मुलाखतीची पूर्वतयारी

 In Dainik Gavkari

मुलाखत चाचणीला जाता जाता …

स्पर्धात्मक परीक्षांच्या प्रवासातील ‘व्यक्तिमत्व चाचणी’ अथवा मुलाखतीचा टप्पा हा शेवटचा पण महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या टप्प्यासाठी ‘व्यक्तिमत्व चाचणी’ हे नाव जास्त सयुक्तिक आहे कारण परीक्षेचा हा टप्पा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध कांगोरे तपासतो, जेणेकरून तो विद्यार्थी मानसिक आणि वैचारिकदृष्ट्या त्या पदासाठी योग्य आहे किंवा नाही याची चाचपणी या टप्प्यातून केले जाते. व्यक्तिमत्व चाचणी बाबतीत विद्यार्थ्यांच्या मनात बऱ्याच गैरसमजुती असतात आणि या परीक्षांविषयी त्यांच्या मनात असलेल्या न्युनगंडामुळे एक अनामिक भिती उमेदवारांच्या मनात मुलाखतीविषयी निर्माण झालेली असते. स्पर्धात्मक परीक्षेतील हा टप्पा व्यक्तीसापेक्ष आणि जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा असल्यामुळे या टप्प्याची नियोजनबद्ध तयारी करणे आपल्या हिताचे आहे. या लेखमालेतून आपण व्यक्तिमत्व चाचणीच्या विविध टप्प्यांना कसे सामोरे जावे याची माहिती घेणार आहोत.

यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालाची आणि येणाऱ्या व्यक्तिमत्व चाचणीची सर्वच पात्र उमेदवार चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत असतील. काहीजण मुख्य परीक्षांच्या अहोरात्र मेहनतीनंतर सध्याच्या घडीला विश्रांतीचा टप्पा म्हणून वापर करत असतील तर काहीजण कुठलाही वेळ न दवडता व्यक्तिमत्व चाचणीच्या तयारीला जोमाने लागले असतील. आपले अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या आयुष्यातील हा महत्वाचा टप्पा आहे कारण मुख्य परीक्षेचा निकाल लागेपर्यंतच्या या उपलब्ध कालावधीमध्ये आपण नियोजनपूर्ण मुलाखत तंत्र आत्मसात करू शकता. यूपीएससी अथवा एमपीएससी परीक्षांची व्यक्तिमत्व चाचणी साधारणतः २० ते ४० मिनिटापर्यंत चालते आणि या कालावधीमध्ये उमेदवाराला मुलाखत मंडळाला तो मुलाखतीच्या पदासाठी कसा योग्य आहे, हे सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा लागतो. मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी मुलाखत मंडळाद्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून उमेदवाराला आपल्या देहबोलीतून, आपल्या विचारातून आणि आपल्या हजरजबाबीपणातून मुलाखत मंडळावर आपली छाप पाडण्याचे तंत्र आत्मसात करावे लागते.

यूपीएससी अथवा एमपीएससी सनदी सेवा परीक्षांच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी उमेदवाराने मुख्यतः चार बाबींवर विशेष भर देण्याची गरज असते. स्वतःविषयीची माहिती (personal biodata),पदाविषयीची माहिती (post details), चालू घडामोडींची इत्थंभूत माहिती (current affairs) आणि योग्य देहबोली (body language & aetiquettes) या चार गोष्टींवर आपणास विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे आणि सध्याचा मुख्य परीक्षा आणि मुलाखत चाचणीच्या दरम्यानचा हा कालावधी या घटकांच्या तयारीसाठी सर्वात महत्वाचा आहे.

यूपीएससी व एमपीएससी परीक्षांच्या व्यक्तिमत्व चाचणीच्या आधी पात्र उमेदवारांना वेगवेगळ्या पदांविषयीचा त्यांचा पसंतीक्रम व वैयक्तिक माहिती दिलेल्या अर्जानुसार सादर करावी लागते. हीच माहिती मुलाखत मंडळासमोर उपलब्ध असते आणि या माहितीच्या आधारेच साधारणतः मुलाखत मंडळ उमेदवाराशी वार्तालाप सुरु करते. त्याचमुळे प्रत्येक उमेदवाराने त्यांनी सादर केलेल्या या माहितीविषयी पूर्णपणे तयारी करणे आवश्यक असते. तुमचे नाव, आडनाव, जन्मस्थान, निवासी  जिल्हा, राज्य, कार्यरत असलेला व्यवसाय, शैक्षणिक माहिती, छंद, पदवीचे विषय व त्यांची मुलभूत माहिती,मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय,ई. बाबींवर आपला परिपूर्ण अभ्यास असणे अपेक्षित आहे. मुलाखत मंडळाचा प्रश्न विचारण्याचा कल साधारणतः उमेदवाराला माहित असणाऱ्या विषयांकडून त्यांना नवख्या असणाऱ्या विषयांशी संबंध असणाऱ्या प्रश्नांकडे असतो.

बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये हा एक गैरसमज आहे की, मुलाखत मंडळ हे तुम्हाला दबावाखाली आणणारे अतिशय अवघड प्रश्न विचारतात. सर्वसाधारणतः मुलाखत मंडळ हे नेहमीच उमेदवाराला दडपणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून उमेदवाराच्या जमेच्या बाजू आणि विविध विषयांवरील त्याची मते मुलाखत मंडळाला जाणता येतील. या प्रश्नांच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराची दिलेल्या पदांसाठी उपयुक्तता तपासण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक उमेदवाराने व्यक्तिमत्व चाचणीची तयारी करतांना त्यांच्याशी संबंधित सर्व वैयक्तिक माहितीचा संपूर्णपणे अभ्यास करणे अपेक्षित आहे. विचारमंथन करून आपण अपेक्षित प्रश्नांची एक यादीच बनवू शकता व त्यांच्या उत्तराची वस्तुनिष्ठ व अद्ययावत माहितीआधारे तयारी करू शकता.

अशा प्रकारची एक वेगळी डायरीच आपण तयार केली पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या संकेतस्थळावरून आपणास आपल्या जिल्ह्याची तसेच राज्याची संपूर्ण अद्ययावत माहिती मिळू शकेल. महाराष्ट्र शासन प्रकाशित ‘लोकराज्य’ मासिकाचा तसेच विविध वर्तमानपत्रातील स्थानिक माहितीचा आपणास मुलाखतीच्या तयारीसाठी फायदा होऊ शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला पदवीचा विषय व त्यासंबंधित मुलभूत ज्ञान आपणास असणे अपेक्षित आहेच, त्यामुळे ते पुन्हा एकदा नजरेखालून घालणे नक्कीच सोयीस्कर ठरेल. पदवीच्या विषयाच्या मुलभूत प्रश्नामध्येच जर आपण गल्लत केली तर आपली मुलाखत मंडळावर नकारात्मक छाप पडू शकते. बऱ्याच वेळी मुलाखत मंडळ आपल्या छंदाविषयी आपणास माहिती विचारू शकते. जर आपण आयोगाला सदर केलेल्या माहितीमध्ये थोडासा वेगळा असा छंद नमूद केला असेल तर त्याकडे मुलाखत मंडळाचे लक्ष जाणे व त्यावर आधारित प्रश्न विचारले जाणे साहजिक आहे.

मला आठवते वर्ष 2004 मधील यूपीएससी मुलाखतीमध्ये एका उमेदवाराने क्रिकेट खेळणे हा छंद न टाकता क्रिकेट अम्पायरींग हा छंद नमूद केला आणि त्याच्याशी संबंधित सर्व प्रश्नांची परिपूर्ण तयारी केलेली असल्यामुळे त्याला मुलाखत मंडळाने त्यासंबंधित विचारलेल्या सर्व प्रश्नांची चांगल्या प्रकारे उत्तरे देता आली. हा विद्यार्थी त्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये संपूर्ण भारतात दुसरा आला. त्यामुळे कुठलीही माहिती आयोगाच्या माहितीपत्रकात देण्याआधी त्याचा नीट विचार करूनच ते टाकावे. मुलाखत मंडळ हे बऱ्याच वेळी आपल्या मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयाशी संबंधित प्रश्न विचारू शकतात. तसेच उमेदवाराचा पदांचा पसंतीक्रम तसाच का आणि त्यामागची त्यांची भूमिका, यांविषयी देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. थोडक्यात उमेदवाराने आपल्या वैयक्तिक माहितीचा प्रत्येक अंग संपूर्णपणे तयारी करूनच मुलाखतीला जावे असे अपेक्षित आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने मुलाखतीची तयारी करतांना एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मुख्य परीक्षेमध्ये आपल्या ज्ञानाची आयोगाने परीक्षा घेतली आहे आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच आपल्याला व्यक्तिमत्व चाचणीसाठी आमंत्रित केले गेले आहे. म्हणून या परीक्षेची तयारी करतांना आपल्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष द्यावे आणि वस्तुनिष्ठ माहितीच्या मागे लागण्याची किंवा त्यासाठी पाठांतर करण्याची या चाचणीसाठी गरज नाही. आपण पुढील लेखामध्ये मुलाखत कौशल्याचे आणखी काही बारकावे व चालू घडामोडी यांची चर्चा करू.

मुलाखतीची पूर्वतयारी

विचारा प्रश्न तुमच्या मनातला?

विचारा प्रश्न तुमच्या मनातला या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.) या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न मेल मार्फत पाठवा .

मेलdrsatishdhage@gmail.com

प्रश्न सर, माझा ITI Diploma झाला आहे. मला राज्यसेवा पूर्व परीक्षा देता येईल का?      – सचिन शिंदे, औरंगाबाद.

उत्तर सचिन, राज्यसेवा परीक्षेसाठी किमान पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली पदवी परीक्षा ही आहे. त्यामुळे केवळ ITI Diploma च्या आधारे आपण राज्यसेवा परीक्षेसाठी पात्र नाही. आपल्या अभियांत्रिकी पदवीनंतर किंवा मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलेल्या पदवीनंतर आपण ही परीक्षा देवऊ शकाल. परीक्षेच्या पात्रतेविषयी विस्तृत माहिती व मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.

 (या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)

भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया' अर्थक्रांती ' आधी हवी शासन व्यवस्थेत क्रांती !