सैन्यदलात एन्ट्री व्हाया एनसीसी

 In ZEE MARATHI DISHA

सैन्यदलातील सेवेविषयी आणि त्यांच्या पात्रतेविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत.  सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी एनसीसी प्रशिक्षण अनिर्वार्य असते का? एनसीसी प्रमाणपत्र धारण करणाऱ्या युवकांना सैन्यदलात काही अधिकचे फायदे प्राप्त होतात का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांच्या मनात असतात. एनसीसी म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना. शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनापासूनच युवकांमध्ये स्वयंशिस्त, साहस, शारीरिक व मानसिक कणखरपणा आणि देशप्रेमाचं बाळकडू पाजण्यासाठी २६ नोव्हेंबर १९४८ रोजी ‘ एनसीसी ’ या अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या संघटनेची स्थापना करण्यात आली. सैन्यदलात अधिकारी पदावर आरूढ होण्यासाठी शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनापासूनच एनसीसी प्रशिक्षण अनिर्वार्य जरी नसले तरीदेखील एनसीसीच्या कठोर प्रशिक्षणातून तावून-सुलाखून निघालेल्या विद्यार्थ्यांना लष्करात अधिकारीपद भूषविण्यासाठी विशेष संधी उपलब्ध असतात. सैन्यदलातील या विविध संधींचा परामर्श आपण आजच्या या लेखातून घेणार आहोत.

लष्करात अधिकारी बनण्याच्या दृष्टीने अर्हताप्राप्त एनसीसी उमेदवारांसाठी सैन्यदलामार्फत प्रत्येक वर्षी प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. थलसेनेमध्ये साधारणतः ५० जागा एनसीसी एन्ट्री प्रवेशप्रक्रियेतून पुरुष उमेदवारांसाठी तर चार जागा महिला उमेदवारांसाठी अधिकारी पदासाठी उपलब्ध असतात. सैन्य दलातील एनसीसी एन्ट्री प्रवेशप्रक्रियेसाठी उमेदवाराकडे काही विशेष पात्रता असणे आवश्यक असते. या प्रवेशप्रक्रियेसाठी उमेदवार हा अविवाहित असणे आवश्यक असते तर त्याचे वय १९ ते २५ वर्षे वयोगटातील असावे लागते. उमेदवार हा कुठल्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असावा लागतो. अशा पदवीधर उमेदवाराला पदवी परीक्षेत ५० टक्क्य़ांहून अधिक गुण असणे आवश्यक असते. पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिकत असलेले तरुण-तरुणीदेखील या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असून त्यांना पदवी (कला, वाणिज्य, शास्त्र कुठल्याही विद्याशाखेचा) अभ्यासक्रमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांत सरासरी गुण ५० टक्क्य़ांहून अधिक असणे आवश्यक असते.

एनसीसी एन्ट्री प्रवेशप्रक्रियेतून अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवाराकडे एनसीसी आर्मी विंग, नेव्हल विंग अथवा एअरफोर्स विंगचे ‘सी’ सर्टिफिकेट असणे अनिर्वार्य असते आणि त्याने एनसीसी‘सी’ सर्टिफिकेट परीक्षेमध्ये ‘ए’ अथवा ‘बी’ श्रेणी संपादन केलेली असणे आवश्यक असते. त्याचबरोबर उमेदवाराने एनसीसी सिनियर डिविजन अथवा एनसीसी विंगमध्ये कमीत कमी दोन वर्षे सेवारत असणे आवश्यक असते. हवाई दलातील एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट धारक पुरुष उमेदवारांना हवाई दलात पायलट बनण्याची संधी असते. त्याकरिता त्या उमेदवाराला अर्ज एनसीसी एअर विंगद्वारा करणे आवश्यक असते. इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये प्रवेशाकरिता एनसीसी नेव्हल विंग ‘सी’ सर्टिफिकेट धारकांना सहा जागा राखीव असून त्यासाठी बी.ई./बी.टेक्. पदवी असणे गरजेचे असून त्याकरिता सीडीएस परीक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड होऊ शकते.

एनसीसी स्पेशल एन्ट्री प्रक्रियेमधून अंशकालीन सेवेसाठी म्हणजेच एसएससी कमिशनसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून अर्हताप्राप्त उमेदवारांना एस.एस.बी. परीक्षेच्या पाच दिवसाच्या व्यक्तिमत्व चाचणी टप्प्यासाठी बोलावण्यात येते. या टप्प्यामध्ये मानसिक चाचणी, सामूहिक परीक्षण आणि वैयक्तिक मुलाखतिच्या वेगवेगळ्या चाचण्यांमधून उमेदवाराचे व्यक्तिमत्व, सैनिकी अधिकारी पदासाठी योग्य आहे की नाही, याची चाचपणी केली जाते. मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या आणि वैद्यकीय चाचणीतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना चेन्नई येथील ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’ येथे ४९ आठवडय़ांचे सैनिकी प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपविल्यानंतर या उमेदवारांना भारतीय सैन्य दलांत ‘लेफ्टनंट’ ही रँक मिळते आणि त्यानंतर हे अधिकारी सैन्य दलांच्या वेगवेगळ्या रेजिमेंट/युनिटमध्ये कार्यरत होतात. एनसीसी स्पेशल एन्ट्री प्रक्रियेमधून उमेदवारांची निवड एसएससी कमिशनसाठी दहा वर्षांसाठी होते, जी आणखीन चार वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. एनसीसी एन्ट्री प्रवेशप्रक्रियेतून निवड झालेल्या युवक अथवा युवतींसाठी त्यांच्या प्रवेशप्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ते प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवाराने अविवाहित असणे अनिर्वार्य असते. प्रशिक्षण कालावधीदरम्यान उमेदवारांना ५६,१०० रुपये विद्यावेतन प्राप्त होते, त्याचबरोबर ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यशस्वी उमेदवाराला PGDDMSS (Post Graduate Diploma in Defence Management and Strategic Studies) ही पदविका मद्रास विद्यापिठाद्वारे प्रदान केली जाते.

सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. पण बऱ्याच वेळा शारीरिक क्षमता, उपजत गुणवत्ता असूनही केवळ मार्गदर्शनाअभावी सैन्यात भरती होणे सामान्य विद्यार्थ्यांना जमत नाही. म्हणून सक्षम व शक्तीमान सैनिक व अधिकारी घडविणे व त्याचबरोबर आदर्श नागरिक घडवून विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास करणे यांसाठी एनसीसी सतत कार्यरत असते. शालेय जीवनापासूनच उपलब्ध असणाऱ्या एनसीसी सारख्या अभ्यासक्रमाची गरज ही केवळ शालेय अथवा महाविद्यालयीन परीक्षांमध्ये अधिकचे गुण मिळविण्यासाठी अथवा सुरक्षादलामध्ये एखादी नौकरी मिळविण्यासाठी नसून वैयक्तिक व्यक्तिमत्वविकासासोबतच, एक जबाबदार नागरिक घडविण्यासाठी आणि पर्यायाने सामाजिक विकासासाठी आणि राष्ट्रनिर्माणासाठी आहे. आजघडीला एनसीसी सारखे अभ्यासक्रम जरी शालेय अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक असले तरी येणाऱ्या काळात सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या कणखर युवापिढी तयार करण्यासाठी सरकारने अशा अभ्यासक्रमांचा समावेश अनिर्वार्य घटकांमध्ये करता येईल का? या अनुषंगाने देखील सांगोपांग विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)