एमबीए- सीईटी परीक्षेची तयारी

 In Dainik Gavkari

व्यवस्थापनशास्त्रातील एमबीए पदवी धारण करून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविण्याचे स्वप्न कित्येक युवक आपल्या उराशी बाळगून असतात.दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा आणि चांगल्या नोकरीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, यांच्याअभावी महाराष्ट्रातील हा युवक कुठेतरी मागे पडताना दिसतो. व्यवस्थापनक्षेत्रातील कौशल्य आणि MBA ही पदवी त्याला योग्य करीअर बनविण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. आपल्या देशातील नामांकित एमबीए संस्थांमधून व्यवस्थापनशास्त्राची पदवी धारण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करावी लागते. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील एमबीए महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व अभ्यासाचा स्तर खालावलेला दिसत होता, परंतु आता हे चित्र बदलत आहे. गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रातील ३५० पेक्षा अधिक एमबीए महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापनशास्त्रातील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी एमबीए सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जात आहे. या वर्षी होणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी ९४००० हून अधिक विद्यार्थ्यांनी साधारणतः २५००० जागांसाठी अर्ज भरलेले आहेत आणि ते या सामाईक प्रवेश परीक्षेच्या तयारीला लागलेले आहेत. आजच्या या लेखातून आपण महाराष्ट्र एमबीए सामाईक प्रवेश परीक्षा २०१७ (MBA CET 2017) परीक्षेची तयारी या विषयावर प्रकाश टाकणार आहोत.

देशभरातील नामांकित एमबीए कोर्सच्या प्रवेशासाठी विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा आजघडीला अस्तित्वात आहेत. CAT,MAT,CMAT,XAT यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या जोडीला विविध राज्यांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध राज्यस्तरीय सामाईक प्रवेश परीक्षांदेखील अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रसंचालनायाद्वारे (DET) आयोजित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र एमबीए सामाईक प्रवेश परीक्षा २०१७ परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमध्ये MBA कोर्स पूर्ण करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. कुठल्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या अथवा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पदवी वर्षांदरम्यान किमान ५०% व आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी किमान ४०% गुणांची अट या परीक्षेच्या पात्रतेसाठी आवश्यक आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाणार असून, प्रत्येक परीक्षार्थीला अडीच तासांमध्ये २०० प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेमध्ये चूक उत्तरांसाठी नकारात्मक गुणपद्धती अस्तित्वात नाही. या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात इंग्रजी आकलन, अंकगणित आणि तार्किक क्षमतेशी आधारित घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातील. इंग्रजी विषयाशी संबंधित व्याकरण,शब्दसंचय आणि इंग्रजी उताऱ्यावरील प्रश्नांचा यात समावेश असेल. MBA CET परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेता, या परीक्षेचे बॅंकिंग, यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांचा काही भाग आणि इतरही अनेक स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी साधर्म्य असल्यामुळे, विद्यार्थ्याना ईतर परीक्षांच्या तयारीसाठी देखील याचा अप्रत्यक्षपणे फायदा होऊ शकेल.

एमबीए- सीईटी परीक्षेची तयारी

MBA CET परीक्षांची तयारी करतांना, सद्य परीक्षापद्धतींचा विचार करता परीक्षार्थीनी ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे. अचूकतेच्या जोडीला लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याचे कसब आपणास यशस्वी होण्यासाठी आत्मसात करावे लागणार आहे. कागदावर कुठलीही आकडेमोड न करता मनातल्या मनात गणित सोडवून उत्तराजवळ येण्याचे कसब आपल्याला या ठिकाणी फायद्याचे ठरेल. यांसाठी काही short tricks चा आपल्याला उपयोग करता येईल. वर्ग,वर्गमूळ,घन,घनमूळ,गुणाकार,ई. सारख्या short tricks चा आपल्याला याठिकाणी फायदा होऊ शकेल. वेदिक गणितीय पद्धतींचा, यासाठी आपल्याला काही अंशी फायदा होऊ शकेल. दर्जेदार इंग्रजी वर्तमानपत्रांचे वाचन,इंग्रजी बातम्या नियमितपणे पाहणे, ई. सारख्या गोष्टींमुळे आपला इंग्रजी शब्दसंचय आणि पर्यायाने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी आपल्याला फायदा होईल. MBA CET परीक्षांसाठी नियमितपणे योग्य दिशेने सराव ही एकमेव बाब आपल्याला यशासमीप घेऊन जाईल.

एकविसाव्या शतकातील रोजगाराच्या संधी ह्या तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास आणि सेवा क्षेत्राशी निगडीत असणार आहेत. आजघडीला खाजगी क्षेत्रांपासून ते सरकारी नोकऱ्यामध्ये व्यवस्थापन कौशल्याची आणि मुख्यत्वे चांगल्या संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेल्या MBA पदवीधारकांची नितांत आवश्यकता आहे. आज प्रत्येक सुशिक्षित तरुणाला प्रत्येक क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी आणि पदोन्नतीच्या पायऱ्या चढण्यासाठी व्यवस्थापन कौशल्याचे धडे घेणे अत्यावश्यक झाले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, नामांकित MBA संस्थांमधून पदवी घेण्याची सुवर्णसंधी ही MAH MBA/MMS CET २०१७ च्या माध्यमातून उपलब्ध झाली असल्यामुळे, नियोजनबद्ध पद्धतीने या परीक्षांची तयारी करून आपणास या परीक्षेमध्ये यश सहजपणे प्राप्त करता येऊ  आणि आपल्या करीअरची मुहूर्तमेढ या माध्यमातून आपणास करता येईल.

 

विचारा प्रश्न तुमच्या मनातला?

विचारा प्रश्न तुमच्या मनातला या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे  या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न मेल मार्फत पाठवा.

मेलdrsatishdhage @ gmail.com

प्रश्न सर, महाराष्ट्र MBA CET सामाईक परीक्षेसाठी रहिवासी प्रमाणपत्राची गरज आहे का ? अनुपमाऔरंगाबाद

उत्तर-  अनुपमा, महाराष्ट्र MBA CET सामाईक परीक्षेसाठी अधिवास वा रहिवासी प्रमाणपत्राची कुठलीही गरज नाही. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतील. मुंबई,पुणे,नागपूर तसेच औरंगाबाद मधील काही नामांकित MBA कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी बाहेरील राज्यांतील विद्यार्थ्यांचा देखील मोठा ओढा असतो. ते सर्व विद्यार्थी त्यांच्या पदवी परीक्षेनंतर या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात.MBA CET स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीविषयी आपल्या मनात असलेल्या शंकानिरसनासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.

 

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)

health-revolutiongroup_discussions