स्पर्धात्मक परीक्षांच्या नजरेतून निश्चलनीकरण धोरण

 In Dainik Gavkari

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा भारतीय अर्थव्यवस्थेतून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. भारत सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा दूरगामी परिणाम आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या होताना दिसत आहे. राजकीय पटलापासून ते अर्थतज्ञांपर्यंत आणि सामान्य जनतेपासून ते स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थ्यांपर्यंत हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा बनलेला आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या चालू घडामोडी घटकाच्या तयारीसाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा असून त्या विषयाला एका विशिष्ट दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज आहे. भावनिक, पूर्वग्रहदूषित वा राजकीय दृष्टीने या विषयाचा अभ्यास न करता केवळ तथ्यांवर आधारित आणि उपलब्ध माहितीच्या आधारे या विषयाचे विवेचन आपणांस स्पर्धात्मक परीक्षांसाठी फायद्याचे ठरेल. आजच्या या लेखात स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टिकोनातून निश्चलनीकरण धोरण व त्यांच्याशी संबंधित विविध घटकांचा अभ्यास कसा करावा याची आपण माहिती घेणार आहोत.

निश्चलनीकरण या विषयाची स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करताना केवळ निश्चलनीकरण या संकल्पनेचा अभ्यास न करता त्याच्याशी निगडीत अभ्यासक्रमातील ईतर घटकांचा देखील समावेश करणे आवश्यक आहे. काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्था आणि रोकडविरहित अर्थव्यवस्था असा सर्वसमावेशक अभ्यास आपल्याला निश्चलनीकरण धोरणाचे विवेचन करतांना करावा लागेल. अभ्यासक्रमातील कुठलीही संकल्पना सविस्तररीत्या समजावून घेण्यासाठी त्या संकल्पनेशी संबंधित ‘का,काय,कसे,कुठे आणि केव्हा?’ हे पाच मोलाचे प्रश्न विचारले की आपली त्या घटकाची परिपूर्ण तयारी होते. काळा पैसा वा समांतर अर्थव्यवस्था या संकल्पनांची ओळख, भारतीय अर्थव्यवस्थेत काळा पैसा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची कारणे, समांतर अर्थव्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे विपरीत परिणाम, भारत सरकारद्वारा समांतर अर्थव्यवस्था मोडीस काढण्यासाठी केले गेलेले प्रयत्न, संबंधित कर कायदे व त्यातील सुधारणा, संबंधित आंतरराष्ट्रीय करार- या सर्व गोष्टींचा आपणास निश्चलनीकरण धोरण समजावून घेण्यासाठी एकत्रित अभ्यास करावा लागेल.

बहुपर्यायी प्रश्नांची तयारी करतांना संकल्पनांशी संबंधित विविध प्रश्नांसोबतच भारतीय चलनाचा इतिहास,चलन अथवा नोटा छापण्याचे भारतातील आरबीआयच्या अखत्यारीतील कारखाने, निश्चलनीकरण धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेतील इतिहास, त्याच्याशी संबंधित विविध देशातील मागील काही दशकांतील प्रयत्न, आरबीआयचे मौद्रिक धोरण व त्यासंबंधित साधने- या बाबींचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. निश्चलनीकरण विषयाचा अभ्यास करतांना सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विषयाचे फायदे व तोटे यांचा संतुलितपणे विचार करणे आवश्यक ठरते. त्यानंतर या धोरणाशी संबंधित निर्माण झालेल्या विविध अडचणी, अर्थव्यवस्थेवरील त्यांचा परिणाम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भविष्यातील या अडचणींवर मात करण्यासाठी सरकारची अपेक्षित असलेली रणनीती- यांचाही आपणास विस्तृत अभ्यास करावा लागेल.

केवळ अडचणींचा पाढा न वाचता, त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्याची पद्धतीचा उहापोह आपल्या उत्तरांमध्ये असावा. याच विषयाशी संबंधित आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे रोकडविरहित अर्थव्यवस्था आणि डिजिटल अर्थव्यवस्थेकडे सुरु असलेली भारताची वाटचाल! गेल्या काही दिवसांमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेकडे भारताची होणारी वाटचाल पाहता याच्याशी संबंधित इतर देशांचे आंतरराष्ट्रीय अनुभव, भारतासारख्या देशामध्ये ही संकल्पना राबविण्यासाठी येणाऱ्या अडचणी,त्यावर मात करण्यासाठी असलेले सरकारी धोरण, संबंधित तांत्रिक अडचणी आणि त्यांचे समाधान,ई. बाबींचा देखील आपणांस याठिकाणी अभ्यास करावा लागेल.

निश्चलनीकरण हा विषय सर्वच स्पर्धात्मक परीक्षांच्या प्रत्येक टप्प्यावर अतिशय महत्वाचा ठरत आहे. या विषयाशी संबंधित बहुपर्यायी प्रश्न यूपीएससी,एमपीएससी, बँकिंग,सैन्यदल सेवा- यांसारख्या सर्वच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी सदरात विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थीसाठी सामान्य अध्ययन पेपर तीन मधील प्रश्नांची विश्लेषणात्मक  उत्तरे लिहिण्यासाठी हा विषय सर्वांगाने अभ्यासणे आवश्यक ठरणार आहे. मुख्य परीक्षेतील एका विषयावरील तब्बल २५० गुणांचा निबंध लिहिण्यासाठी देखील या विषयाशी संबंधित समांतर अर्थव्यवस्था व त्याच्याशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास फायद्याचा ठरु शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग यांसारख्या परीक्षांच्या मुलाखतीच्या टप्प्यासाठी आपणांस संतुलितरित्या आणि मुद्देशीर उत्तरे देण्यासाठी या विषयाची तयारी फायद्याची ठरणार आहे. सैन्यदल,एमबीए,बँकिंग,ई. परीक्षांच्या Group Discussion टप्प्यासाठी हा विषय महत्वाचा असून, या विषयाची मुलभूत व मुद्देसूद मांडणी आपणांस यशस्वी होण्यासाठी मदतकारक ठरू शकेल. तेव्हा विद्यार्थीमित्रानो, निश्चलनीकरण हा विषय जसा सर्वसामान्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात महत्वाचा ठरतोय तसेच स्पर्धात्मक परीक्षांच्या प्रत्येक परिक्षार्थीसाठी देखील हा तितकाच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाचा विषय ठरणार आहे. तेव्हा बारकाईने आपणास या विषयाशी संबंधित घटकाची माहिती ठेवणे आणि त्याची योग्य पद्धतीने मांडणी करण्याचे कसब आत्मसात करावे लागणार आहे.

स्पर्धात्मक परीक्षांच्या नजरेतून निश्चलनीकरण धोरण

विचारा प्रश्न तुमच्या मनातला?

विचारा प्रश्न तुमच्या मनातला या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे  या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न मेल मार्फत पाठवा .

मेलdrsatishdhage @ gmail.com

प्रश्न सर, यूपीएससी परीक्षांमध्ये सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३२ वर्षे अथवा जास्तीत जास्त सहा प्रयत्नाची मर्यादा आहे. ही मर्यादा यूपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिळून एकत्रित आहे की फक्त यूपीएससी नागरी सेवा परीक्षांसाठी? आणि दुसरा प्रश्न म्हणजे या परीक्षांसाठीचा कुठलाही प्रयत्न हा तुम्ही त्या परीक्षेचा फॉर्म भरला म्हणजे मोजला जातो की ती परीक्षा दिल्यानंतर?     –सोहन ठोंबरे,औरंगाबाद

उत्तर सोहन, बऱ्याच सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनात असणारा हा एक प्रश्न आहे. यूपीएससी अथवा एमपीएससी द्वारे एका वर्षात वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक परीक्षा ही दुसऱ्या परीक्षेच्या तुलनेत पूर्णपणे स्वतंत्र मानली जाते. एका परीक्षेच्या प्रयत्नांचा दुसऱ्या परीक्षेच्या प्रयत्नांशी दुरान्वयेही संबंध नसतो. म्हणून सहा प्रयत्नांची मर्यादा ही संपूर्णतः फक्त नागरी परीक्षांशीच संबंधित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही परीक्षेचा फॉर्म भरला, त्याचे प्रवेशपत्र आले तरीही तो प्रयत्न तोपर्यंत एकूण attempt limit मध्ये गणला जात नाही जोपर्यंत तुम्ही परीक्षेच्या केंद्रामध्ये जाऊन त्या परीक्षेच्या attendance sheet मध्ये सही करत नाहीत. एकदा का तुम्ही परीक्षेच्या attendance sheet मध्ये सही केले की त्या वर्षीचा आपला प्रयत्न गणला जाईल. याविषयी अथवा यांसारख्या प्रश्नांच्या आणखीन विस्तृत माहिती व मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)

स्पर्धात्मक परीक्षांच्या नजरेतून निश्चलनीकरण धोरणस्पर्धात्मक परीक्षेत यशासाठी इंग्रजीची भिती घालवा