यार्थी SSB परीक्षेसाठी पात्र ठरतात आणि त्या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर त्यांची निवड केली जाते. TGC परीक्षेच्या माध्यमातून केवळ तरुण इंजिनिअर उमेदवारच स्थायी कमिशनसाठी निवडले जाऊ शकतात आणि तरुणींसाठी आजघडीला ही संधी उपलब्ध नाही. साधारणतः वर्षातून दोनदा ही परीक्षा घेतली जाते आणि २१ ते २६ वर्षे वयोगटातील उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतात. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता साधारणतः इंजिनिअरिंगच्या सरासरी ७०% ते ७५% गुण धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना SSB टप्प्यासाठी बोलावले जाऊ शकते. SSC – TECHNICAL ENTRY परीक्षेच्या माध्यमातून युवक तसेच युवतींसाठी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये SSC कमिशन प्राप्त करता येऊ शकते. सुरुवातीला केवळ पाच वर्षांच्या कालावधीसाठी असणारी ही सेवा एकूण चौदा वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकते. इंजिनिअर्ससाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व तांत्रिक सेवांसाठी लेखी परीक्षेचा टप्पा पार करण्याची गरज नसून केवळ SSB परीक्षेच्या गुणांच्या आधारावर सैन्यदलात अधिकारी पदावर निवड होण्याची संधी उपलब्ध असते.

तांत्रिक सेवांमधून निवड झालेल्या या इंजिनिअर्सना CME, पुणे महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेण्याच्या आणि आपली ज्ञानकक्षा रुंदाविणाच्या विविध संधी सैन्यदल वेळोवेळी उपलब्ध करून देते. Short Service Commission (Submarine) परीक्षेच्या माध्यमातून नौदलामध्ये Mechanical Engineering पदवीधारकांना तर Special Naval Architect Entry Scheme (SNAES) परीक्षेच्या माध्यमातून Naval Architecture पदवीधारकांना आपले करीअर नौदलामध्ये घडविता येऊ शकते. तांत्रिक सेवांच्या शिवाय प्रत्येक इंजिनिअर हा पदवीधरांसाठी उपलब्ध असणाऱ्या CDS अथवा NCC एन्ट्रीच्या माध्यमातून देखील सैन्यदलात अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करू शकतो.

               

वरील विवेचनावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलीच असेल की, केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातच करीअर करायचे असा संकुचित विचार करून स्वतःच्या अभिव्यक्तीला जखडून ठेवण्याएवजी खुल्या स्पर्धेला सामोरे जाण्याची हिम्मत अभियांत्रिकी पदवीधारकांनी ठेवली तर आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य ते प्राप्त करू शकतात. स्वतःचं करीअर घडविण्याबरोबरच देशासाठी काहीतरी करण्याची संधी सैन्यदलातील विविध अधिकारी पदे देतात. जबरदस्त अधिकार असणाऱ्या आणि समाजासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याची संधी निर्माण करून देणाऱ्या सैन्यदलाच्या या विविध परीक्षांच्या माध्यमातून आपण नक्कीच आपल्या करीअरला एक निर्णायक दिशा देऊ शकता – गरज आहे ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची, डोळे उघडे ठेवून संधी शोधण्याची, स्वतःला संपूर्णपणे स्पर्धेत झोकून देण्याची आणि यशस्वी होऊन दिमाखात अधिकारी पदावर स्थानापन्न होण्याची…

 

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)