टेरिटोरियल आर्मीमधून देशसेवेची संधी

 In ZEE MARATHI DISHA

हॉनररी लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी सध्या त्यांच्या क्रिकेट विश्वातील कौशल्याविषयी नाही तर जम्मू आणि काश्मीरमधील टेरिटोरियल आर्मीमधील त्यांच्या सैन्यसेवेसाठी चर्चेमध्ये आहेत. क्रिकेटपटू कपिल देव, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भारताचे पूर्व मंत्री ब्रिगेडियर केपी सिंह देव, हरियाणाचे पूर्व मुख्यमंत्री राव वीरेन्द्र सिंह, दक्षिणेतील लोकप्रिय कलाकार मोहनलाल यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींना जोडणारा एक महत्वाचा धागा म्हणजे – टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) ! आपला व्यवसाय अथवा करीअर सांभाळून सैन्यदलात सेवा देण्याचे स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकाला टेरिटोरियल आर्मीमध्ये सेवा देऊन पूर्ण करता येऊ शकते. संकटकाळात देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पेलणे, आवश्यकता निर्माण झाल्यास नियमित सेनेला मदत करणे, देशातील तरुणांना नागरी जीवनाबरोबरच सैन्यदलात सेवा करुन देशसेवेची संधी देणे या उद्देशाने प्रादेशिक सेनेची स्थापना ९ ऑक्टोबर १९४९ मध्ये केली गेली होती. टेरिटोरियल आर्मी ही अशा प्रकारची सैन्यदलाची शाखा आहे ज्याच्या माध्यमातून नियमित सैन्यदलाला आवश्यकता असेल तेव्हा ‘Second line defence’ म्हणून मदत करते.

आत्तापर्यंत या प्रादेशिक सेनेने नियमित सैन्यदलाला भारत-चीन युद्ध (१९६२), भारत-पाकिस्तान युद्ध (१९६५) , भारत-पाकिस्तान युद्ध (१९७१), ऑपरेशन पवन (श्रीलंका), ऑपरेशन रक्षक (पंजाब), ऑपरेशन ऱ्हायनो (जम्मू काश्मीर), ऑपरेशन बजरंग (उत्तर पूर्व भागातील) अशा युद्ध वा लष्करी कारवायांच्या वेळी मदत करुन महत्वाची भूमिका निभावलेली आहे.

भारतीय नागरिकत्व असलेल्या, 18 ते 42 वर्षे वय असलेल्या, मान्यताप्राप्त पदवीधारक, शारिरीक व मानसिक सक्षम असलेल्या आणि साधारणत: ज्यांचे मासिक उत्पन्न व्यवस्थित आहे अशा उमेदवारांना प्रादेशिक सेनेमध्ये अधिकारी पदासाठी तसेच सर्वसाधारण सैनिक जवान म्हणूनही भरती होता येते.याचप्रमाणे केंद्र शासन/ राज्य शासन/ केंद्रशासित प्रदेश/ खाजगी क्षेत्र/ स्वत:चा व्यवसाय असणाऱ्या पुरुष उमेदवारांनाही टेरिटोरियल आर्मीमध्ये भरती होता येते. मात्र नियमित भूसेना/ नौसेना/ वायुसेना/ पोलीस/ निमलष्करी दल यातील सदस्यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये भरती होता येत नाही. भविष्यात नियमित सैन्यदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर आणि शारिरीक, मानसिक सक्षम असल्यास अशा सदस्यांकरिता विशेष भरती असते त्यावेळी ते त्या भरतीकरिता अर्ज करुन अथवा तत्सम भरती प्रक्रियेत उमेदवार म्हणून सहभागी होऊ शकतात. टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदी निवड होण्यासाठी लेखी परीक्षेचा आणि SSB परीक्षेचा टप्पा पार पाडावा लागतो.

२०० गुणांच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असलेल्या लेखी परीक्षेमध्ये गणित, तार्किक क्षमता, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी विषयावरील प्रश्न विचारले जातात. या लेखी परिक्षेत वर नमूद केलेल्या प्रत्येक भागात 40 टक्के स्वतंत्र तर सर्व भाग मिळून सरासरी 50 टक्के इतके गुण मिळविणे अनिवार्य असते, असे गुण मिळाले तरच त्या उमेदवाराला लेखी परिक्षेत उत्तीर्ण केले जाते. त्यानंतर विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांवर मुलाखत चाचणी घेतली जाते. यात उत्तीर्ण झाल्यास SSB Interview करिता उमेदवारास पाठविले जाते. पुढे SSB मध्ये उत्तीर्ण झाल्यास वैद्यकीय चाचणी घेण्यात येते. त्यानंतर संबंधित उमेदवाराचे चारित्र्य पडताळणी व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करुन त्या उमेदवारास टेरिटोरियल आर्मीमध्ये ‘Commissioned Officer’ चा दर्जा प्रदान करण्यात येऊन त्यास लेफ्टनंट ही रँक सन्मानपूर्वक देण्यात येते.

टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी म्हणून निवड झालेल्या अधिकाऱ्यांना एक महिना संबंधित युनिटमध्ये, एक महिना प्रादेशिक सेना प्रशिक्षण शाळा, देवळालीयेथे आणि तीन महिने इंडियन मिलिटरी ॲकॅडमी, देहरादून येथे प्रशिक्षण देण्यात येते. प्रादेशिक सेनेत जवान म्हणून निवड झालेल्या जवानांना एक महिना संबंधित युनिटमध्ये आणि नऊ महिने संबंधित रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. प्रादेशिक सेनेत भरती झालेल्या जवान किंवा अधिकाऱ्यांना नियमित सैन्यदलाप्रमाणेच वेतन व भत्ते तसेच इतर सर्व प्रकारच्या सोयीसवलती देण्यात येतात. प्रादेशिक सेनेत अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सर्वात पहिली पोस्टींग लेफ्टनंट म्हणून देण्यात येते, तर त्यानंतर पदोन्नतीने कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल आणि ब्रिगेडिअर या पदापर्यंत पोहोचता येते. प्रादेशिक सेनेचे वैशिष्ट्य म्हणजे आपणास वर्षातून दोन महिने सैन्यात तर उर्वरीत दहा महिने आपली मूळ नोकरी, व्यवसाय करता येतो. प्रादेशिक सेनेत आवश्यकतेनुसार आपली सेवा घेण्यासाठी सैन्याकडून आदेश काढले जातात. अलिकडेच प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्यासाठी महिलांसाठीही अंशत: प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लेफ्टनंट शिल्पी गर्गमुख ही भारतातील पहिली महिला अधिकारी म्हणून टेरिटोरियल आर्मीमध्ये कार्यरत आहे.

आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची आपल्यापैकी प्रत्येकाचीच ईच्छा असते आणि आपापल्या परीने आपण आपल्या नौकरी अथवा व्यवसायाच्या माध्यमातून देशहिताचे काम करतही असतो; परंतु सीमेवर कार्यरत राहून आपल्या सैन्यदलाच्या माध्यमातून कार्य करण्याचे समाधान काही वेगळेच असते. सैन्यदलामध्ये अधिकारी बनण्याची वयोमर्यादा ही साधारणतः चोवीस वर्षांपर्यंत असल्या कारणाने त्याचबरोबर सुरक्षित करिअरच्या मागे धावताना आपल्यापैकी बऱ्याच जणांना सैन्यदलात सामील होता आलेले नसते आणि अशा जिगरबाज भारतीय नागरिकांसाठीच टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी बनण्याच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात. तेव्हा जर देशासाठी काहीतरी सकारात्मक करायची उर्मी आपल्यात असेल तर वाट कशाची बघता, टेरिटोरियल आर्मीमधील करीअर आपल्याला खुणावतेय. जर महेंद्रसिंह धोनी टेरिटोरियल आर्मीच्या माध्यमातून देशासाठी आपली सेवा देऊ शकत असेल तर आपण का नाही?

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)