रुपयाचे अवमूल्यन- मुलभूत संकल्पना

 In Dainik Gavkari

‘अर्थशास्त्र’ विषयातील संकल्पना ह्या केवळ पुस्तकी ज्ञानापुरत्या मर्यादित नसून त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समावेश होत असतो. बऱ्याच वेळी या संकल्पना किचकट असतील म्हणून आपण त्याकडे कानाडोळा करतो, परंतु अर्थसाक्षरतेमध्ये या सर्व मुलभूत संकल्पनांची ओळख प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीला असावी असे अपेक्षित आहे. रुपया वधारला किंवा रुपया घसरला किंवा रुपयाच्या अवमूल्यनामुळे सोन्याच्या किमतीवर  परिणाम झाला, यांसारख्या बातम्या आपण नेहमीच वर्तमानपत्रात वाचत असतो आणि त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनावर परिणाम देखील होत असतो. त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन ही संकल्पना नेमकी काय आहे? त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? याची माहिती आपल्याला आणि विशेषतः स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थीला असणे अनिर्वार्य आहे.

रुपयाचे अवमूल्यन म्हणजे रुपयाची अन्य (मुख्यतः अमेरिकी डॉलर संदर्भात) देशाच्या चलनाच्या तुलनेत किमत कमी होणे. समजा एका डॉलरसाठी आधी आपण ५० रुपये मोजत होतो आणि आता बाजारातील मागणी व पुरवठ्याच्या संबंधातील बदलामुळे जर आपणास एका डॉलरसाठी ७० रुपये मोजावे लागत असतील तर आपण रुपयाचे अवमूल्यन झाले असे म्हणतो. येथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, या उदाहरणात आपणास ५० रुपयाएवजी ७० रुपये मोजावे लागत आहेत तरीदेखील आपण अवमूल्यन ही संज्ञा वापरत आहोत. ही संकल्पना समजण्यासाठी एक साधे उदाहरण आपण लक्षात घेऊ या. समजा एका अमेरिकी सैन्याला (तुलना करा एका अमेरिकी डॉलरशी) हरविण्यासाठी आपणास आधी ५० भारतीय सैनिकांची (तुलना करा ५० रुपयांशी) गरज लागत होती आणि आता तीच गरज ७० सैनिकांची झाले असेल तर याचा अर्थ या उदाहरणानुसार भारतीय सैन्याचे (तुलना करा रुपयाचे अवमूल्यन) अवमूल्यन झाले आहे असे म्हणता येईल. याठिकाणी आकडा महत्वाचा नाही तर दुसऱ्या देशाच्या चलनासाठी आपणास जास्त रुपये खर्च करावे लागतात आणि म्हणून त्यास आपण रुपयाचे अवमूल्यन असे म्हणतो. रुपयाचे अवमूल्यन होते म्हणजेच रुपया घसरतो आणि त्याच्याविरुद्ध रुपया डॉलरच्या तुलनेत सुधारला म्हणजे रुपया वधारला असे आपण म्हणतो.

रुपयाचे अवमूल्यन, रुपयाची घसरण आणि रुपया वधारणे – या संकल्पना समजल्यानंतर या सर्व बाबींचा आपल्या देशाच्या निर्यात, आयात आणि पर्यायाने आंतरराष्ट्रीय व्यापारावर काय परिणाम होतो, हे पाहणे क्रमप्राप्त ठरते. रुपयाचे अवमूल्यन झाले किंवा रुपया काही प्रमाणत घसरला तर त्याचा निर्यातीवर सकारात्मक परीणाम होतो. किंबहुना कित्येक देश वेळोवेळी आपली निर्यात वाढविण्यासाठी काही प्रमाणात नियंत्रितपणे आपल्या चलनाचे अवमूल्यन करतात जेणेकरून त्यांच्या देशाची निर्यात वाढेल. उदा. समजा एका  डॉलरची किमत ५० रुपयावरून १०० रुपये झाली म्हणजेच रुपया घसरला किंवा रुपयाचे अवमूल्यन झाले. जर मी विदेशी ग्राहक असेल आणि आधी मला एक वस्तू एक डॉलरला मिळत असेल तर मला तीच वस्तू रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे केवळ अर्ध्या डॉलरला म्हणजे केवळ अर्ध्या किमतीतच मिळेल आणि म्हणून एका वस्तूच्या ऐवजी अमेरिकन ग्राहक दोन वस्तू खरेदी करेल. म्हणजेच भारतीय निर्यातदाराच्या दृष्टिकोनातून त्याच्या एका वस्तूऐवजी दोन नगांची निर्यात होईल आणि पर्यायाने आपल्या देशाची एकूणच निर्यात वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे रुपयाच्या अवमूल्यनामुळे आपल्याला आयात करण्यासाठी जास्त किमत मोजावी लागते आणि त्यामुळेच रुपयाच्या अवमुल्यनामुळे आयातीवर नकारात्मक परिणाम होत असतो. रूपयाच्या अवमुल्यनामुळे निर्यातीवर सकारात्मक व आयातीवर सकारात्मक परिणाम होण्याचे कारण आपणास वर नमूद केलेल्या स्पष्टीकरणावरून लक्षात आलेच असेल. हाच तर्क आपण रुपयाची किमत वधारली तर आयात-निर्यातीवर होणाऱ्या परिणामासाठी लावू शकाल आणि त्यावरून आपल्याला लक्षात येईल की, रुपया वधारल्यामुळे निर्यातीवर नकारात्मक व आयातीवर सकारात्मक असा परिणाम होत असतो.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तीन वेळा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांमुळे रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पहिले अवमूल्यन २६ सप्टेंबर १९४९ रोजी ३०.५% पर्यंत घडवून आणले.  भारताची व्यापारतुट कमी करणे हा त्यामागे मुख्य उद्देश होता. रुपयाचे दुसरे अवमूल्यन ६ जून १९६६ रोजी ३६.५% इतके करण्यात आले. भारताचे १९६२ मधील चीन देशासोबतचे युद्ध, १९६५ मधील भारत-पाकिस्तान युद्ध व याच काळामधील भारतातील दुष्काळाची परिस्थिती-या गोष्टींची पार्श्वभूमी रुपयाच्या या दुसऱ्या अवमूल्यनाशी होते. रुपयाचे तिसरे आणि महत्त्वपूर्ण अवमूल्यन जुलै १९९१ मध्ये साधारणतः २०% पर्यंत करण्यात आले. खाजगीकरण,उद्योगीकरण व जागतिकीकरण धोरणाची सुरुवात व भारतीय अर्थव्यवस्थेतील आर्थिक सुधारणांची पार्श्वभूमी १९९१ मधील रुपयाच्या अवमूल्यनासंदर्भात होती. आजघडीला एका डॉलरची किमत साधारणतः ६८ रुपयाच्या आसपास असून, विविध कारणांमुळे बाजारामध्ये त्याच्या किमतीत बदल होत असतो ज्याचा परिणाम आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर, सोन्याच्या आयातीवर तसेच महागाईवर मुख्यत्वे करून होत असतो.

विद्यार्थीमित्रानो, आजच्या या लेखातून आपणास रुपयाच्या अवमूल्यनाशी संबंधित मुलभूत संकल्पनांची समज आलीच असेल, ज्याचा उपयोग आपणास विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या तय्रीसाठी, मुलाखतीच्या तयारीसाठी तसेच दैनंदिन अर्थविषयक घडामोडींचे विश्लेषण करण्यासाठी होवू शकेल. तेव्हा तुमच्या अभ्यासाचा रोख असाच ध्येयकेंद्रित ठेवा आणि यशाकडे आपले मार्गाक्रमण चालू ठेवा.

रुपयाचे अवमूल्यन- मुलभूत संकल्पना

विचारा प्रश्न तुमच्या मनातला?

विचारा प्रश्न तुमच्या मनातला या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.) या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न मेल मार्फत पाठवा .

मेलdrsatishdhage@gmail.com

प्रश्न सर, माझे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून B.A. द्वितीय वर्षाचे पदवी शिक्षण सुरु आहे. मला माझी पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर यूपीएससी व एमपीएससी परीक्षा देता येईल का?    -औदुंबर, कन्नड

उत्तर औदुंबर ,युजीसी अथवा AICTE मान्यताप्रप्त अशा कुठल्याही विद्यापीठातून वा महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी यूपीएससी व एमपीएससी परीक्षा देण्यासाठी पात्र असतात. कुठल्याही सामान्य महाविद्यालयातून पूर्णवेळ महाविद्यालय करून प्राप्त केलेली पदवी आणि मुक्त विद्यापीठातून प्राप्त केलेली पदवी ही लोकसेवा आयोगाच्या पात्रतेसाठी समसमान असते. काही विद्यार्थी बारावीनंतर मुद्दामहून यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळावा, म्हणून मुक्त विद्यापीठातून पदवीसाठी प्रवेश घेतात व पदवी दरम्यानची वर्षे यूपीएससी परीक्षेची योग्य रीतीने तयारी करण्यासाठी वापरून पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये यशस्वी होतात. तेव्हा तुमच्याकडे उपलब्ध असणारा वेळ सदुपयोगी लावा आणि आपले प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करा. अधिक माहितीसाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.

 (या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)

' अर्थक्रांती ' आधी हवी शासन व्यवस्थेत क्रांती !सरकारी राजकोषीय धोरण व वित्तीय शिस्त