वकिलांसाठी सैन्यदलातील करीअर संधी

 In ZEE MARATHI DISHA

कायदेक्षेत्रातला  एल एल बी पदवीधारक म्हटलं की, आपल्यासमोर काळा कोट परिधान केलेला एखादा वकील अथवा एखाद्या लीगल फर्ममध्ये काम करणारा कायदेतज्ञ असं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. सैन्यदलाच्या रुबाबदार गणवेषातील तरुण लेफ्टनंट आणि तोही एल एल बी पदवीधारक असं जर मी म्हटलं तर बहुतेक तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु सैन्यदलामध्ये Judge Advocate General (JAG) शाखेमध्ये युवक आणि युवतींना वकील म्हणून आपलं करीअर निवडण्याचा आणि त्याला योग्य दिशा देण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. नेमकं सैन्यदलाच्या JAG शाखेतील करीअर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधींची माहिती आपण आजच्या या लेखातून घेणार आहोत.

सैन्यदलातील थलसेना, नौसेना तसेच वायुसेनेमध्ये कायदेशीर बाबींशी संबंधित कायदेतज्ञांची JAG नावाची एक स्वतंत्र शाखा कार्यरत असते. मिलिटरी कायद्यातील ज्ञानासोबतच सैन्यदलातील विविध कायदेशीर मामल्यांचा निपटारा करण्यासाठी JAG शाखेमध्ये विधीतज्ञांचा भरणा असतो. JAG शाखेतील कामाबरोबरच या अधिकाऱ्यांची सैन्यदलात विविध ठिकाणी लीगल स्टाफ अधिकारी म्हणून नेमणूक होऊ शकते, तसेच इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ मध्ये प्रशिक्षक म्हणून देखील नेमणूक होऊ शकते.

JAG शाखेतील अधिकाऱ्यांची मुख्य कार्ये ही सैन्यदलाला कायदेशीर मामल्यांमध्ये तज्ञ सल्ला देण्याबरोबरच कोर्ट मार्शल प्रक्रियेतील कायदेशीर कारवाई, सैन्यदलाशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्यांबाबत सल्लामसलत आणि सैनिकी न्यायिक प्राधिकरण (AFT) मध्ये सैन्यदलाची कायदेशीर बाजू मांडण्याबाबत असते. JAG शाखेतील तज्ञ वकील हे वेळोवेळी Adjutant General शाखेला सैन्यदलातील शिस्तभंग संबंधित कायदेशीर मामल्यांमध्येदेखील सल्ला देण्याचं काम करतात. मिलिटरी लॉ संबंधित केसेस सोबतच, निवृत्तीवेतन संबंधित कायदेशीर बाबी, सैन्यदलाच्या अखत्यारितील जमिनीशी निगडीत कायदेशीर बाबी, सैन्यदलातील वाहनांच्या अपघाताशी संबंधित केसेस – यांसारख्या कायदेशीर बाबींमध्ये सैन्यदलाचा पक्ष मांडण्याचं महत्वाचं कार्य JAG शाखेतील वकिलांद्वारे केलं जातं. JAG शाखेमधील एल एल बी पदवीधारक जरी मुख्यतः सैन्यदलातील कायदेशीर बाबींचा निपटारा करीत असला तरी तो सर्वात पहिले सैन्यदलातला सैनिक असतो आणि त्यानंतरच एक कायदेतज्ञ म्हणून त्याचे कर्तव्य तो पार पाडत असतो. म्हणूनच JAG शाखेमधील अधिकारी पदांसाठी निवड करताना कायद्याच्या शाखेतील पद्वीसोबातच इतर पात्रता आवश्यक ठरतात.

JAG शाखेमधील अधिकारी बनण्यासाठी LLB पदवीधारकांना काही विशेष पात्रतांची पूर्तता करावी लागते. एकवीस ते सत्तावीस वर्षे वयोगटातील अविवाहित भारतीय युवक अथवा युवती LLB पदवीधारक, JAG शाखेतील अधिकारी पदाच्या जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या निवड्प्रक्रियेसाठी पात्र ठरतात. या निवड्प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराला कायद्याशी संबंधित तीन वर्षांच्या LLB पदवी परीक्षेमध्ये अथवा बार कॉन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्य पाच वर्षांच्या कोर्समध्ये कमीत कमी ५५% गुण मिळविणे बंधनकारक असते. शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवारांना काही शारिरीक पात्रतांची देखील पूर्तता करावी लागते, ज्यामध्ये उमेदवाराची उंची कमीत कमी १५७.५ सेमी (पुरुषांसाठी) आणि १५२ सेमी (महिलांसाठी) असणे आवश्यक असते. पात्रता निकषांवर योग्य ठरल्यानंतर पात्र उमेदवारांना खडतर अशा पाच दिवसाच्या SSB व्यक्तिमत्व चाचणीला सामोरं जावं लागतं.

उमेदवाराच्या ज्ञानासोबतच त्याच्या व्यक्तिमत्वाची चाचणी विविध मानसिक चाचण्यांमधून या SSB टप्प्यामधून होते. मानसिक आणि शारिरीक चाचण्यांच्या या खडतर टप्प्यातून पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होते आणि यातून निवड झालेले उमेदवार ४९ आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी OTA चेन्नई येथे पाठविले जातात. ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यशस्वी उमेदवाराला PGDDMSS (Post Graduate Diploma in Defence Management and Strategic Studies) ही पदविका मद्रास विद्यापिठाद्वारे प्रदान केली जाते. खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या उमेदवारांची सैन्यदलातील JAG शाखेमध्ये लेफ्टनंट या पदावर निवड होते. JAG शाखेमध्ये उमेदवारांची निवड एसएससी कमिशनसाठी दहा वर्षांसाठी होते, जी आणखीन चार वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. JAG शाखेमधील अधिकाऱ्याला पगार,भत्ता,सोयीसुविधा या सैन्यदलातील ईतर शाखांमधील अधिकाऱ्यांसारख्याच उपलब्ध असतात.

सैन्यदलातल्या अधिकारी पदाचा थरार आणि त्याचबरोबर कायदेक्षेत्रातल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची उत्कृष्ट संधी JAG शाखेतला अधिकारी बनून LLB पदवीधारकांना आजघडीला उपलब्ध आहे. JAG शाखेतील अधिकारी बनून आपणांस देशसेवेसोबतच स्वतःच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देण्याची उत्कृष्ट संधी उपलब्ध आहे. स्वतःवरचा दुर्दम्य विश्वास, काहीतरी हटके करण्याची धमक आणि सैन्यदलाला अपेक्षित व्यक्तिमत्व जर आपल्यात असेल तर JAG शाखेतील अधिकारी पद नक्कीच तुम्हाला खुणावतंय…

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)