सैन्यदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न – भाग १
भारतीय सैन्याने सीमेपार घुसून केलेले ‘Surgical Strike’ असो, प्रजासत्ताक दिनाचे सैन्यदलाचे दिमाखदार संचलन असो, नैसर्गिक आपत्तीमधून सैन्याने सुखरूपपणे सुटका केलेल्या हजारो नागरिकांची कहाणी असो वा विंग कमांडर अभिनंदन यांचा निडर बाणा असो – भारतीय सैन्यदलाशी निगडीत असलेल्या अशा असंख्य बातम्या आपल्या वाचण्यात अथवा पाहण्यात आल्या की, आपल्यापैकी प्रत्येक तरुणाला स्फुरण चढते आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. देशासाठी काहीतरी करण्याची, सैन्यदलात भरती होऊन अधिकारी पदावर आरूढ होण्याचे आपल्यापैकी कित्येक जणांचे स्वप्न असते, परंतु योग्य माहितीचा अभाव आणि त्यासाठी लागणारे योग्य मार्गदर्शन यांच्या अभावामुळे कित्येक होतकरू तरुण आणि तरुणी सैन्यदलातील करीअरच्या विविध संधींपासून वंचित राहतात. अशाच काही महत्वाच्या सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधी आणि त्यांची पूर्वतयारी या विषयाशी संबंधित माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
मराठी तरुणांची आणि त्यांच्या पालकांची करीअरविषयीची माफक अपेक्षा असते की- आपल्या मुलाला सरकारी अधिकारी पदाची नोकरी असावी, चांगला पगार असावा, नोकरचाकर, सरकारी गाडी-बंगला आणि सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात. खरे पाहिले तर, सैन्यदलात अधिकारी पदावर निवड झाल्यावर या सर्व गोष्टी मिळतातच मिळतात, पण त्याहून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशासाठी खऱ्या अर्थाने स्वतःला समर्पित करण्याची अभुतपूर्व संधी सैन्यदलाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते. त्यामुळेच उत्कृष्ट करीअर संधी, समाजात असणारा आदर आणि देशासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याची संधी आपल्याला प्राप्त करावयाची असेल तर सैन्यदलातील अधिकारी पदांच्या आव्हानात्मक करीअर संधींसाठी कंबर कसावीच लागेल. सैन्यदल, वायुदल अथवा नौदल या तिन्ही क्षेत्रात अधिकारी पदाच्या असंख्य संधी असताना देखील मराठी तरुण त्या स्पर्धेमध्ये बाकी राज्यांच्या तुलनेत कुठेतरी मागे पडतो आहे.
अधिकारी पदाखालील PBOR (Person Below Officer Ranks) पदांसाठी भारतीय सैन्यदलातील मराठी तरुणांचे प्रमाण पुरेसे असले तरीही अधिकारी पदांवरील परीक्षांमधून मराठी तरुणांची निवड होण्याची संख्या अजूनही बरीच कमी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, स्वातंत्र्योत्तर भारताच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात केवळ जनरल अरुण वैद्य यांच्या स्वरुपात केवळ एकदाच मराठी अधिकारी सर्वोच्च अशा सैन्यदल प्रमुख या पदावर स्थानापन्न होऊ शकला.
मराठी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनदेखील सैन्यदलातील विविध करीअर संधींमध्ये ते का मागे पडतात? सैन्यदलातील मराठी टक्का कमी असण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे- मराठी मानसिकता ! माझ्या राज्यात, नव्हे माझ्या जिल्ह्यात, नव्हे माझ्या तालुक्यात आणि त्याहून जवळ म्हणजे माझ्या गावातच मला नोकरी कशी मिळेल, याचा आटापिटा करताना आपल्याला मराठी माणूस दिसतो. स्वतःला आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला निखार देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या राज्याबाहेर उपलब्ध असणाऱ्या सैन्यदलातील या विविध संधींना आपल्या कवेत घ्यावेच लागेल. सैन्यदलातील अधिकारी पदांमधील मराठी तरुणांचे कमी प्रमाण असण्याचे दुसरे कारण म्हणजे – सैन्यदलातील करीअर संधींविषयी असणारा योग्य माहितीचा अभाव ! शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यानंतर विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी पदाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. ज्या प्रमाणात मराठी विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, सनदी सेवा यांसारख्या करीअरच्या संधींमध्ये देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील उत्तुंग यश संपादन करतात, त्या प्रमाणात मराठी विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये सैन्यदलातील करीअर संधींविषयी जागरूकतेचा अभाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.
मराठी तरुणांमध्ये सैन्यदलातील करिअरविषयीच्या अनास्थेचे तिसरे कारण म्हणजे सैन्यदलातील अधिकारी पदाच्या परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शनाचा अभाव ! उत्तर भारत अथवा विविध मेट्रो शहरांमध्ये ज्या प्रमाणात सैन्यदलातील विविध परीक्षांविषयी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक अथवा शिकवणी वर्ग उपलब्ध आहेत, त्या प्रमाणात महाराष्ट्रात ते उपलब्ध नाहीत. महाराष्ट्र सरकारद्वारे विविध ठिकाणी SPI (Services Preparatory Institute) ची स्थापना करण्यात आली आहे, परंतु त्यांची प्रवेश क्षमता आणि त्यांची गुणवत्ता (काही अपवाद वगळता) याबाबत शंकाच आहे. मराठी तरूणांच्या सैन्यदलातील अनास्थेविषयी असलेले चौथे कारण म्हणजे आपल्या मनातील सैन्याविषयी असणाऱ्या गैरसमजुती ! आपल्याला वाटते की, सैन्यदल म्हणजे हिंसाचार, सैन्यदल म्हणजे गोळीबार, सैन्यदल म्हणजे कायम युद्ध आणि जीवाला धोका ! सैन्यदलाविषयीचे हे मत पूर्णतः चुकीचे आहे.
सैन्यदलामध्ये विविध प्रकारच्या शाखा असतात आणि हे सर्व घटक सैन्याच्या प्रत्येक कार्यामध्ये एक टीम म्हणून कार्यरत असतात. सैन्यामध्ये डॉक्टर, अभियंता, वकील, नर्स, ई. सर्व घटकांचा देखील समावेश असतो. यातील प्रत्येक घटक आपापले कार्य चोखपणे पार पाडत असतो आणि म्हणूनच एक टीम म्हणून सैन्यदल दिलेले लक्ष्य भेदण्यात प्रत्येक वेळी १००% यशस्वी होत असते.
सैन्यदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे असंख्य तरुण आणि तरुणी महाराष्ट्रात गावोगावी आढळतील. या सळसळणाऱ्या तरुणाईला जर सैन्यदलाच्या माध्यमातून मर्दुमकी गाजविण्याची संधी मिळाली तर मराठी कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार फडकविण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजघडीला भारतीय सैन्यदलामध्ये करीअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचे सोने करायचे असेल तर सर्वात प्रथम सैन्यदलाच्या जाहिरातीमध्ये असणारा प्रश्न आपल्याला स्वतःच्या मनाशीच विचारावा लागेल – ‘Do you have it in you?’ जर या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक असेल तर मात्र सैन्यदल हे तुमच्या व्यक्तिमत्वाला निखार देणारे करीअर क्षेत्र ठरू शकेल. सैन्यदलातील करीअरच्या संधी ह्या केवळ पोटापाण्यासाठी केलेली एक नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक आदर्शवत मार्गच आहे ! म्हणूनच एक सैन्यदलातील अधिकारी बघितला की, आपोआपच आपल्या मनात त्याच्याविषयी आदर उत्पन्न होतो, त्याच्या भारदार व्यक्तिमत्वाने आणि साहस व त्यागपूर्ण वृत्तीने आपण संमोहित होतो. तेव्हा वाट कशाची बघता, घेऊ या पहिले पाऊल सैन्यदलात अधिकारी बनण्याकडे…
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून www.satishdhage.com या संकेतस्थळावर आपल्याला सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल.)