स्पर्धात्मक परीक्षांसाठी पूरक अभ्यास साहित्य- भाग १

 In Dainik Gavkari

यूपीएससी, एमपीएससी सनदी सेवा परीक्षांच्या तयारीच्या  प्रवासात विविध विषयांच्या संदर्भग्रंथांच्या अभ्यासासोबतच विविध प्रकारच्या पूरक अभ्यास साहित्याची गरज पडते. ज्ञानग्रहणासोबतच विश्लेषणात्मक विचारप्रणाली स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विकसित करावी लागते आणि त्यासाठीच खऱ्या अर्थाने चांगल्या वृत्तपत्राचे वाचन आणि त्याचे चिंतन हे नितांत आवश्यक ठरते. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या परिक्षार्थीच्या मनात वृत्तपत्रांविषयी काही प्रश्नांबाबत नेहमीच संभ्रम असतो. स्पर्धात्मक परीक्षांसाठी नियमितपणे वृत्तपत्र का वाचावे? कुठले वृत्तपत्र वाचावे? परीक्षेच्या दृष्टिकोनातून वृत्तपत्रामधले नेमके काय वाचावे? वृत्तपत्र नेमके कसे वाचावे आणि त्याची टिपणे (नोटस) कशी काढावीत? यांसारख्या वृत्तपत्रांविषयी – का, कोणते, काय आणि कसे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या या लेखातून करू.

स्पर्धात्मक परीक्षांच्या स्वरूपाविषयी सामान्य लोकांमध्ये फार चुकीचे समज आहेत. त्यांच्या मते या परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला भरपूर पाठांतर करावे लागते किंवा सर्वसामान्यांच्या समजुतीतले सामान्य ज्ञान, जसे की ताजमहाल केव्हा बांधला गेला? जगातील सात आश्चर्ये कोणती? यांसारख्या प्रश्नांची तयारी करावी लागते असा असतो; परंतु असा विचार पूर्णपणे चुकीचा आहे आणि या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कधीही अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत. यूपीएससी, एमपीएससी परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच दिलेली मार्गदर्शक ओळ वाचली तर आपल्या लक्षात येईल की, या परीक्षांच्या प्रश्नांचे स्वरूप हे विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पनांची समज आणि अद्ययावत व चालू घडामोडींशी त्यांचा संबंध यांच्याशी निगडीत असते. यांमध्ये केंद्रीभूत स्थान जर कोणाला असेल, तर ते म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास आणि त्यासाठी सर्वात उत्तम साधन म्हणजे नियमितपणे चांगल्या वृत्तपत्राचे वाचन आणि त्याचे चिंतन! मग साहजिकच दुसरा प्रश्न मनात येतो की, स्पर्धात्मक परीक्षांसाठी कुठले वृत्तपत्र वाचावे? राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, वाणिज्य, विज्ञान आणि समाजातील विविध विकासात्मक विचारप्रवाह संतुलितपणे दर्शविणारे वृत्तपत्र – हे स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थीसाठी उपयुक्त ठरेल.

जर आपण इंग्रजी माध्यमातून यूपीएससी,एमपीएससी, सैन्य सेवा, बँकिंग यांसारख्या परीक्षांची तयारी करत असाल तर ‘द हिंदू’ सारखे गुणवत्तापूर्ण वृत्तपत्र आपण नियमितपणे वाचावे. आपण जर मराठी माध्यमातून परीक्षेची तयारी करत असाल तर विश्लेषणात्मक लेखांचा भरणा असणारी वृत्तपत्रे जसे -‘महाराष्ट्र टाईम्स’,‘लोकसत्ता’,आपल्या स्थानिक प्रश्नांची खरी ओळख करून देणारे ‘दैनिक आदर्श गावकरी’ यांसारखी वृत्तपतत्रे नियमितपणे वाचणे आपल्याला आवश्यक ठरते. वृत्तपत्र का वाचावे आणि कोणते वाचावे? या प्रश्नांची उत्तरे सापडल्यानंतर आता आपल्याला वृत्तपत्रांमधून नेमके काय वाचावे? याचा विचार करावा लागेल.

वृत्तपत्रामधील मुख्य पान, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित माहितीसोबतच संपादकीय आणि विविध विषयांवरील विश्लेषणात्मक लेख- या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नियमितपणे करणे आवश्यक आहे. एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या परिक्षार्थ्याना यासोबतच राज्यातील घडामोडीवर देखील बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. खून, दरोडे, राजकीय आरोप-प्रत्यारोप, चटपटीत बातम्या यांना आपल्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून नगण्य स्थान आहे. मुख्य पानावरील हेडलाईन्सवरून आपल्याला सर्वात जास्त चर्चेतील बातम्यांचा अंदाज येतो, त्यातील परीक्षेच्या संबंधित विषयांशी निगडीत बातम्या आपण सखोल वाचाव्यात. वेगवेगळे सामाजिक, राजकीय, कायदेशीर, सरकारी योजना, आंतरराष्ट्रीय करार आणि त्याचा भारताशी संबंध – यांच्याशी संबंधित बातम्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांशी संबंधित पानामधून आपण जरूर वाचाव्यात.

सरकारी योजना, परकीय गुंतवणूक धोरण, वेगवेगळ्या क्षेत्रांमधील सरकारची वाणिज्य धोरणे- यांसारख्या बातम्या वाणिज्य वार्ता पानामधून आपल्याला सापडतील. वेगवेगळ्या कंपन्यांचे तिमाही निकाल, त्यांची धोरणे, विस्तारात्मक धोरणे – यांसारख्या बातम्यांकडे आपण परीक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्याची गरज नाही. स्पर्धात्मक परीक्षांसाठी वृत्तपत्रामधील सर्वात महत्त्वाचे पान म्हणजे संपादकीय आणि ईतर विश्लेषणात्मक लेख असलेले पान! संतुलित,विचारपूर्ण, प्रसंगी सरकारी धोरणांची सकारात्मक निंदा करणारे  आणि मुद्देसुद्पणे मांडलेले संपादकीय लेख हे स्पर्धात्मक परीक्षांच्या परीक्षार्थीसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. या लेखांमधून फक्त त्या त्या विषयांशी संबंधित माहितीच मिळते असे नाही तर परीक्षार्थीना त्या विषयाशी संबंधित दृष्टीकोन आणि स्वतःचे त्याविषयी मत ठरविण्यासाठी त्याचा फायदा होतो. यूपीएससीच्या लेखी परीक्षांमध्ये सामान्य अध्ययनाचा पेपर असो की २५० गुणांचा एका विषयावरील निबंध लिहिण्याचे कौशल्य असो, या संपादकीय लेखांचा त्या ठिकाणी आपल्या उत्तरांची गुणवत्ता वाढविण्यासाठी खूप फायदा होतो.

स्पर्धात्मक परीक्षांसाठी पूरक अभ्यास साहित्य- भाग १

त्यामुळेच ‘द हिंदू’ किंवा ‘महाराष्ट्र टाईम्स’ सारखे दर्जेदार संपादकीय लेख हे प्रत्येक परीक्षार्थीसाठी अत्यंत उपयोगी ठरतात. त्याबरोबरच चालू घडामोडीशी संबंधित जे विश्लेषणात्मक लेख विविध नामवंत लेखकांद्वारे प्रसिध्द केले जातात, त्यांचाही अभ्यास करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. यूपीएससी परीक्षांच्या गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की, विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकाशी संबंधित बरेचसे प्रश्न हे नवनवीन शोध,संशोधन, वैद्यक क्षेत्रातील क्रांती- यांच्याशी संबंधित असतात.

यांसाठी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील दर गुरुवारी प्रसिद्ध होणारी ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ ही पुरवणी खूप महत्वाची ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर यूपीएससी परीक्षेमध्ये नुकताच विचारला गेलेला  ‘३-डी तंत्रज्ञान’ विषयीचा प्रश्न हा पूर्णतः ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ सदरातील लेखाशी संबंधित होता. म्हणून नवीनतम वैज्ञानिक घडामोडींवर आपल्या तयारीमध्ये विशेष भर असावा. परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी लागणारा संतुलित दृष्टिकोन आपल्या वाचन साहित्याच्या गुणवत्तेवर बहुतांशी अवलंबून असतो. स्पर्धात्मक परीक्षेच्या मुलाखतीदरम्यान विचारले जाणारे बरेचसे प्रश्न हे तुमच्या बायोडाटाशी संबंधित असू शकतात आणि त्यामुळे स्थानिक प्रश्नांची नेमकी जाण व त्याच्याशी संबंधित ज्ञान आपणास ‘दैनिक आदर्श गावकरी’ सारख्या दर्जेदार वृत्तपत्रातून मिळू शकते. ‘दैनिक आदर्श गावकरी’ सारख्या वृत्तपत्राचे स्पर्धात्मक परीक्षांसाठी असणारे महत्व म्हणजे त्यात दिला जाणारा स्थानिक प्रश्नांविषयीचा ‘लोकल ते ग्लोबल’ दृष्टीकोन! अशा ज्ञानाचा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये केवळ मुलाखतीच्या तयारीकरिता फायदा होतो असे नाही तर भावी सनदी अधिकाऱ्यांमध्ये ग्रामीण भागाच्या खऱ्या परिस्थितीची  जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्यदेखील या माध्यमाद्वारे होते.

स्पर्धात्मक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी वृत्तपत्रांच्या जोडीला काही महत्त्वपूर्ण नियतकालिके आणि सरकारी अहवाल देखील खूप महत्त्वाचे ठरतात. पुढील लेखामध्ये या पूरक अभ्यास साहित्याचा आपण परामर्श घेऊ.

 

विचारा प्रश्न तुमच्या मनातला?

विचारा प्रश्न तुमच्या मनातला या श्रुंखलेतून विद्यार्थी त्यांच्या मनातील विविध स्पर्धात्मक परीक्षा, त्यातील करीअर संधी तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील अधिकारी बनण्याच्या संधी यांविषयी विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपल्या विविध शंकांचे निरसन येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे (से.नि.) या सदरातून करतील. तेव्हा वाट कशाची बघता? लगेच आपला प्रश्न मेल मार्फत पाठवा .

मेलdrsatishdhage@gmail.com

प्रश्न सर, माझे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे. MPSC राज्यसेवा २०१७ परीक्षा कधी असेल?      – रोहिणी चौधरी,औरंगाबाद

उत्तर रोहिणी, स्वप्न पाहणे ही यशाची पहिली पायरी असते. आपले उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचा टाईमटेबल MPSC द्वारा नुकताच जाहीर झाला आहे. वर्ष २०१७ मध्ये MPSC द्वारा होणाऱ्या सर्व परीक्षांच्या तारखा आयोगाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. राज्यसेवा परीक्षांची प्राथमिक परीक्षा २ एप्रिल २०१७, मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१७ व मुलाखत डिसेंबर २०१७ मध्ये अपेक्षित आहे.तेव्हा जराही वेळ न दवडता तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तयारीला लागा. आणखीन विस्तृत माहिती व मार्गदर्शनासाठी आपण एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद येथे भेट देऊ शकता.

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)

मुलाखतीची पूर्वतयारीसैन्यदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न - भाग १