सैन्यदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न – भाग २

 In Dainik Gavkari

विद्यार्थी मित्रानो, ‘सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधी’ या विषयावरील लेखमालेत आपण मागील लेखात महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे सैन्यदलातील अधिकारी बनण्याचे कमी प्रमाण व त्याची कारणे- याबाबतीत परामर्श घेतलाच आहे. आजच्या या  लेखात आपण शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या सैन्यदलातील विविध अधिकारी पदाच्या संधी या विषयाची चर्चा करणार आहोत.

विज्ञान शाखेतील प्रत्येल विद्यार्थ्याला सैन्यदलात अधिकारी बनण्याची संधी प्राप्त होते ती त्याच्या १०+२, म्हणजेच बारावी परीक्षेनंतर. आपण १६.५-१९.५ वर्षे वयोगटात असाल आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल तर NDA (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) परीक्षेसाठी किंवा TES (Technical Entry Scheme) परीक्षेसाठी आपण पात्र ठरू शकता. NDA मधून नौदल अथवा हवाईदल यामध्ये प्रवेश हवा असल्यास, आपल्याला बारावीपर्यंत फिजिक्स आणि गणित हे दोन विषय असणे आवश्यक आहे. TES परीक्षा उत्तीर्ण करून आपल्याला सैन्यदलातून इंजिनीअरींगची पदवी प्राप्त करून सैन्यदलात अधिकारी म्हणून कार्यरत होता येते. सैन्यदलात अधिकारी म्हणून प्रवेश करण्याचा दुसरा टप्पा म्हणजे- युनिवर्सिटी एण्ट्री स्कीम (UES) वा TGC परीक्षा.

अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील अठरा ते चोवीस वर्षे वयोगटातील विद्यार्थी ही परीक्षा देवू शकतात. अशा विद्यार्थ्याची त्याच्या इंजीनीअरिंग वर्षांच्या गुणांची सरासरी साठ टक्क्यांहून अधिक असणे आवश्यक आहे. इंजीनीअरिंग शाखेतील पदवी प्राप्त करताच सैन्यदलात तांत्रिक क्षेत्रात अधिकारी बनण्याची संधी या माध्यमातून प्राप्त होते.सिग्नल रेजिमेंट, ईएमई यांसारख्या तांत्रिक शाखांमध्ये आपण या माध्यमातून अभियांत्रिकी अधिकारी बनू शकाल.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना यासाठी केवळ SSB (Service Selection Board) व्यक्तिमत्व चाचणीला सामोरे जावे लागते. सैन्यदलातील अधिकारी पदासाठी प्रवेश करण्याची तिसरी आणि सर्व पदवीधारकांना (कला,वाणिज्य अथवा विज्ञान पदवीधारक) उपलब्ध असणारी संधी म्हणजे पदवी CDS (Combined Defence Services)परीक्षा. दोन टप्प्यांमध्ये असणाऱ्या या परीक्षा तिन्ही दलासाठी अधिकारी निवडीसाठी आयोजित केल्या जातात. या परीक्षेच्या पहिल्या भागात इंग्रजी, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी या तीन विषयाशी संबंधित बहुपार्यायायी प्रश्नांचा समावेश असतो. महिलांना Short Service Commission (SSC) च्या माध्यमातून सैन्यदलात अधिकारी बनता येते आणि यासाठी या परीक्षेमध्ये केवळ इंग्रजी आणि सामान्य अध्ययन या दोनच  विषयांचा समावेश असतो.

हवाईदलात अधिकारी बनण्यासाठी परीक्षा पद्धतीच्या याच धर्तीवर AFCAT या परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षांचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे SSB परीक्षा. हा टप्पा म्हणजे प्रत्येक उमेदवाराची सर्वांगाने केली जाणारी परिपूर्ण व्यक्तिमत्व चाचणी. पाच दिवसांहून अधिक काळासाठी चालणाऱ्या या परीक्षेमधून परीक्षार्थीचे सैन्यदलातील अधिकारी बनण्यासाठी लागणारे व्यक्तिमत्व विशेष बारकाईने तपासले जातात. यामध्ये शारीरिक, मानसिक तसेच देह्बोलीशी संबंधित पंधरा विविध प्रकारच्या व्यक्तीगुणांची विविध मानसिक चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी केली जाते.

नेतृत्वगुण,साहस,समूहात काम करण्याची हातोटी,आत्मविश्वास,संवादकौशल्य,ई. व्यक्तीविशेषाची या मानसिक चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी केली जाते. परीक्षेच्या या पद्धतीने तयारीची गरज लक्षात घेऊनच, सैन्यदलातील अनुभवी व माजी सैन्य अधिकारी यांच्या माध्यमातून MGM ICE येथे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी सीडीएस व एसएसबी परीक्षांची योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करून घेतली जात आहे. सीडीएस व एसएसबी या टप्प्यामधून यशस्वी झालेल्या उमेदवारांची शारिरीक आणि वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी देहरादून वा चेन्नई येथील संस्थांमध्ये पाठविले जाते.

पदव्युत्तर पात्रता धारक उमेदवारांसाठी देखील वेळोवेळी आर्मी एजुकेशन कोअर मध्ये अधिकारी पदाच्या जागा उपलब्ध असतात आणि SSB परीक्षांच्या माध्यमातून त्यामध्ये आपली निवड होऊ शकते. वर नमूद केलेल्या सैन्यदलातील विविध स्पर्धात्मक परीक्षा प्रत्येक वर्षातून साधारणतः दोनदा आयोजित केल्या जातात. सैन्यदलात काही विशेषज्ञांचा देखील अधिकारी म्हणून समावेश केला जातो. सैन्यदलात उपलब्ध असणाऱ्या विविध स्पेशालीस्ट विभागामध्ये आपली अधिकारी म्हणून निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध असतात. MBBS डॉक्टरांसाठी AMC, BDS डॉक्टरांसाठी ADC, परिचारिकांसाठी MNS, वकिलांसाठी JAG शाखा, पशुवैद्यकीय डॉक्टरांसाठी RVC- यांसारख्या कित्येक शाखांमध्ये लेफ्टनंट पदापासून आपल्याला सैन्यदलातील करीअरची सुरुवात करता येऊ शकेल. सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व अधिकारी पदाच्या संधींची माहिती घेतली असता आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेलच की, या सर्व पदांसाठी वयोमर्यादा ही तरुणांपुरतीच सीमित आहे. सैन्यदलाचा या परीक्षांमधून ध्येयप्रेरित आणि हरहुन्नरी तरुणांची अधिकारी म्हणून निवड करण्याकडे कल असतो.

सैन्यदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न - भाग २

सैन्यदलातील उपलब्ध असणाऱ्या अधिकारी पदाच्या असंख्य संधींचा विचार करता विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळविण्यासाठी नियमितपणे चांगले इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे आणि इंग्रजी बातम्या नियमितपणे पाहणे आवश्यक आहे. ‘ग्रुप डिस्कशन’ च्या टप्प्यामध्ये यशस्वी होण्यासाठी देखील वर्तमान पत्रांचा आपल्याला फायदा होऊ शकेल. नियमितपणे इंग्रजीमध्ये बोलण्याचा जाणीवपूर्वक सराव, विविध वक्तृत्व वा वादविवाद स्पर्धांमध्ये सहभाग- या गोष्टी आपणांस व्यक्तिमत्व विकासासाठी मदतकारक ठरू शकतात. ‘स्पर्धात्मक परीक्षेतील इंगजी विषयाची भिती’ या विषयावरील मागील एका लेखामध्ये आपण इंग्रजी विषयावर स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टिकोनातून प्रभुत्व मिळविण्याच्या मार्गांची परिपूर्ण चर्चा केली आहेच. नियमितपणे व्यायाम व आरोग्यदायी जीवनशैली आपल्याला सैन्यदलातील शारिरीक चाचणीचा टप्पा यशस्वी होण्यासाठी मदतकारक ठरू शकतील.

सैन्यदलात अधिकारी बनण्याचे पक्के ध्येय, सकारात्मक दृष्टीकोन आणि शिस्तबद्ध पद्धतीने ध्येयप्राप्तीसाठी योग्य मार्गदर्शनाखाली मार्गाक्रमण ही आपल्या यशाची त्रिसूत्री ठरु शकेल.  तेव्हा विद्यार्थीमित्रानो, आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरे जा आणि लक्षात ठेवा –

‘Arise! Awake! And stop not until the goal is achieved…’

 

विचारा प्रश्न तुमच्या मनातला?

विचारा प्रश्न तुमच्या मनातला या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे  या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न मेल मार्फत पाठवा .

मेलdrsatishdhage @ gmail.com

प्रश्न सर, मी अंतिम वर्ष MECHANICAL ENGG ची विद्यार्थिनी आहे. मी RTO इन्स्पेक्टर २०१७ परीक्षा देवू शकते का? विशाखा,औरंगाबाद

उत्तर  विशाखा, नुकतीच एमपीएससी द्वारे सहायक मोटार वाहन निरीक्षक २०१७ परीक्षेसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. आपण जर अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत असाल किंवा अभियांत्रिकी पदविका धारक असाल तर या परीक्षेसाठी आपण पात्र होऊ शकाल. विशेषतः महिलांसाठी या परीक्षेसाठी काही जागा आरक्षित आहेत. १९ फेब्रुवारी २०१७ ही या परीक्षेसाठी online अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि ३० एप्रिल २०१७ रोजी या परीक्षेची प्राथमिक परीक्षा आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी कालावधीमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. येणाऱ्या एका लेखामध्ये आपण या परीक्षेची परिपूर्ण माहिती घेणारच आहोत.या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)

स्पर्धात्मक परीक्षांच्या नजरेतून निश्चलनीकरण धोरणभाग २ – विदेशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक