तयारी ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ची
मुलाखत चाचणी हा साधारणतः कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा असतो. मुलाखत चाचणीच्या यशापयशावर उमेदवाराचे भवितव्य ठरत असते. सहसा मुलाखतमंडळ हे उमेदवाराची मुलाखत अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात व उमेदवाराला सहजसुलभ वातावरणात ठेवून घेण्याचा प्रयत्न करत असते. अपवादात्मक परिस्थितीत मुलाखत मंडळ ही सह्जसुलभतेची पद्धत न वापरता ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ ची पद्धत वापरतात आणि नेमकी अशा प्रकारच्या मुलाखतीची अपेक्षा वा तयारी न केलेले उमेदवार अशा मुलाखतीच्यावेळी गांगरून जातात आणि परिणामी मुलाखत टप्प्यात अयशस्वी ठरतात. ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ म्हणजे काय आणि त्याला उमेदवाराने कशा रीतीने सामोरे जावे, या बाबींची माहिती आपण आजच्या या लेखातून घेणार आहोत.
‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ हा मुलाखतीचा असा एक प्रकार आहे, ज्या पद्धतीच्या माध्यमातून उमेदवार दडपणाखाली कशा प्रकारे वावरतो व त्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू कशा रीतीने अशा प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जातात,याची चाचपणी मुलाखतमंडळाद्वारे केली जाते. मुलाखत मंडळाचा ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’च्या माध्यमातून उमेदवार भविष्यात त्याच्या कार्यालयीन कामादरम्यान येणाऱ्या विविध दबावांना कशा रीतीने सामोरे जाईल, तसेच त्याचे मानसिक व्यक्तिमत्व कितपत कणखर आहे, या बाबींची चाचपणी करण्याचा हेतू असतो.
‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ घेण्याचे वेगवेगळे प्रकार व पद्धती मुलाखत मंडळ वापरू शकते, जेणेकरून मुलाखतीदरम्यान उमेदवार हा दडपणाखाली यावा हा त्यामागे उद्देश असतो. साधारणतः कुठलाही उमेदवार मुलाखतीला जाताच मुलाखत मंडळाला अभिवादन करतो. मुलाखत मंडळ देखील सुहास्यवदनाने उमेदवाराचे स्वागत करत असतात व त्यास दिलेल्या जागी बसण्यास सांगतात. ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ दरम्यान मुलाखत मंडळाचे प्रमुख उमेदवाराने केलेल्या अभिवादनाला कुठलाही प्रतिसाद न देता उमेदवाराकडे दुर्लक्ष केल्यासारखे भासवू शकतात. उमेदवाराला बसण्यास न सांगितल्यामुळे उमेदवार कशा पद्धतीने वागतो, तो बेचैन होतो, तो स्वतःहून खुर्चीमध्ये बसतो की, शांतपणे मुलाखत मंडळाच्या पुढील आदेशाची वाट पाहतो- याकडे मुलाखत मंडळाचे लक्ष असते. सामान्य मुलाखत पद्धतींमध्ये साधारणतः उमेदवाराला दडपण येऊ नये म्हणून मुलाखत मंडळ सुरुवातीला उमेदवाराच्या वैयक्तिक माहितीविषयी अथवा त्याच्या छंदाविषयी अथवा त्याला माहिती असलेल्या विषयाशी निगडीत प्रश्न विचारत असतात.
‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ मध्ये मुलाखतीची सुरुवातचसुरुवातीलाच अतिशय किचकट अथवा तांत्रिक माहितीशी संबंधित प्रश्नांच्या भडीमाराने केली जाते. उमेदवार या अनपेक्षित प्रश्नांच्या भडीमाराने घाबरून जातो की स्वतःचे संतुलन साधत या प्रश्नांना योग्यप्रकारे बगल देतो, हे याठिकाणी तपासले जाते. बऱ्याचवेळी मुलाखत मंडळ हे हेतुपुरस्सरपणे उमेदवाराचे उत्तर संपण्याआधीच उमेदवाराला रोखतात आणि पुढचा प्रश्न विचारतात, जेणेकरून उमेदवाराची विचारश्रुंखला खंडित व्हावी आणि उमेदवार हा दबावाखाली यावा. बऱ्याचवेळी ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ दरम्यान उमेदवाराचे राज्य अथवा शहर अथवा व्यवसाय अथवा शैक्षणिक अर्हतेविषयी काहीसे प्रतिकूल अथवा अपमानास्पद विधान हेतुपुरस्सरपणे मुलाखत मंडळाद्वारे प्रदर्शित केले जावू शकते, अशावेळी उमेदवाराने आत्मविश्वासाने आपला तोल न ढळू देता आपला मुद्दा हा शांतपणे मांडण्याचा प्रयत्न करावा. ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ दरम्यान काहीवेळी उमेदवाराला खिंडीत पकडण्यासाठी मुलाखतमंडळ एखाद्या वादग्रस्त विषयावरील उमेदवाराचे मत विचारू शकतात. अशावेळी उमेदवाराने अशा वादग्रस्त विषयावरील विधानांचे समर्थन वा खंडन करण्यासाठी संविधान, अस्तित्वात असणारे कायदे आणि सामजिक परिस्थितीचे भान ठेवून समर्पक असे उत्तर द्यायला हवे.
‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ हा जरी उमेदवारासाठी अनपेक्षित आणि नकोसा वाटणारा अनुभव असला तरी तो स्वीकारणे वा नाकारणे हा विकल्प उमेदवाराच्या हातात नसतो. अशावेळी ती वेळ मारून नेणे आणि दिलेल्या मुलाखतीच्या टप्प्याच्या संधीचे सोने करणे, हे कसब उमेदवाराला जमायला हवे. ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ मध्ये मुलाखत मंडळाने कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला अथवा काही वादग्रस्त विधाने जरी केली, तरी मुलाखतीच्या दरम्यान शांतचित्ताने आणि संपूर्णतः संतुलित मानसिकतेने मुलाखतीला सामोरे जाणे,ही कला उमेदवाराला विकसित करावीच लागते. उमेदवाराला ही गोष्ट लक्षात यायला हवी की, ही मुलाखत हेतुपुरस्सरपणे दबावाखाली घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे त्याने आपले मानसिक संतुलन ढळू न देणे ,यावर विशेष प्रयत्न करायला हवे. उमेदवार हा एखादा प्रश्न समजला नाही किंवा त्याला त्या प्रश्नाचे योग्यप्रकारे विश्लेषण करता आले नाही, तर तो मुलाखत मंडळाला तो प्रश्न पुन्हा विचारु शकतो किंवा त्याविषयी आणखीन माहिती विचारू शकतो.
या सर्व प्रश्नांच्या दरम्यान केवळ वस्तुनिष्ट माहिती सांगण्याऐवजी एखादे उदाहरण अथवा खरीखुरी परिस्थिती सांगून त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा उमेदवाराने प्रयत्न करावा, जेणेकरून उमेदवाराला आपल्या व्यक्तिमत्वाचा सकारात्मक दृष्टीकोन मुलाखत मंडळासमोर मांडता येईल. उमेदवाराने नेहमी आपल्या उत्तरांमध्ये वादग्रस्त विधानांपासून दूर राहून कायदेशीर, संवैधानिक आणि सामाजिक परिस्थीतीचा विचार करून उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. मुलाखतमंडळाचा उमेदवाराला दबावाखाली टाकण्याचा कितीही प्रयत्न असला तरीही संपूर्ण मुलाखतीदरम्यान उमेदवाराने आदरयुक्त भाषा आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोली ठेवण्याचा प्रयत्न करावा. जरी एखादा मुलाखतकर्ता हेतुपुरस्सरपणे ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ घेण्याचा प्रयत्न करत असेल तरीसुद्धा उमेदवाराने उत्तर देताना मुलाखतमंडळातील सर्व सदस्यांना उद्देशून आणि कुठल्याही मुलाखतमंडळातील सदस्याशी दुजाभाव न ठेवता, सर्वांशी संवाद साधत उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.
विद्यार्थीमित्रानो, आपल्याला ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ला जरी सामोरे जावे लागले तरी आपली त्या मुलाखतीदरम्यान निवड होण्याची शक्यता कमी होत नाही. उलटपक्षी आपणास ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ शांतचित्ताने, सकारात्मक दृष्टिकोनातून आणि कणखर मानसिकतेचा परिचय देत जर सादर करता आला तर आपल्याला अशा ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’च्या माध्यमातून मुलाखत टप्प्यामध्ये चांगले गुण मिळविता येतील. मित्रानो, एक गोष्ट लक्षात ठेवा ‘स्ट्रेस इंटरव्ह्यू’ असो वा साधारण मुलाखत पद्धती, शेवटी तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोणच आपले यश वा अपयश ठरविणार आहे. तेव्हा सुहास्यवदनाने मुलाखतीला सामोरे जा आणि तसेच यशस्वी होवून सुहास्यवदनाने मुलाखत हॉलमधून बाहेर या.
विचारा प्रश्न तुमच्या मनातला?
‘विचारा प्रश्न तुमच्या मनातला’ या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन व येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न ई–मेल मार्फत पाठवा .
ई–मेल – drsatishdhage @ gmail.com
प्रश्न– सर, माझ्या मनात यूपीएससी परीक्षेची तयारी करावी की सीडीएस परीक्षांची तयारी करून सैन्य अधिकारी व्हावे, याबाबत शंका आहे. नेमके मी काय करावे? –सह्देव,औरंगाबाद
उत्तर– सह्देव, आपण आपल्या प्रश्नामध्ये स्वतःविषयी आणि आपल्या शैक्षणिक अर्हतेविषयी माहिती दिलेली नाही. खरे पाहिले तर यूपीएससी परीक्षांमधून सनदी अधिकारी अथवा IPS अधिकारी बनणे असेल काय किंवा सीडीएस/एसएसबी परीक्षांची तयारी करून सैन्यदलात अधिकारी होणे असेल काय, दोन्हीही करीअर ही उत्कृष्टच आहेत. याबातीत निर्णय घेताना आपला कल,शारिरीक व मानसिक क्षमता, कुटुंबाचा आपल्या निर्णयात सहभाग- या काही घटकांचा विचार करावा लागेल. माझा आपणास सल्ला आहे की, यापैकी कुठलीही परीक्षा आपल्याला द्यावयाची असेल तर आपल्याला या परीक्षाचा बेसिक अभ्यास सुरु करावाच लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने आणि योग्य मार्गदर्शनाखाली आपली तयारी सुरु करा आणि यशोमार्गावर आपली वाटचाल सुरु करा. अशा स्पर्धात्मक परीक्षांविषयी विस्तृत माहिती व मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)