स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीचा ‘श्रीगणेशा’

 In Dainik Gavkari

विद्यार्थीमित्रांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या ‘यशाची पंचसूत्री 5-P’ चा परामर्श आपण मागील एका लेखात घेतलाच आहे. निश्चित ध्येय (Purpose), सकारात्मक दृष्टीकोन (Positive attitude), वारंवार सराव (Practice), सहनशीलता (Perseverance) आणि नम्रता (Politeness) या पंचसूत्रीच्या आधारे आयुष्यात आणि विशेषतः स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविता येते. स्वतःच्या सामर्थ्यावर संपूर्ण विश्वास असणाऱ्या आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची जिद्द मनात बाळगणाऱ्या विद्यार्थ्याने नेमका आपल्या तयारीचा ‘श्रीगणेशा’ कसा करावा? खरोखरच यूपीएससी परीक्षेतून यश मिळविणे आपल्यासारख्या मराठी माध्यमांतून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी शक्य आहे का? यूपीएससी,एमपीएससी,सीडीएस,एसएसबी बँकिंग- यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीची सुरुवात केव्हापासून करावी? तयारीचे कोणकोणते टप्पे असावेत? यांसारख्या काही प्रश्नांचा आपण आजच्या या लेखातून परामर्श घेण्याचा प्रयत्न करू.

आयुष्यात कुठल्याही परीक्षेत यश मिळविण्यासाठी शॉर्टकट नसतो आणि स्पर्धात्मक परीक्षासुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. आयएएस, आयपीएस परीक्षांमध्ये वयाच्या पंचविशीच्या आतच यूपीएससी परीक्षेच्या आपल्या पहिल्याच प्रयत्नांत यशस्वी झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या यशाचे रहस्य जर तुम्ही जाणून घेतले तर तुम्हाला लक्षात येईल की, या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘नियोजनबद्ध, शिस्तपूर्ण आणि योग्य मार्गदर्शनखाली प्रयत्न’ करणे हे नितांत आवश्यक आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी लाभलेल्या या सर्व यशस्वितांमधील एक समान दुवा म्हणजे पदवी परीक्षा पूर्ण होण्याची वाट न बघता, पदवी अभ्यासक्रमाच्या फस्ट ईयरपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे! पदवी संपादन करत असताना, त्यासोबतच त्यांनी आपल्या आयुष्यातील दोन ते तीन वर्षे ही पूर्णपणे यूपीएससी, एमपीएससी परीक्षांसाठी समर्पित केली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपणा सर्वांसमोर एवढया कमी वयात त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे.

यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये संपूर्ण भारतातून सर्वप्रथम आलेली टीना धाबी असो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी झालेला जालना जिल्ह्यातील अन्सार शेख असो की काही वर्षांपूर्वी संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक प्राप्त झालेला डॉ बसंत गर्ग असो- हे सर्व गुणवंत आपल्या महाविद्यालयीन जीवनाच्या सुरुवातीपासूनच किंबहुना शालेय जीवनापासूनच आपल्या ध्येयाप्रती जागरूक होते आणि त्यादृष्टीने प्रयत्नशील होते, म्हणूनच ते एवढया कमी वयात यशस्वी होवू शकले. आजघडीला पस्तीस वर्षांपेक्षाही जास्त कालावधीची शासकीय सेवा करण्याची संधी त्यांच्यासमोर असल्यामुळे नोकरशाहीतील सर्वोच्च कॅबिनेट सचिव अथवा राज्यांतील मुख्य सचिवाचे पद त्यांना काही वर्षांनंतर भूषविता येऊ शकते आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाची छाप जनसामान्यांच्या आयुष्यावर पाडण्याची संधी त्यांना प्राप्त होवू शकते आणि हे त्यांना शक्य झाले आहे ते केवळ त्यांच्या वयाच्या पंचविशीच्या आतील स्पर्धार परीक्षांमधील उत्तुंग यशामुळेच!

आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील, विशेष करून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा यूपीएससी, एमपीएससी परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा टक्का  वाढवावयाचा असेल तर पारंपारिक वैद्यकीय, इंजिनीअरिंग- यांसारख्या करीअरच्या मागे धावण्यापेक्षा सिविल सर्विसेस, सैन्यातील अधिकारी पदे हीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण, किंबहुना त्याहून चांगले करीअर बनविण्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यासाठी जितक्या लवकर आपण सिविल सर्विसेस परीक्षांची तयारी करायला सुरुवात करु, तितके आपण आपल्या यशाच्या जवळ लवकर पोहचू. तयारीच्या पहिल्या टप्प्यातच आपण अवजड अशा पुस्तकांची भलीमोठी यादी समोर ठेवून बसण्यापेक्षा ‘सोप्याकडून अवघड गोष्टींकडे’ आणि ‘माहित असलेल्या गोष्टींकडून नवीन ज्ञानाकडे’ अशी अभ्यासाची दिशा ठेवायला हवी.

या सर्व परीक्षांचा गाभा म्हणजे मुलभूत संकल्पना समजावून घेणे आणि त्यावर आधारित विश्लेक्षणात्मक विवेचन करणे. यांसाठी सुरुवातीला कुठलीही अवजड पुस्तके न वाचता कला व विज्ञान विषयांशी संबंधित एनसीईआरटीची इयत्ता सहावी ते बारावीची पुस्तके प्रत्येक ओळ न ओळ समजून उमजून वाचणे ही होय. आपल्या अभ्यासाचे टप्पे हे – मुलभूत संकल्पनांची समज ते त्या ज्ञानाचे वेवेगळ्या विषयांच्या संकल्पनांशी एकत्रीकरण ते त्यांचा चालू घडामोडींशी विश्लेषणात्मक समन्वय- अशा साखळीबद्ध पद्धतीने हवेत. हे वरकरणी दिसायला जरी सोपे वाटत असले तरी त्यासाठी शिस्तबद्ध तयारीची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज लाभते. तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या सोबतीला भारत सरकारद्वारा प्रकाशित केले गेलेले ‘ इंडिया ईयर बुक ’ हे सुध्दा अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच आपण नियमितपणे चांगले वृत्तपत्र वाचण्याची नियमित सवय लावणेसुध्दा अत्यंत आवश्यक आहे.

आपण इंग्रजी माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असाल तर ‘द हिंदू’ सारखे वृत्तपत्र वाचावे. नेमके वृत्तपत्रांमध्ये परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून काय वाचावे, कसे वाचावे, कुठल्या गोष्टींवर विशेष भर द्यावा, वृत्तपत्रावर आधारित नोटस कशा काढाव्यात? यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची चर्चा आपण येणाऱ्या काही लेखांमध्ये विस्तृतपणे मागील काही लेखांमध्ये केली आहेच. आपल्याला माहितच आहे की, वर्तमानपत्रातील मुख्य पान, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, वाणिज्य बातम्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपादकीय पान न चुकता दररोज वाचण्याची सवय स्वतःला लावावी. आपण जे वाचतो, ऐकतो, पाहतो, बोलतो- त्याच गोष्टींच्या आधारावर विचार करून आपले मत बनवत असतो.

त्यासाठी दररोज चांगले वृत्तपत्र आणि एखादे चांगले स्पर्धात्मक परीक्षांसाठीचे मासिक वाचण्याची सवय अंगी जडवावी. स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा अथवा मुलाखतीची तयारी, असा भेदभाव न करता सर्वसमावेशक असा आपला अभ्यासाचा दृष्टीकोन ठेवावा, जेणेकरून नंतर आपल्याला गरजेनुसार काही गोष्टींवर विशेष लक्ष्य केंद्रित करण्यासाठी फायदा होईल. व्यक्तिमत्व विकास आणि मुलाखतीची तयारी ही काही दिवसांत वा महिन्यांत होत नसते, तर ती एक निरंतर प्रक्रिया आहे आणि त्यासाठी आतापासूनच प्रयत्न घ्यायला सुरुवात करावयाला हवी, जेणेकरून आत्मविश्वास, बोलण्याची शैली, स्वतःला व्यक्त करण्याची शैली, भाषेवर प्रभुत्व- यांसारख्या गोष्टींवर प्रभुत्व मिळविता येईल.

‘शुभस्य शीघ्रम’ या उक्तीप्रमाणे आजपासूनच, किंबहुना आतापासूनच तुम्ही स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीला सुरुवात करायला हवी. आपले ध्येय तर आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होऊन गाठायचेच आहे, पण त्याहून महत्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेतून जाताना तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, कळत नकळत जो अमूलाग्र बदल होणार आहे तो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. तेव्हा वाट कशाची बघता, जरासाही वेळ वाया न दडवता लागा तयारीला आपल्या ध्येयप्राप्तीसाठी आणि गाठा शिखर  उत्तुंग यशाचे…

स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीचा ‘श्रीगणेशा’

विचारा प्रश्न तुमच्या मनातला?

विचारा प्रश्न तुमच्या मनातला या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे  या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न मेल मार्फत पाठवा .

मेलdrsatishdhage @ gmail.com

प्रश्न सर, माझे मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. MPSC परीक्षांची तयारी करण्यासाठी NCERT ची पुस्तके वाचणे आवश्यकच आहे का ?    -ओंकार ,जालना

उत्तर ओंकार, UPSC अथवा MPSC परीक्षांमधून आपली वेगवेगळ्या विषयांची मुलभूत समज आणि विश्लेषणात्मक क्षमता तपासली जाते. NCERT च्या सहावी ते बारावी पर्यंतच्या पुस्तकांमधून वेगवेगळ्या विषयांच्या मुलभूत संकल्पना आपल्याला संपूर्णपणे समजण्यासाठी मदत होते. NCERT ची पुस्तके मिळविण्यासाठी किंवा इंग्रजीमधून समजण्यासाठी अडचण होत असल्यास, सुरुवातीला आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाची त्याच विषयांची पुस्तके मुलभूत ज्ञानासाठी वापरू शकता. मुलभूत संकल्पना समजणे हे आपले यांसाठी ध्येय आहे, कुठलेही पुस्तक वापरणे हे त्या ध्येयप्राप्तीसाठी केवळ एक साधन आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीविषयी आपल्या मनात असलेल्या शंकानिरसनासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.

 

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)

सैन्यदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न - भाग १स्पर्धात्मक परीक्षांच्या नजरेतून निश्चलनीकरण धोरण