राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भारतीय अर्थव्यवस्था घटकाची तयारी
विदयार्थी मित्रांनो,राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना एव्हाना आपण सर्व या परीक्षेच्या तयारीला जोमाने लागलेले असणारच. पूर्व परीक्षेत सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी ११० पेक्षा जास्त गुण मिळविण्याची अपेक्षा असलेले विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्याची शक्यता असल्याने, त्या आधारावर विद्यार्थ्यांनी आता पूर्णपणे आपली ऊर्जा मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी केंद्रित केली पाहिजे. या परीक्षेची तयारी करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना सामान्य अध्ययन पेपर चार मधील भारतीय अर्थव्यवस्थेवर आधारित घटक कठीण वाटतो. आजच्या या लेखातून आपण भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित गेल्या चार वर्षांत राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे प्रत्येक घटकानुरूप विश्लेषण आणि येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी आपल्या तयारीची दिशा यांवर प्रकाश टाकणार आहोत.
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर चार मध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांचा अंतर्भाव होतो. यांपैकी भारतीय अर्थव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा घटक असून यांवर आधारित एकूण १५० प्रश्नांपैकी साधारण १०५ प्रश्न दरवर्षी विचारले जातात. भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित ‘अर्थव्यवस्था व नियोजन’ या घटकावर आधारित ४५ प्रश्न तर ‘विकास व कृषी अर्थशास्त्र’ या घटकावर आधारित ६० प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात. खाली दिल्या गेलेल्या तक्त्यामध्ये गेल्या चार वर्षांत राज्यसेवा मुख्य परीक्षेत भारतीय अर्थव्यवस्था या घटकाशी संबंधित विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण दिले गेलेले आहे.
घटक |
२०१२ | २०१३ | २०१४ | २०१५ |
भारतीय अर्थव्यवस्था | ०४ | ०८ | ०५ | ०२ |
नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास | ०८ | ०४ | ०३ | ०४ |
उद्योग – गरजा | ०६ | ०६ | ०३ | १२ |
सहकार | ०७ | ०१ | ०६ | ०२ |
आर्थिक सुधारणा | ०७ | ०४ | ०५ | ०५ |
आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ | १० | १३ | ११ | १० |
गरिबीचे निर्देशांकन व अंदाज | ०१ | ०२ | ०५ | ०३ |
रोजगार निर्धारणाचे घटक | ०२ | ०४ | ०५ | ०३ |
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था | ०० | ०३ | ०२ | ०४ |
समेष्टी अर्थशास्त्र | ०५ | ०६ | ०६ | ०४ |
सार्वजनिक वित्तव्यवस्था आणि वित्तीय संस्था | १० | ११ | १५ | ०८ |
वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र | १० | १० | १४ | १६ |
भारतीय कृषिव्यवस्था, ग्राम विकास व सहकार | १२ | ११ | ०९ | १२ |
कृषी | १३ | १४ | ०९ | १२ |
अन्न व पोषण आहार | ०७ | ०५ | ०६ | ०८ |
भारतीय उदयोग पायाभूत सुविधा व विकास क्षेत्र | ०३ | ०३ | ०१ | ०० |
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर चार मध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांचा अंतर्भाव होतो. यांपैकी भारतीय अर्थव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा घटक असून यांवर आधारित एकूण १५० प्रश्नांपैकी साधारण १०५ प्रश्न दरवर्षी विचारले जातात. भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित ‘अर्थव्यवस्था व नियोजन’ या घटकावर आधारित ४५ प्रश्न तर ‘विकास व कृषी अर्थशास्त्र’ या घटकावर आधारित ६० प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात. खाली दिल्या गेलेल्या तक्त्यामध्ये गेल्या चार वर्षांत राज्यसेवा मुख्य परीक्षेत भारतीय अर्थव्यवस्था या घटकाशी संबंधित विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण दिले गेलेले आहे.
वरील विश्लेषणावरून आपल्याला लक्षात येईल की, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था; भारतीय कृषिव्यवस्था; वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र; उदयोग; आर्थिक सुधारणा आणि सार्वजनिक वित्तव्यवस्था – या घटकांवर आधारित जास्तीत जास्त प्रश्न मुख्य परीक्षेत वारंवार विचारले गेलेले आहेत. महाराष्ट्राची तसेच भारताची कृषिआधारित अर्थव्यवस्था, जागतिक अर्थव्यवस्थेतील आणि पर्यायाने भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारातील गेल्या काही वर्षांतील बदलता प्रवाह आणि महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रातील प्रगती- या अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटकांचा मोठा प्रभाव आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या स्वरूपावरून देखील लक्षात येतो. मुख्य परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की, अभ्यासक्रमातले बरेचसे घटक हे एकमेकांना पूरक असे आहेत, याचाच अर्थ असा की परीक्षेची तयारी करतांना अशा घटकांची एकत्रित तयारी करणे हे आपल्याला देखील फायद्याचे ठरेल. आंतरराष्ट्रीय व्यापार व संस्था, उदयोग, परकीय गुंतवणूक आणि आर्थिक सुधारणा या चारही घटकांचा सोबत अभ्यास करणे हे मुलभूत संकल्पना समजण्यासाठी तसेच परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे कृषी, सहकार व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास या घटकांचा देखील एकत्रित अभ्यास करणे आपल्यासाठी सोयीस्कर ठरेल. अभ्यासक्रमात स्पष्टपणे नमूद केलेल्या घटकांव्यतिरिक्त सध्या चर्चेत असणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या व भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या घटकांचा देखील आपण लक्ष देऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. नीती आयोग, ‘ मेक इन इंडिया ’ व ‘ मेक इन महाराष्ट्र ’ कार्यक्रम, कला पैसा, वस्तू व सेवा कर विधेयक, वित्तीय समावेशन, भारताचे विविध देशांसोबत केले गेलेले आंतरराष्ट्रीय व्यापार करार, परकीय गुंतवणूक धोरणातील बदल- यांसारख्या अतिरिक्त घटकांवर देखील आपण बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यावर्षी १९९१ पासून भारतात अस्तित्वात आलेल्या आर्थिक सुधारणांना आणि खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत, त्या अनुषंगाने आर्थिक सुधारणांशी संबंधित गोष्टींचा परिणाम व त्याचे फायदे तोटे यांचादेखील अभ्यास करणे आवश्यक आहे व त्या उपघटकावर आपण विशेष भर दयावा.
भारतीय अर्थव्यवस्था या घटकाची मुख्य परीक्षेसाठी तयारी करतांना अर्थशास्त्राशी संबंधित संकल्पना व त्यांचा विविध क्षेत्रांतील परिणाम यांची माहिती असण्यासोबतच त्यांचा चालू घडामोडींशी असणारा संबंध यांची सांगड घालण्याचे कौशल्य आपल्याला आत्मसात करावे लागते. केवळ पारंपारिक पद्धतीने राज्यसेवेशी संबंधित काही प्रचलीत पुस्तकांचा अभ्यास करणे आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित काही आकड्यांची घोकंपट्टी करणे, ही पद्धत आता राज्यसेवा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी कुचकामी ठरतेय. त्यामुळेच तुम्हाला लक्षात येईल की, गेल्या तीन वर्षांमध्ये यूपीएससी परीक्षांची सविस्तररित्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे एमपीएससी राज्यसेवा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण हे प्रत्येक वर्षी वाढत आहे. म्हणून घोकंपट्टी सोडून त्याएवजी विविध संकल्पना समजावून घेऊन त्याचा चालू घडामोडींशी सांगड घालण्याची कला आपल्याला अवगत करणे हे अत्यंत आवश्यक आहे. एमपीएससी परीक्षेसाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रचलित पुस्तके आणि नोटस शिवाय काही अतिरिक्त अभ्यास साहित्यांची आपल्याला यांसाठी मदत घ्यावी लागेल.
महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण, ‘लोकराज्य’ आणि ‘योजना’ मासिकांमधील काही उपयुक्त लेख, भारत सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणामधील काही घटक, ‘इंडिया ईयर बुक’ मधील काही घटक, आर्थिक सुधारणांशी संबंधित काही वृत्तपत्रातील व मासिकांतील विश्लेषणात्मक लेखमाला – यांसारख्या अतिरिक्त अभ्यास सामुग्रीचा आपल्याला यांसाठी फायदा होऊ शकेल. फेब्रुवारी व मार्च २०१६ महिन्यांतील ‘लोकराज्य’ मासिकामधील लेखांमधून ‘मेक इन महाराष्ट्र’ हा घटक चांगल्या प्रकारे अभ्यासिला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे ‘महाराष्ट्राची अर्थव्यवस्था’ घटकासाठी महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण आपल्या कामाला येईल. केंद्र सरकारचे आर्थिक सर्वेक्षण हे दोन भागांमध्ये प्रकाशित होते आणि यावर्षीच्या एमपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींकडे आता कमी वेळ उपलब्ध असल्यामुळे, केंद्रीय आर्थिक सर्वेक्षणामधील निवडक गोष्टींवर आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागेल. केंद्रीय आर्थिक सर्वेक्षणाच्या भाग दोन मधील माहितीवर आपले विशेष लक्ष हवे. केंद्रीय आर्थिक सर्वेक्षणातील भाग एक मधील कृषी व त्यावर आधारित माहितीचा देखील आपल्याला परीक्षेसाठी फायदा होईल. आर्थिक सर्वेक्षणांचा अभ्यास करतांना विविध नवनवीन योजनांविषयी चौकटीत दिलेल्या माहितीचा आपल्याला परीक्षेसाठी फायदा होईल, तसेच वेगवेगळ्या तक्त्यांमध्ये दिल्या गेलेल्या सांख्यिकी माहितीच्या पायथ्याशी त्या माहितीचा स्त्रोत दिलेला असतो, त्याचीही माहिती आपल्याला परीक्षेसाठी उपयुक्त ठरते. भारत सरकारद्वारा दरवर्षी प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘इंडिया ईयर बुक’ मधील कृषी, उदयोग, पायभूत सुविधा, ऊर्जा, नियोजन, वाहतूक, ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधा- हे घटक राज्यसेवा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. गेल्या दोन वर्षांतील वेगवेगळ्या विषयांवरील ‘ योजना ’ मासिकातल्या लेखांचादेखील आपल्याला परीक्षेच्या तयारीसाठी फायदा होऊ शकेल. ऊर्जा, पायाभूत सुविधा, दूरसंचार क्षेत्र, दारिद्र्य, विदेशी गुंतवणूक- यांसारख्या ‘योजना’ मासिकामधील विविध विषयांवरील लेखमाला आपल्याला परीक्षेच्या तयारीसाठी मदतपूर्ण ठरतात.
ध्येयप्राप्तीसाठी योग्य मार्गाची निवड केली की यश लवकर मिळते. त्याचप्रमाणे राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भारतीय अर्थव्यवस्था या घटकामधून जास्तीत जास्त गुण प्राप्त करायचे असतील तर अर्थव्यवस्थेतील मुलभूत संकल्पनांची समज, त्यांचा विविध क्षेत्रांतील संबंध आणि या सर्व ज्ञानाचा चालू घडामोडींशी असणारा संबंध – या तीन गोष्टींची सांगड घालणे हे प्रत्येक परीक्षार्थीला अत्यंत आवश्यक आहे. आजच्या आपल्या या लेखामधून केले गेलेले राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असलेले घटकानुरूप विश्लेषण आणि त्यावर आधारित आपली अभ्यासाची पुढची दिशा याविषयीचे मार्गदर्शन हे नक्कीच आपल्या यशासाठी मददगार ठरेल.
(क्रमशः)
-लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.)
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत.)