स्वप्न सैन्यदलात पॅरा कमांडो बनण्याचं…
सैन्यदलात ‘मरून बैरेट’ धारक स्पेशल फोर्सेस पॅराकमांडो सैनिकाचा मान आणि त्यांचं सैन्यदलातील स्थान काही औरच असतं. स्पेशल फोर्सेस पॅराकमांडोची सैन्यदलातील ओळख म्हणजे अशक्यप्राय वाटणारी मोहीम फत्ते करण्याची कला अवगत असणारा भारतीय सैन्यदलाचा हुकमी एक्का ! आपल्या सैन्यातील स्पेशल फोर्सेसचे पॅराकमांडो म्हणजे धैर्य, शौर्य आणि कट्टर देशप्रेमाचं मूर्तिमंत प्रतीकच आहेत. शत्रूला नामोहरम करण्यासाठी जेव्हा गुप्त आणि अत्यंत जोखमीच्या मोहिमा आखाव्या लागतात तेव्हा त्या पार पाडण्याची जबाबदारी पॅरा स्पेशल फोर्सेसना दिली जाते. भारत देशाच्या ईतिहासात वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धापासून ते वर्ष २०१६ मधील उरी सर्जिकल स्ट्राईकपर्यंत अनेक महत्वाची ऑपरेशन ह्या पॅरा एसएफ कमांडोजनी अत्यंत चोखपणे पार पाडलेली आहेत. पॅरा एसएफ कमांडो बनण्यासाठी काय करावं लागतं आणि त्याची खडतर प्रशिक्षण प्रक्रिया कशी असते, याचा परामर्श आपण आजच्या या लेखामधून घेणार आहोत.
भारतीय सैन्यदलात स्पेशल फोर्सेस पॅराकमांडो युनिटची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली. ‘पॅरा एसएफ कमांडो युनिट’ हे नावाला अनुसुरूनच विशिष्ट परिस्थितीत, विशेष लक्ष्य साध्य करण्यासाठी कार्यरत असतात. वायुदलातील ‘गरुड’ कमांडोज, नौदलातील ‘मार्कोस’ आणि थलसेनेमधील ‘पॅराकमांडो’ हे स्पेशल फोर्सेसचे अंग मानले जातात. स्पेशल फोर्सेस पॅराकमांडो युनिटचं ब्रिदवाक्य आहे – ‘बलिदान’. भारत-पाकिस्तानमधील १९६५,१९७१ आणि १९९९ मधील कारगील युद्ध असो; पंजाबमधील ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ असो ; श्रीलंकेतील ‘ऑप पवन’ असो; मालदीवमधील ‘ऑप कैक्टस’ असो अथवा सैन्यदलाच्या वेगवेगळ्या गुप्त कारवायांमधील सहभाग असो- स्पेशल फोर्सेस पॅराकमांडोजनी आपल्या अभूतपूर्व शौर्याचे दर्शन घडवत, प्रत्येकवेळी राष्ट्रहिताठी आपल्याला दिलेली कामगिरी चोख बजावलेली आहे.
स्पेशल फोर्सेस पॅराकमांडो सैनिकांची निवड ही भारतीय सैन्यदलातील विविध रेजिमेंटमधील जवानांमधूनच केली जाते. स्पेशल फोर्सेस पॅराकमांडो प्रशिक्षणासाठी आवेदन केलेल्या भारतीय सैन्यदलातील विविध शाखांच्या अधिकारी, जेसीओ, जवान यांच्यामधून साधारणतः दहा हजार सैनिकांमधून एका सैनिकाची निवड स्पेशल फोर्सेस पॅराकमांडो म्हणून केली जाते. भारतीय सैन्यदलाच्या इतर बटालियन्स आणि पॅरा एसएफ मधील सर्वात मोठा फरक म्हणजे एसएफ पॅराकमांडोजला देण्यात येणारी खडतर ट्रेनिंग ! नव्वद दिवसांसाठी चालणारं एसएफ पॅराकमांडोजचं हे प्रशिक्षण भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठोर आणि खडतर कमांडो प्रशिक्षणांपैकी एक मानलं जातं. सैनिकाचा शारिरीक कणखरपणा, मानसिक सामर्थ्य आणि दुर्दम्य ईच्छाशक्ती यांची चाचणी घेण्यासाठी या प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध चाचण्या घेतल्या जातात. एसएफ पॅराकमांडोजच्या प्रशिक्षणात असलेला सर्वांत कठीण भाग म्हणजे ३६ तासांची ‘स्ट्रेस फेज’! या टप्प्यात कमांडोजना सलग ३६ तास न झोपता राहायचे असते.
सैनिकांचा चिवटपणा आणि ईच्छाशक्ती या गुणधर्मांची चाचणी करण्यासाठी त्यांना या चाचणीदरम्यान जेवण व पाणी सुद्धा दिले जात नाही आणि प्रचंड शारीरिक व मानसिक यातनांचा त्यांना सामना करावा लागतो. ‘स्ट्रेस फेज’च्या पहिल्या टप्प्यात २०-२० किलोच्या दोन जेरी कॅन सैनिकांना उचलून न्याव्या लागतात. दुसऱ्या राउंडमध्ये त्यांना ६०-८५ किलो वजन असलेले ट्रकचे टायर उचलून न्यावे लागतात तर तिसऱ्या राउंडमध्ये त्यांना ३० ते ८० किलो वजनाचे लाकडाचे ओंडके उचलून न्यावे लागतात. ह्या सगळ्यांसह त्यांच्याजवळ त्यांची ३० किलो वजनाची बॅग कायमच असते आणि त्यांची शस्त्रे सुद्धा असतात. ‘स्ट्रेस फेज’च्या दुसऱ्या टप्प्यात सैनिकांचे हात व पाय बांधलेले असतात आणि त्यांना १२ फूट खोल थंडगार बर्फाच्या पाण्यात उडी मारण्यास सांगितले जाते. हीच सैनिकांची सर्वात कठीण परीक्षा असते व अत्यंत कमी ऑक्सिजन मिळाल्यामुळे किंवा ऑक्सिजन नसल्यामुळे ह्याच फेजमध्ये बहुतांश सैनिकांची इच्छाशक्ती संपुष्टात येऊ शकते.
ह्यांसह त्यांना कॉम्बॅट फ्री फॉलचे ट्रेनिंग देखील देण्यात येते. ह्यात हाय अल्टीट्युड लो ओपनिंग (HALO) आणि हाय अल्टीट्युड हाय ओपनिंग (HAHO) पॅराशूट जम्प शिकवण्यात येतात.तसेच सिवेज लाईन्समधून सरपटत जाण्याचे ट्रेनिंग सुद्धा देण्यात येते. ट्रेनिंगच्या शेवटी काचा खाण्याची परीक्षा सैनिकांचा निडरपणा तपासण्यासाठी घेण्यात येते. ह्या पॅरा एसएफ कमांडोजना ज्या मिशनवर पाठवण्यात येते, ते बहुतांश सर्वच मिशन्स गुप्त ठेवण्यात येतात. पॅरा एसएफच्या प्रशिक्षणात त्यांना शस्त्रात्रांच्या प्रशिक्षणासह कम्युनिकेशन, वैद्यकीय व स्वयंपाकाचेही प्रशिक्षण देण्यात येते.त्यांना अंडरकव्हर एजन्ट म्हणून काम करता यावे, यांसाठी त्यांना विविध भाषा सुद्धा शिकवण्यात येतात. या छत्तीस तासांच्या प्रशिक्षणात शत्रूवर हमला, त्याचा सामना तसेच अपहृत व्यक्तींची सुटका यांसारखी अवघड आणि खरीखुरी आव्हानं एसएफ पॅराकमांडोजना पार पाडावी लागतात. या खडतर प्रशिक्षणामागे सैन्यदलाचा एकाच हेतू असतो आणि तो म्हणजे कमांडोजना अशा प्रकारे तयार करायचं की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना तग धरता यायला हवा आणि लक्ष्य विचलित न होऊ देता त्यानी मोहीम फत्ते करावी.
सीमेपार शत्रूच्या गोटात शिरून काही मिनिटांमध्येच मोहीम फत्ते करण्याची खुबी ही पॅरा एसएफ कमांडोजना एका दिवसात येत नाही, तर त्यामागे असते ती त्यांची दुर्दम्य ईच्छाशक्ती, सूक्ष्म नियोजन, निडरता आणि देशासाठी प्राणांची आहुती देण्याची तयारी. पॅरा एसएफ कमांडोज बनण्याचं स्वप्न तर आपल्यापैकी कित्येक जण पाहतात आणि त्यांच्या शौर्यानं भारावून जातात. असचं काहीसं हटके करण्याची जिद्द, निडरता आणि समर्पण भाव आपल्यात असेल तर सैन्यदलातील स्पेशल फोर्सेस पॅराकमांडो बनण्याचं करीअर तुम्हाला खुणावतंय.
(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)