युवतींसाठी सैन्यदलातील करीअर
स्त्री-पुरुष समानतेच्या या युगात भारतीय युवतींनी ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत वेळोवेळी सैन्यदलात आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. आपली क्षमता सिद्ध करूनदेखील काही तांत्रिक अडचणींमुळे आजही महिलांना सैन्यदलाच्या काहीच शाखांमध्य करीअर करण्याची संधी उपलब्ध आहे. सैन्यदलातील काही शाखांमध्ये स्थायी कमिशन तर उर्वरित शाखांमध्ये अंशकालीन सेवेसाठी म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी महिलांना करीअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. आजघडीला महिलांना आर्मी मेडीकल कोअर, आर्मी डेंटल कोअर, मिलिटरी नर्सिंग सेवा, आर्मी एज्युकेशन कोअर आणि न्यायाधीश एडवोकेट जनरल – यांच विभागांमध्ये स्थायी कमिशन प्राप्त करण्याची संधी आहे. या विभागांमधील करीअर संधींसोबतच शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी महिलांना आर्मी सर्व्हिस कोअर, आर्मी ऑर्डीनन्स कोअर, अभियांत्रिकी शाखा, सिग्नल्स शाखा, आर्मी इंटेलिजन्स कोअर,आर्मी एवीयेशन कोअर आणि आर्मी एअर डिफेंस कोअर- या विविध शाखांमध्ये पाच वर्षांपासून ते चौदा वर्षांपर्यंत सेवारत राहण्याची संधी उपलब्ध आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय सैन्यदलात युवतींचे अधिकारी बनण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरीदेखील पुरुषांच्या मानाने आजही महिला अधिकाऱ्यांची संख्या कमीच आहे. भारतीय थलसेना (३.८%), हवाईदल (१३.०९%), नौदल (६%), आर्मी मेडीकल कोअर (२१.६३%), आर्मी डेंटल कोअर (२०.७५%)- यांमध्ये महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण तसे तुलनात्मकदृष्ट्या कमीच आहे. सैन्यदलाच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्र(OTA), चेन्नई येथे शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी महिलांना स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध असतात. शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल एन्ट्री स्कीम, शॉर्ट सर्व्हिस कमिशन नॉन टेक्निकल एन्ट्री स्कीम, शॉर्ट सर्व्हिस कमिशन NCC स्पेशल एन्ट्री स्कीम आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन JAG एन्ट्री स्कीम- या परीक्षांच्या माध्यमातून युवतींना शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी सैन्यदलात संधी उपलब्ध होत असतात. तांत्रिक पदांसाठी म्हणजेच अभियांत्रिकी सेवेतील सैन्यदलातील अधिकारी पदांसाठी पात्र महिला उमेदवारांना केवळ एसएसबी परीक्षांचा व्यक्तिमत्व चाचणीचा टप्पा पार करावा लागतो तर बाकी शाखांमधील पदांसाठी सीडीएस अथवा AFCAT परीक्षांचे लेखी व व्यक्तिमत्व चाचण्यांचे दोन्हीही टप्पे यशस्वीपणे पार पाडावे लागतात. या परीक्षांसाठी पात्रता निकषांमध्ये अर्जदार युवती ही १९ ते २५ वर्ष वयोगटातील असणे आवश्यक असून, तिने कुठल्याही विषयातील पदवी धारण केलेली असावी व ती शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणे आवश्यक आहे.
.NCC स्पेशल एन्ट्री स्कीम अंतर्गत NCC ‘सी’ परीक्षा उत्तीर्ण महिला उमेदवारांना एसएसबी परीक्षांच्या माध्यमातून सैन्यदलात अधिकारी बनून करीअर घडविता येऊ शकते. सैन्यदलात कायदा विषयातील पदवीधर महिला उमेदवारांना सैन्यदलातील न्यायाधीश एडवोकेट जनरल शाखेमध्ये अधिकारी बनण्याची संधी असते. यांसाठी अर्जदार महिला या कायदा विषयातील पदवीधर असाव्यात आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. या पदांसाठी वयोमर्यादा ही २१ ते २७ वर्षे यांदरम्यान असते. ‘टेक्निकल ग्रॅज्युएट एन्ट्री स्कीम’द्वारे इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सैन्यदलाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. ‘युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम’ च्या माध्यमातून इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सैन्यदलाद्वारे कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातूनदेखील अधिकारी बनण्याची संधी उपलब्ध होते. यासाठी वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे आहे. यात सैन्यदलाद्वारे चाळणी परीक्षा, नंतर मानसिक क्षमता चाचणी, गटचर्चा, मुलाखत, शारीरिक चाचणी- घेतल्या जातात व त्या आधारावर पात्र उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड होते.
भारतीय युवतींसाठी सैन्यदलातील अधिकारी पदे प्राप्त करण्यासाठी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर पार पाडावे लागणारे खडतर प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते. महिलांसाठी शारीरिक चाचणीचे मापदंड हे पुरुषांपेक्षा जरी वेगळे असले आणि काही शारीरिक प्रशिक्षणामधील चाचण्या ह्या पुरुषांच्या मानाने जरी काहीशा सौम्य असल्या तरी सैन्यदलामध्ये सामील होण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकणाऱ्या महिलाच यशस्वी ठरतात.
आजची युद्धे ही पारंपारिक पध्दतीने लढण्यापेक्षा तंत्रज्ञानाच्या आधारावरच मोठया प्रमाणावर लढली जातात. मानसिकदृष्ट्या कणखर, शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी असणाऱ्या- शेकडो भारतीय युवती एकविसाव्या शतकातील आव्हानांसाठी सक्षम असून, येणाऱ्या काळात अशा युवतींचे सैन्यदलातील स्थान हे आणखीनच बळकट होणार आहे. आजघडीला जरी युवती शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी पात्र असल्या तरी नजीकच्या भविष्यात सैन्यदलाच्या विविध शाखांमध्ये स्थायी कमिशन मिळण्याची सुरुवात या युवतींना निश्चितच प्राप्त होणार आहे. लढाऊ विमानाचा पायलट बनण्याचे स्वप्न असेल अथवा रणभूमीवर आपल्या सैनिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी असेल, सैन्यदलातील अधिकारी पदे या युवतींना राष्ट्रसेवेची अमुल्य संधी प्राप्त करून देतात. स्वतःवर असणारा दुर्दम्य आत्मविश्वास, काही हटके करून दाखविण्याची जिद्द आणि आपले ‘स्मार्ट व्यक्तिमत्व’ या युवतींना लष्करी अधिकारी बनविण्यासाठी पूरक ठरतात. भारतातील पहिल्या महिला चिकित्सासेवा सैन्यदल प्रमुख लेफ्टनंट जनरल पुनीत अरोरा असोत अथवा सध्या AFMC पुणे येथे कार्यरत असणाऱ्या मेजर जनरल माधुरी कानिटकर असोत – सैन्यदलात उच्च पदावर महिलांनी आपल्या कर्तृत्वाची एक वेगळीच छाप उमटवलेली आहे. तुम्हालादेखील सैन्यदलातील ही अधिकारी पदे आकर्षित करत असतील आणि तुमच्यामध्ये भारतीय सैन्यदलातील अधिकारी पदासाठी लागणाऱ्या सर्व पात्रता अंगी असतील, तर आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी द्या आणि सर्वशक्तीनिशी आजच तयारीला लागा सैन्यदलातील स्पर्धात्मक परीक्षांना !
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)