स्पर्धात्मक परीक्षांसाठी वर्तमानपत्रांचे वाचन
यूपीएससी, एमपीएससी, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी पदे यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांची महाविद्यालयीन जीवनापासूनच नियोजनबद्धरित्या तयारी करण्यासाठी एव्हाना तुम्ही मनाची तयारी केली असेलच. स्पर्धात्मक परीक्षांच्या या प्रवासात तुम्हाला विविध विषयांच्या ज्ञानग्रहनासोबतच विश्लेषणात्मक विचारप्रणाली विकसित करावी लागणार आहे आणि त्यासाठीच खऱ्या अर्थाने चांगल्या वृत्तपत्राचे वाचन आणि त्याचे चिंतन हे नितांत आवश्यक आहे. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या परिक्षार्थीच्या मनात वृत्तपत्रांविषयी काही प्रश्नांबाबत नेहमीच संभ्रम असतो. स्पर्धात्मक परीक्षांसाठी नियमितपणे वृत्तपत्र का वाचावे? कुठले वृत्तपत्र वाचावे? परीक्षेच्या दृष्टिकोनातून वृत्तपत्रामधले नेमके काय वाचावे? वृत्तपत्र नेमके कसे वाचावे आणि त्याची टिपणे (नोटस) कशी काढावीत? यांसारख्या वृत्तपत्रांविषयी – का, कोणते, काय आणि कसे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या या लेखातून करू.
स्पर्धात्मक परीक्षांच्या स्वरूपाविषयी सामान्य लोकांमध्ये फार चुकीचे समज आहेत. त्यांच्या मते या परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला भरपूर पाठांतर करावे लागते किंवा सर्वसामान्यांच्या समजुतीतले सामान्य ज्ञान, जसे की ताजमहाल केव्हा बांधला गेला आणि जगातील सात आश्चर्ये कोणती? यांसारख्या प्रश्नांची तयारी करावी लागते असा असतो; परंतु असा विचार पूर्णपणे चुकीचा आहे आणि या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कधीही अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत. यूपीएससी, एमपीएससी परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच दिलेली अभ्यासक्रमाविषयी दिलेलेली मार्गदर्शक ओळ वाचली तर आपल्या लक्षात येईल की, या परीक्षांच्या प्रश्नांचे स्वरूप हे विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पनांची समज आणि अद्ययावत व चालू घडामोडींशी त्यांचा संबंध यांच्याशी निगडीत असते. यांमध्ये केंद्रीभूत स्थान जर कोणाला असेल, तर ते म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास आणि त्यासाठी सर्वात उत्तम साधन म्हणजे नियमितपणे चांगल्या वृत्तपत्राचे वाचन आणि त्याचे चिंतन! मग साहजिकच दुसरा प्रश्न मनात येतो की, स्पर्धात्मक परीक्षांसाठी कुठले वृत्तपत्र वाचावे? राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, वाणिज्य, विज्ञान आणि समाजातील विविध विकासात्मक विचारप्रवाह संतुलितपणे दर्शविणारे वृत्तपत्र – हे स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या परीक्षांर्थीसाठी उपयुक्त ठरेल. जर आपण इंग्रजी माध्यमातून यूपीएससी,एमपीएससी, सैन्य सेवा, बँकिंग यांसारख्या परीक्षांची तयारी करत असाल तर ‘द हिंदू’ सारखे गुणवत्तापूर्ण वृत्तपत्र आपण नियमितपणे वाचावे. आपण जर मराठी माध्यमातून परीक्षेची तयारी करत असाल तर अत्यंत विश्लेषणात्मक असे ‘महाराष्ट्र टाईम्स’ सारखे दर्जेदार वृत्तपत्र किंवा ‘लोकसत्ता’ वृत्तपत्र नियमितपणे वाचणे आपल्याला आवश्यक आहे. वृत्तपत्र का वाचावे आणि कोणते वाचावे? या प्रश्नांची उत्तरे सापडल्यानंतर आता आपल्याला वृत्तपत्रांमधून नेमके काय वाचावे? याचा विचार करावा लागेल.
वृत्तपत्रामधील मुख्य पान, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित माहितीसोबतच संपादकीय आणि विविध विषयांवरील विश्लेषणात्मक लेख- या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नियमितपणे करणे आवश्यक आहे. एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या परिक्षार्थ्याना यासोबतच राज्यातील घडामोडीवर देखील बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. खून,दरोडे,राजकीय चिखलफेक,आरोप-प्रत्यारोप,स्थानिक बातम्या,चटपटीत बातम्या यांना आपल्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून नगण्य स्थान आहे आणि अशा माहितीकडे आपण दुर्लक्ष करावे. मुख्य पानावरील हेडलाईन्सवरून आपल्याला सर्वात जास्त चर्चेतील बातम्यांचा अंदाज येतो, त्यातील परीक्षेच्या संबंधित विषयांशी निगडीत बातम्या आपण वाचाव्यात. वेगवेगळे सामाजिक, राजकीय, कायदेशीर, सरकारी योजना, आंतरराष्ट्रीय करार आणि त्याचा भारताशी संबंध – यांच्याशी संबंधित बातम्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांशी संबंधित पानामधून आपण जरूर वाचाव्यात. सरकारी योजना, परकीय गुंतवणूक धोरण, वेगवेगळ्या क्षेत्रांमधील सरकारची वाणिज्य धोरणे- यांसारख्या बातम्या वाणिज्य वार्ता पानामधून आपल्याला सापडतील. वेगवेगळ्या कंपन्यांचे तिमाही निकाल, त्यांची धोरणे, विस्तारात्मक धोरणे – यांसारख्या बातम्यांकडे आपण परीक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्याची गरज नाही. स्पर्धात्मक परीक्षांसाठी वृत्तपत्रामधील सर्वात महत्त्वाचे पान म्हणजे संपादकीय आणि ईतर विश्लेषणात्मक लेख असलेले पान! संतुलित,विचारपूर्ण, प्रसंगी सरकारी धोरणांची सकारात्मक निंदा करणारे आणि मुद्देसुद्पणे मांडलेले संपादकीय लेख हे स्पर्धात्मक परीक्षांच्या परीक्षार्थीसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात.
या लेखांमधून फक्त त्या त्या विषयांशी संबंधित माहितीच मिळते असे नाही तर परीक्षार्थीना त्या विषयाशी संबंधित दृष्टीकोन आणि स्वतःचे त्याविषयी मत ठरविण्यासाठी त्याचा फायदा होतो. यूपीएससीच्या लेखी परीक्षांमध्ये सामान्य अध्ययनाचा पेपर असो की २५० गुणांचा एका विषयावरील निबंध लिहिण्याचे कौशल्य असो, या संपादकीय लेखांचा त्या ठिकाणी आपल्या उत्तरांची गुणवत्ता वाढविण्यासाठी खूप फायदा होतो. त्यामुळेच ‘द हिंदू’ किंवा ‘महाराष्ट्र टाईम्स’ सारखे दर्जेदार संपादकीय लेख हे प्रत्येक परीक्षार्थीसाठी अत्यंत उपयोगी ठरतात. त्याबरोबरच चालू घडामोडीशी संबंधित जे विश्लेषणात्मक लेख विविध नामवंत लेखकांद्वारे प्रसिध्द केले जातात, त्यांचाही अभ्यास करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. यूपीएससी परीक्षांच्या गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की, विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकाशी संबंधित बरेचसे प्रश्न हे नवनवीन शोध,संशोधन, वैद्यक क्षेत्रातील क्रांती- यांच्याशी संबंधित असतात. यांसाठी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील दर गुरुवारी प्रसिद्ध होणारी ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ ही पुरवणी खूप महत्वाची ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर यूपीएससी परीक्षेमध्ये नुकताच विचारला गेलेला ‘३-डी तंत्रज्ञान’ विषयीचा प्रश्न हा पूर्णतः ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ सदरातील लेखाशी संबंधित होता. म्हणून नवीनतम वैज्ञानिक घडामोडींवर आपल्या तयारीमध्ये विशेष भर असावा.
वृत्तपत्राचे नोटस काढताना एक विशेष लक्ष ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे या सर्व बातम्या अथवा लेख वाचताना आपण त्रिसूत्रीचा अवलंब करावा. पहिली गोष्ट म्हणजे ‘key words’ ला रेखांकित करण्याची सवय करावी. आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित तसेच गेल्या काही वर्षांमध्ये ज्या विषयांवर आधारित प्रश्न विचारले गेले आहेत, त्या ‘key words’ चा यांमध्ये अंतर्भाव असावा, जसे की- शाश्वत विकास,सर्वसमावेशक विकास,विकेंद्रीकरण,केंद्र-राज्य संबंध,हरीत जीडीपी, ईत्यादी. दुसरी गोष्ट म्हणजे त्या लेखातून आपल्या विषयाशी संबंधित मतितार्थ आपण आपल्या भाषेत लेखाच्या बाजूच्या मोकळ्या जागेत लिहावा आणि तिसरी व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या लेखाच्या आधारावर आपले मत आणि दृष्टीकोन जो आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये आपल्या उत्तरांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वापरता येईल, अशाप्रकारे आपल्या notes मध्ये लिहावा. वृत्तपत्र वाचण्याच्या पद्धतीमध्ये आणखीन एक नाविन्यपूर्ण गोष्टीचा तुम्ही अंतर्भाव करू शकाल.
‘द हिंदू’ सारखे वृत्तपत्रांमधील संपादकीय अथवा नामवंत लेखकांद्वारे लिहिल्या गेलेल्या लेखांमधून आपल्याला अवघड वाटणाऱ्या शब्दांची यादी डीक्शनरीच्या मदतीने एका डायरीमध्ये त्याच्या अर्थासहित लिहावी. स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या या प्रवासात अशाप्रकारची पद्धत अवलंबिल्यामुळे काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की, तुमच्या ओळखीचे नसणारे बरेचसे इंग्रजी शब्द आता तुम्हाला परिचयाचे झाले आहेत आणि त्यामुळे तुमच्या vocabulary मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. या गोष्टींचा नकळतपणे फायदा तुम्हाला परीक्षेमधील इंग्रजी उताऱ्यावर आधारित प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होईल. त्याचबरोबर सीडीएस,एसएसबी-यांसारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अशा नवीन माहित झालेल्या एका इंग्रजी शब्दापासून कमीत कमी पाच नवीन वाक्ये तयार करण्यासाठी करावा, जेणेकरून तुम्हाला ‘word association test’ मध्ये याचा फायदा होईल आणि सोबतच इंग्रजीची मनातील भितीही कमी होईल.
प्रत्येक क्षेत्रातील सुज्ञ आणि जागरूक व्यक्तीसाठी चालू घडामोडींचे ज्ञान असणे अपेक्षित आहे , परंतु तुमच्यासारख्या भावी अधिकाऱ्यासाठी मात्र नियमितपणे दर्जेदार अशा वृत्तपत्राचे आणि सोबतीला काही मासिकांचे वाचन करणे हे यशासाठी अत्यावश्यक आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीच्या या प्रवासात, तुमच्या सोबतीला असलेल्या चालू घडामोडींच्या वाचनातून आणि विश्लेषणातून कळत-नकळत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खूप सकारात्मक बदल होत असतात आणि हा बदल आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात नक्कीच महत्वाचा ठरेल.त्यामुळे आजपासूनच आपण स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीमध्ये नियोजनपूर्वक नियमित वृत्तपत्र वाचनाचा समावेश करावा, जेणेकरून आपण यशाच्या योग्य मार्गावर मार्गाक्रमण करू.
(क्रमशः)
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. संपर्क- drsatishdhage@gmail.com ; Mobile -8698340084)