सैन्यदलात भारतीय नारीशक्ती – भाग १
‘बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना,
अन्यायाला भरे कापरे बघुनि शूर अभिमाना .
जय आत्मशक्तिच्या देशा,
जय त्यागभक्तिच्या देशा
तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा .’
कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील या ओळी स्वतःला मातृभूमीसाठी पूर्णतः झोकून देणाऱ्या आजच्या निडर भारतीय युवतींना तंतोतंत लागू पडतात. फ्लाइट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी , फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत आणि फ्लाइट लेफ्टनंट मोहना सिंग – भारतीय हवाई दलातील या पहिल्या तीन महिला लढाऊ वैमानिकांनी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच कामगिरी करून दाखवलेली आहे. वयाच्या अवघ्या पंचवीसव्या वर्षी फ्लाइट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदीने मिग-२१ बायसन लढाऊ विमानावरील खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून ‘हम भी कुछ कम नही’ हा संदेशच जणू संपूर्ण जगाला दिलाय.एकविसाव्या शतकातील या आधुनिक, निडर भारतीय युवतीना भारतीय सैन्यदलात उपलब्ध असणाऱ्या विविध संधी आणि गेल्या काही दशकांतील महिलांच्या सैन्यदलातील सहभागाविषयी घडलेली स्थित्यंतरे यांचा परामर्श आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.
युद्धाच्या धामधुमीत जखमी सैनिकांवर केली जाणारी सेवाशुश्रुषा असो, रणभूमीवर सैन्याला योग्यवेळी पुरवली जाणारी रसद असो की सैन्यदलांच्या तांत्रिक शाखांमध्ये दाखविलेली आपली कौशल्य असो- लष्कराच्या तिन्ही दलांत विविध विभागांमध्ये तैनात असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी वेळोवेळी त्यांना सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडून आपली क्षमता सिद्ध केली आहे. महिलांच्या सैन्यदलातील या कामगिरीची दखल घेऊन तिन्ही दलांतील करीअरच्या संधी त्यांच्यासाठी सातत्याने विस्तारत आहेत. परिणामी, या दलांमधील महिलांची संख्याही सातत्याने गेल्या काही दशकांमध्ये वाढत आहे. मुळात लष्कराच्या वैद्यकीय विभागामध्ये महिला डॉक्टर ह्या स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनच कार्यरत होत्या. सैनिकी रुग्णालयातील परिचारिका म्हणून वर्ष १९२७ पासून तर डॉक्टर म्हणून वर्ष १९४३ पासून महिला अधिकारी आपल्या देशाच्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत. या विभागांमध्ये चांगली कामगिरी बजावूनही सैन्यदलातील बिगर वैद्यकीय विभागांची द्वारे महिलांसाठी खुली होण्यास मात्र नव्वदीचे दशक उजाडावे लागले. सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये वर्ष १९९१-९२ मध्ये शिक्षण, कायदा, प्रशासकीय, रसद पुरवठा, तांत्रिक, हवामानविषयक आदी विभागांमध्ये महिलांना अधिकारी म्हणून घेण्यास सुरुवात झाली.
मात्र ही संधी फक्त अंशकालीन सेवेसाठी म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी होती जी कालांतराने स्थायी सेवेसाठी देखील मान्य करण्यात आली. महिलांना थेट लढाऊ विभागांमध्ये संधी द्यावी, अशी मागणी दीर्घकाळापासून होती. पाश्चात्य देशांमध्ये जरी लढाऊ विभागांमध्ये महिला कार्यरत असल्या तरी भारताची संस्कृती सर्वस्वी भिन्न असल्याने महिलांना अशा पदांवर नेमणुका देणे योग्य होणार नाही असा एक मतप्रवाह होता. युद्ध आघाडीवर किंवा युद्धनौकांवर महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचा, तसेच महिला युद्धकैदी झाल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य गुंतागुंतीचा मुद्दाही वेळोवेळी या चर्चेत पुढे केला जातो. मात्र निमलष्करी दलांमध्ये, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत भारतीय महिलांनी चोख कामगिरी बजावलेली असताना त्यांना संधी नाकारणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन वेळोवेळी संरक्षणदलातील तज्ञांनी रोखठोकपणे मांडलेले आहे. या सर्व मतप्रवाहांचा सांगोपांग विचार करून आजघडीला महिलांना सैन्यदलात विविध पदांवर संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महिलांना संधी नाकारताना त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही अनेकदा पुढे केला जातो.
मुळात काही दशकांपूर्वी नागरी क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी पहिल्यांदा घराबाहेर पडलेल्या महिलांनाही सुरक्षेच्या मुद्द्याला तोंड द्यावे लागले होते. मात्र कालांतराने तिथे महिलांची संख्या वाढली, तसा हा मुद्दा आपोआपच निकाली निघाला. त्यामुळे लष्कराच्या बाबतीतही सध्या महिलांची संख्या कमी असल्याने सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा ठरत असला तरी त्यावर उपाय म्हणून महिलांना रोखण्यापेक्षा अधिकाधिक संधी देणे हेच अधिक उचित होऊ शकेल.
सुरुवातीला केवळ सैन्यदलाच्या काहीच शाखांमध्ये पूरक भूमिकेत असणाऱ्या महिलांना आज सैन्यदलात अतिशय जबाबदारीची पदे दिली जात आहे. आतापर्यंत सैन्यदलात केवळ अधिकारी पदांवरच महिलांची नेमणूक केली जात होती आणि PBOR ( Persons Below Officers Rank) पदांवर महिलांची नेमणूक शक्य नव्हती. नुकताच भारत सरकारने महिलांना मिलिट्री पोलीस दलात PBOR पदांवर देखील नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने सैन्यदलाच्या बाकी शाखांमध्येदेखील महिलांसाठी प्रवेशाची द्वारे उघडली आहेत. सैन्यदलात होणाऱ्या गुन्हे अन्वेषणाचे काम मिलिट्री पोलिसांवर सोपवण्यात येणार आहे. मिलिट्री पोलीस पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून उमेदवाराचे वय सतरा ते एकवीस वर्षांदरम्यान असावे व उंची १४२ सेंमी पेक्षा कमी नसावी असे पात्रता निकष लावण्यात आलेले आहेत. साधारणपणे ८०० महिलांची मिलिट्री पोलीस या पदावर नजीकच्या काळात नियुक्ती केली जाणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक वर्षाला ५२ महिलांची निवड होण्याची अपेक्षा आहे.
सैन्यदलातील युवतींसाठी उपलब्ध असणाऱ्या अधिकारी पदाच्या संधी आणि त्यासाठी लागणारी पात्रता व यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारा सकारात्मक दृष्टिकोन या विषयांची चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)